वाडा : पाणीटंचाईच्या झळा असह्य झाल्याने ग्रामस्थांकडून टँकरची मागणी करण्यात येऊ लागली आहे. पाण्यासाठी दिवसभर वणवण करणारे दुर्गम भागातील अनेक आदिवासी कुटुंबे पाण्याचा जपून वापर करीत आहेत. घरातील शौचालयासाठी अधिक पाणी लागत असल्याने अनेक जणांनी त्याचा वापर बंद केला आहे. त्यासाठी त्यांना उघडय़ावर जाण्याची वेळ आली आहे.
वाडा, विक्रमगड, मोखाडा या तालुक्यांतील दुर्गम भागातील अनेक आदिवासी पाडय़ात आंघोळीसाठी, कपडे व अन्य बाबींसाठी लागणाऱ्या पाण्याचेही दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. १९९९ च्या शासन निर्णयानुसार टंचाईसदृश भागात टँकरने पाणी उपलब्ध करून देण्यात यावे असा नियम आहे. मात्र दीड ते दोन किलोमीटर अंतरावर पाण्याचा स्रोत नसेल तरच टँकर सुविधा देण्यात येईल अशा प्रकारे काही त्रुटी काढून शासनाकडून टँकर सुविधा देणे टाळले जात आहे.
प्यायला पाणी आणण्यासाठी संपूर्ण दिवस खर्च करावा लागत आहे, शौचालयासाठी लागणारे अधिक पाणी आणण्यासाठी अधिक वेळ खर्च होईल, मग अशा परिस्थितीत शौचालयाचा वापर कसा करायचा असे आखाडा ग्रामपंचायत हद्दीतील भगतपाडा येथील संतोष बुधर यांनी सांगितले.
शौचालयांना टाळे
ग्रामीण भागात घरकुल योजनेबरोबर स्वच्छतागृह (शौचालय) बांधकाम करण्यासाठी १२५०० रुपये अनुदान दिले जाते. मात्र ही सुविधा देत असताना या लाभार्थीकडे दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या पाणीटंचाईकडे गांभीर्याने बघितले जात नाही. त्यामुळे पाणीटंचाई वेळी अनेक स्वच्छतागृहांना टाळे ठोकण्याची वेळ येते. वाडा तालुक्यातील उज्जेनी, ओगदा या परिसरात येणाऱ्या अनेक पाडय़ांवरील वैयक्तिक शौचालयांना पाणीटंचाईमुळे टाळे लागले आहे.
नुसते स्वच्छतागृह बांधून हागणदारीमुक्ती होणार नाही, त्यासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे. -अंकिता दुबेले, सामाजिक कार्यकर्त्यां, उसर, ता. वाडा