पालघर: भारत सरकारच्या बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग मंत्रालयाचे सचिव विजय कुमार यांनी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाला भेट देत, वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड (व्हीपीपीएल) मार्फत विकसित करण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड डीप-ड्राफ्ट प्रमुख बंदराच्या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे (जेएनपीए) अध्यक्ष तथा व्हीपीपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौरव दयाल, पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, व्हीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविश कुमार सिंह तसेच व्हीपीपीएल, जेएनपीए आणि संबंधित विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी सचिवांसोबत उपस्थित होते. त्यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थिती व प्रगतीबाबत सचिवांना माहिती दिली.
भेटीदरम्यान सचिवांनी प्रकल्पाच्या विविध प्रमुख घटकांच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच प्रकल्पस्थळी सुरू असलेल्या कामकाजाची सद्यस्थिती जाणून घेतली. यामध्ये बंदर विकासाशी संबंधित विविध कामांचा समावेश होता. त्यात किनाऱ्यालगतच्या भरावाचे काम, ब्रेकवॉटरची उभारणी, बाह्य दळणवळणाची जोडणी, भूसंपादन तसेच पायाभूत सुविधा व उपयुक्तता सेवांशी संबंधित कामांचा आढावा घेण्यात आला.
व्हीपीपीएलच्या पथकाने प्रकल्पाच्या विविध घटकांमध्ये झालेल्या प्रगतीबाबत तसेच आगामी टप्प्यांमध्ये नियोजित करण्यात आलेल्या कामकाजाची माहिती सचिवांना दिली. यावेळी त्यांनी विविध भागधारकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणेही जाणून घेतले.
प्रकल्पाची वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व भागधारकांमध्ये घनिष्ठ समन्वय राखण्याबरोबरच प्रकल्पाच्या विविध आघाड्यांवरील कामांना सातत्यपूर्ण गती देण्याच्या महत्त्वावर सचिवांनी भर दिला. विविध पूरक कामे आणि प्रकल्पाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या बाबी समांतरपणे पुढे जात असताना, बांधकामाच्या कामांना व्यापक स्वरूपात गती देण्यासाठी आवश्यक पूर्वतयारीचाही त्यांनी आढावा घेतला.
व्हीपीपीएलचा राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचा प्रकल्प म्हणून विकास सुरू असून तो भारताची सागरी क्षमता अधिक बळकट करण्यास, व्यापारातील स्पर्धात्मकता वाढविण्यास आणि देशाच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाला चालना देण्यास महत्त्वपूर्ण योगदान देणार असल्याचे या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
“बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग मंत्रालयाच्या सचिवांची भेट आणि प्रकल्पाचा सविस्तर आढावा यामुळे प्रकल्पाच्या विविध कामांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी संरचित आणि निर्धारित कालमर्यादेनुसार पुढे जात असून, कामाच्या प्रत्येक टप्प्यावर उच्च दर्जाचे मानदंड, शाश्वतता आणि कार्यान्वयनासाठीची आवश्यक सज्जता यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.” – गौरव दयाल, सीएमडी, व्हीपीपीएलचे
