पालघर : केंद्रातील आणि राज्यातील सरकारकडून पालघरवासीयांवर लादल्या जाणाऱ्या वाढवण बंदरासह इतर विविध विनाशकारी प्रकल्पांविरोधात ३० ऑक्टोबर रोजी वरोर (डहाणू) येथे भव्य जनआक्रोश सभा आणि महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. “अस्तित्वाची ही लढाई, विकासाच्या नावाखाली विनाश नको!” असा एल्गार पुकारत पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्र आणि विविध संघटना एकवटल्या आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात मोठे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.

30 ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पासून सुरु होणाऱ्या वरोर येथील जनआक्रोश सभेत राजकीय पक्षांसह जवळपास ४० हून अधिक विविध संघटना, मच्छीमार संस्था आणि शेतकरी गट सहभागी होत आहेत. या आंदोलनात वसई-विरारपासून ते मोखाडा, जव्हार, वाणगाव, डहाणू या ग्रामीण आणि शहरी भागातील सुमारे ५० हजार नागरिक सहभागी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या आंदोलनादरम्यान आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

वाढवण बंदरासह प्रस्तावित असलेल्या विविध मोठ्या प्रकल्पांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना पूर्णपणे दुय्यम स्थान दिले गेले असून त्यांच्या रोजगारावर आणि अस्तित्वावरच गदा आणली जात आहे. यासंदर्भात बोलताना आंदोलनकर्ते वैभव वझे यांनी स्पष्ट केले की, “हा लढा केवळ बंदराला विरोध करण्यासाठी नाही, तर पालघरमधील स्थानिक भूमिपुत्रांचे, मच्छीमारांचे आणि शेतकऱ्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. सरकारने लादलेले हे विनाशकारी प्रकल्प रद्द होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.”

पर्यावरणाचा आणि रोजगाराचा मोठा ऱ्हास

प्रस्तावित वाढवण बंदरासाठी समुद्रात प्रचंड प्रमाणात भराव घातला जाणार असून, ड्रेझिंग आणि ब्रेकिंग वॉटर वॉलमुळे सागरी जैवविविधता व माशांचे नैसर्गिक प्रजनन क्षेत्र पूर्णपणे नष्ट होणार आहे. यामुळे लाखो मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला आहे. याशिवाय, ५७१ हेक्टर जमिनीवर होणारा ग्रीनफिल्ड महामार्ग, रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प, टेक्सटाईल पार्क, मुरबे बंदर, बुलेट ट्रेन, आणि चौथी मुंबई यांसारख्या प्रकल्पांमुळे लाखो झाडांची कत्तल होणार असून पर्यावरणाचा समतोल बिघडणार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

राजकीय नेत्यांची साथ

भूमिका घेताना केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात शिवसेनेसह (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), मनसे, जनता दल (सेक्युलर), बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या सर्व विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. या जनआक्रोश सभेत विरोधी दिग्गज नेते प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.

पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त तैनात

५० हजाराच्या आसपास जमाव जमण्याची शक्यता संघटनांनी व्यक्त केल्यामुळे पालघर पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच महामार्गावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाच्या नाक्यांवर पोलीस बंदोबस्त, वाहतूक वळवणे आणि अतिरिक्त दंगल नियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.