पालघर : पालघर जिल्ह्य़ात ३० लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला असून त्यापैकी २० लाख नागरिकांनी लशीची पहिली मात्रा तर दहा लाख ४८ हजार नागरिकांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. जिल्ह्य़ात लशीचा मुबलक साठा असून अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनातर्फे केला जात आहे.

जिल्ह्य़ात अजूनपर्यंत ३० लाख ५० हजारपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यामध्ये १६ लाख ७२ हजार पुरुष व १३ लाख ७५ हजार महिलांचा समावेश आहे. यापैकी २८ लाख ७७ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी कोव्हिशिल्ड लस घेतली असून १८-४४ वयोगटातील वीस लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. याखेरीज ४५ ते ६० वयोगटातील सात लाख पाच हजार तर तीन लाख ४४ हजारपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्य़ात सध्या एक लाख १२ हजारपेक्षा अधिक लसमात्रा उपलब्ध असून त्याचा साठा ५७ केंद्रांमध्ये ठेवण्यात आला आहे. जिल्ह्य़ात सध्या १२४ केंद्रांवर लसीकरण सुरू असून त्यामध्ये ९८ शासकीय केंद्रांचा समावेश आहे. ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूचे संक्रमण इतर देशांत जलद गतीने होत असल्याने ग्रामीण भागात नागरिकांचे लसीकरण जलद गतीने करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.