बोईसर : बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहतीलगत अवधनगर भागात अनधिकृत भंगाराची गोदामे उभी राहिली आहेत. सरकारी जागांवर अतिक्रमण करून उभारलेल्या या गोदामांविरोधात अनेक तक्रारी आहेत. परंतु त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. तारापूर-बोईसर औद्योगिक परिसरातील सरावली ग्रामपंचायतीअंतर्गत अवधनगर, आझाद नगर, धोडीपूजा हे भाग येतात. इथे मोठय़ा प्रमाणात भंगार व्यावसायिक आणि विक्रेत्यांनी गोदामे थाटली आहेत. या गोदामांमध्ये तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधील भंगार साहित्य आणि घातक रसायनांच्या पिंपांची बेकायदा साठवणूक केली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही गोदामे जिथे उभारलेली आहेत, ती जागा सरकारी आहे. त्या जागेवर गोदामे उभारताना कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नाहीत. पालघर महसूल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर यांना तर विचारलेलेच नाही. तरीही त्या जागी पर्यावरण आणि मानवी जीवनास घातक अशा साहित्याची साठवणूक केली जाते. त्यामुळे येथे अनेकदा आगीही लागतात. असेच दुर्लक्ष केल्यास या गोदामांमुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती येथील नागरिक व्यक्त करतात. या रसायनांच्या पिंपांचा स्फोट झाल्यास आजूबाजूचा परिसरही धोक्यात येईल. येथे ही रसायनांची पिंपं स्वच्छ करून त्यातून आलेले विषारी सांडपाणी कोणत्याही प्रक्रियांविनाच गटारात सोडण्यात येते. आसपासच्या रहिवाशांना या सांडपाण्याची तीव्र दरुगधी सहन करावी लागतेच शिवाय त्यांच्या आरोग्यासाठीही ते चांगले नाही. या सांडपाण्यामुळे प्रचंड अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक आजार पसरत आहेत. येथील रहिवाशांमध्ये विशेषत: लहान मुलांमध्ये उलटय़ा, डोळय़ांची जळजळ, डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास, पोटदुखी, जुलाब असे आजार वारंवार उद्भवत आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unauthorized scrap warehouses despite complaints citizens no action administration ysh
First published on: 20-09-2022 at 00:02 IST