बोईसर : पालघर जिल्ह्यातून वाहणाऱ्या सुर्या नदीवरील उर्से येथील  कोकण पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम अपूर्ण अवस्थेत असून वारंवार मुदतवाढ देऊन देखील ठेकेदार काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीवर डहाणू तालुक्यातील घोळ, आंबिवली, उर्से आणि पालघर तालुक्यातील चिंचारे व गारगाव या गावांच्या हद्दीत कोकण पद्धतीचे एकूण पाच बंधारे मंजूर करण्यात आले. बंधार्‍यांच्या प्रत्यक्ष कामाला जानेवारी २०२१ मध्ये सुरवात करण्यात आली. जानेवारी २०२४ पर्यंत ३६ महीन्यात काम पूर्ण करण्याची मुदत पालघर पाटबंधारे विभागामार्फत संबंधित ठेकेदारांना देण्यात आली होती. 

पाच बंधाऱ्यांपैकी  घोळ, चिंचारे, आंबिवली, गारगाव येथील चार बंधार्‍यांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र उर्से येथील बंधाऱ्याचे बांधकाम रखडले असून जे.जी. चंपानेरकर हा ठेकेदार काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करीत आहे. कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर ठेकेदार प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात करून जून महिन्यात पावसाच्या आधी काम बंद केले जात असल्याने बंधाऱ्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यास विलंब लागला आहे. पालघर पाटबंधारे विभागामार्फत उर्से येथील बंधाऱ्याच्या बांधकामास १६.६४ कोटी रुपये निधीची मंजुरी प्राप्त असून एमएमआरडीएमार्फत ३० जून २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र बंधाऱ्याच्या कामाला वारंवार मुदतवाढ देऊन देखील ठेकेदार काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्याच्याकडून काम काढून घेत उर्वरित काम नवीन ठेकेदाराकडून करून घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पाच बंधाऱ्यांना एमएमआरडीए कडून निधी :

 पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड आणि पालघर तालुक्यामधील ग्रामीण भागात पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी पाण्याची टंचाई असताना सुद्धा सूर्या धरण प्रकल्पातून वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहरांना पाणी देण्यासाठी स्थानिक नागरीकांचा जोरदार विरोध होता. याविरोधात पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे अनेक वेळा आंदोलने देखील करण्यात आली आहेत. स्थानिकांना देखील शेती आणि पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावे याकरिता पालघर पाटबंधारे विभागाने सूर्या नदीवर कोकण पद्धतीच्या पाच साखळी बंधार्‍यांची योजना तयार केली. पाच बंधाऱ्यांच्या कामासाठी एमएमआरडीए तर्फे ७०.४० कोटी अर्थसहाय्य करण्यात आले असून वसई विरार महानगरपालिकेसह नदी काठावरील गावांना देखील बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग होणार आहे.

२.२९ दलघमी पाणीसाठा :

सूर्या नदीवरील कोकण पद्धतीच्या पाच साखळी बंधार्‍यांमुळे सूर्या नदीपात्रात एकूण २.२९ दलघमी इतका पाणीसाठी निर्माण होऊन या भागातील पाण्याची भूजलपातळी वाढून  उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे नदी काठावरील शेती बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील पाण्याचा वापर करता येईल. बंधाऱ्याच्या भिंतीवरून नदी काठावरील दोन्ही बाजूच्या गावांमध्ये ये जा करण्यासाठी पर्यायी रस्ते उपलब्ध झाले आहेत.
कोट :

उर्से येथील अपूर्ण बंधाऱ्याच्या ठिकाणी स्वतः भेट देऊन स्थळ पाणी करणार आहे. बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात नक्की काय अडचणी आहेत याची माहिती घेऊन पावसानंतर तातडीने काम पूर्ण करण्यास ठेकेदाराला निर्देश देण्यात येतील. सचिन पाटील कार्यकारी अभियंता, पालघर पाटबंधारे विभाग