बोईसर: पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात स्थानिक भूमिपुत्रांचा असंतोष अधिकच पेटला असून आंदोलकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. वाढवण समुद्रकिनाऱ्यालगत स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांनी थेट समुद्राच्या पाण्यात उतरून ‘जलसमाधी’ आंदोलन छेडले. सरकार आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत स्थानिकांनी आपला तीव्र विरोध नोंदवला.

​वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती आणि स्थानिकांच्या वतीने दोन दिवसांपूर्वी वरोर येथे भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या माध्यमातून वाढवण बंदर सेवार्थ आणि किनाऱ्यावरील भरावाचे सर्व काम तातडीने बंद करण्यात यावे, असा अंतिम इशारा प्रशासनाला आणि सरकारला देण्यात आला होता. मात्र, स्थानिकांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत प्रशासनाने आज सकाळपासून कामाला पुन्हा सुरुवात केल्याने भूमिपुत्रांच्या रागाचा उद्रेक झाला.

काम बंद न झाल्याने आक्रमक झालेल्या शेकडो स्थानिकांनी वाढवणच्या समुद्रकिनाऱ्यावर दगड घेऊन आलेले ट्रक अडवून धरले. त्याचप्रमाणे समुद्राच्या पाण्यात प्रवेश करत जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ मच्छीमार किंवा तरुणच नव्हे, तर मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुले देखील सहभागी झाली.

​प्रशासनाकडून जोर-जबरदस्तीने काम सुरू असल्याचा आरोप

स्थानिक भूमिपुत्रांनी आरोप केला आहे की, वाढवन बंदर प्रकल्पामुळे आमची पारंपरिक मासेमारी, रोजगार, जमीन आणि पर्यावरण संपूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. संपूर्ण किनारपट्टीतील जनता या प्रकल्पाच्या विरोधात असतानाही सरकार आणि जिल्हा प्रशासन स्थानिकांचा तीव्र विरोध डावलून, पोलीस बळाचा आणि जोर-जबरदस्तीचा वापर करून काम पुढे ढकलत आहे. स्थानिक मच्छीमारांच्या मते, हे बंदर झाल्यास हजारो मच्छीमार कुटुंबांची उपजीविका हिरावली जाईल. त्यामुळे प्राण गेले तरी चालेल, पण वाढवण बंदर होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. समुद्रकिनाऱ्यावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.