पालघर : वाढवण बंदर प्रकल्पाचा रस्ते जोडणीसाठी आवश्यक जमीन संपादन प्रकिया पुढील महिन्यात सुरू होणार असून प्रकल्पाच्या
पुढील वाटचालीच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला. या बैठकीत मत्स्य व्यवसायाशी संबंधित धोरणात्मक बाबी तसेच स्थानिक मनुष्यबळाच्या कौशल्यविकासासाठी राबविण्यात येत असलेल्या वाढवण पोर्ट कौशल्य विकास कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

वाढवण पोर्ट प्रकल्प लिमिटेड (व्हीपीपीएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौरव दयाल यांनी भारतातील १३ वे प्रमुख बंदर असलेल्या या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील वाटचालीचा आराखडा निश्चित करण्यासाठी १८ एप्रिल रोजी उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजन केले होते.

या बैठकीला पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभरतर, जेएनपीएचे उपाध्यक्ष रविश कुमार सिंह व व्हीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीस केंद्र व राज्य शासनातील विविध महत्त्वाच्या विभागांतील आणि संस्थांतील इतर वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये बंदर प्रशासन, जिल्हा प्रशासन, कायदा अंमलबजावणी यंत्रणा, वन व मत्स्य विभाग यांचे अधिकारी तसेच एनएचएआय, डीविइटी, भारतीय रेल्वे, तांत्रिक सल्लागार आणि इतर कौशल्य विकास संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

बंदराशी अखंड आणि सुरळीत जोडणी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने बंदराला जोडणाऱ्या महत्त्वाचे रस्ते व इतर पायाभूत सुविधांसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया गतीमान करण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली. तसेच या प्रकल्पाच्या उद्दिष्टांसोबतच स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेचे संरक्षणही सुनिश्चित होईल हे ध्यानी ठेऊन मत्स्य व्यवसायाशी संबंधित प्रश्न हाताळताना संतुलित दृष्टिकोन अवलंबण्याचे महत्त्व अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी अधोरेखित केले.

वाढवण पोर्ट स्कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत स्थानिक युवकांना उद्योग-सुसंगत कौशल्ये प्रदान करणे तसेच प्रकल्पाच्या प्रगतीसोबतच परिसरातील रोजगाराच्या संधी वाढविणे हा असून त्यासंबंधी माहिती देण्यात आली.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी विविध संस्थांमधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करीत असताना सर्व संबंधित भागधारकांना मुद्यांचे निराकरण करण्यासाठी आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा वेग कायम राखण्यासाठी परस्पर सहकार्याने काम करण्याच्या सूचना दिल्या.

व्हीपीपीएल बद्दल

वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (VPPL) हे देशाचे १ श्वे मोठे बंदर असून, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड (MMB) यांच्या संयुक्त भागीदारीत स्थापन करण्यात आलेले एक विशेष उददिष्ट असलेले कंपनी रूपातील उपक्रम आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळ वसलेले हे बंदर जागतिक स्तरावर आघाडीच्या १० बंदरांमध्ये स्थान मिळवण्यास सक्षम आहे. ३० ऑगस्ट २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बंदराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक क्षण घडला.

निसर्गपूरकतेला प्राधान्य देत, वाढवण बंदर हे शंभर टक्के हरित तत्त्वावर आधारित असणार आहे, जे पर्यावरणावर कमीत कमी परिणाम करत अधिक कार्यक्षमतेने काम करेल. २४ दशलक्ष टीईयू (TEU) माल हाताळण्याची क्षमता असलेले हे बंदर देशाच्या व्यापार कार्यक्षमतेला गती देणार आहे. या माध्यमातून आर्थिक प्रगतीला चालना मिळेल आणि परिसराचा सर्वागीण विकास होईल. वाढवण पोर्ट कौशल्य कार्यक्रमांसारख्या उपक्रमांद्वारे स्थानिक समुदाय सशक्त करण्यावर वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड विशेष भर देत आहे.