पालघर : वाढवण बंदरासाठी उभारण्यात येणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत तवा (डहाणू) येथील एका आदिवासी लाभार्थी कुटुंबाला मिळालेल्या २.९३ कोटी रुपयांच्या मोबदल्यामधून त्याच्या असाक्षरतेचा फायदा घेऊन त्याला तब्बल ५०.२८ लाख रुपयांनी लुबाडण्यात आले आहे. दलाल, प्रशासनातील कंत्राटी व कनिष्ठ कर्मचारी तसेच संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या परस्पर हितसंबंध व संगनमताने हे कारस्थान प्रथमदर्शनी घडल्याचे दिसून येत आहे.

वाढवण बंदरासाठी ग्रीनफील्ड मार्ग उभारताना तवा येथील किरण पांडू पालवा व त्याच्या चार नातेवाईकांच्या नावे सर्वे नंबर १७३ मधील सुमारे सव्वा हेक्टर जागा संपादित होत असल्याने भूसंपादन विभागाने त्यांना २.९३ कोटी रुपयांचा मोबदला जाहीर केला होता. या जमिनीत वाटेकरी असणाऱ्या त्यांच्या इतर नातेवाईकांनी व त्यांच्या वारसाने ही रक्कम किरण पालवा यांना देण्यासंदर्भात नोंदवलेले संमतीपत्र २० एप्रिल रोजी भूसंपादन विभागाला दिले होते. तसेच मोबदल्याची रक्कम बँक ऑफ महाराष्ट्रच्या चारोटी (कासा) शाखेमध्ये जमा करण्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती.

संपादित जमिनीचा मोबदला लवकर मिळवून देतो असे सांगत परिसरातील तीन दलालांनी त्यांना पाचरण केले होते. आपल्याला मोबदल्यातील निम्मी रक्कम मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केल्याने किरण पालवा व कुटुंबीयांनी त्यांना स्पष्ट नकार दिला होता. तरी देखील त्यांना संमती पत्र व इतर कागदपत्री पूर्तता करण्यासाठी ही दलाल मंडळी त्यांच्यासोबत राहायची असे किरण पालवा यांचे म्हणणे होते.

भूसंपादनाच्या अनुरूप असणारी मोबदला रक्कम देण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर किरण पालवा यांच्या पॅनकार्ड व बँक खात्यात काहीतरी तांत्रिक अडचण असल्याचे सांगून त्यांना २१ एप्रिल रोजी बोईसर येथे बोलविण्यात आले. मोबदला रक्कम लवकर मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी त्यांचे बोईसर बस स्टँडच्या समोर रस्त्यावर बायोमेट्रिक्स करून घेतले व नंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी च्या आधारे आवश्यक कागदपत्रे पूर्तता झाल्याचे सांगून त्यांना पाठवण्यात आले. प्रत्यक्षात ही कृती करताना पालवा यांचे बोईसरच्या कोटक महिंद्रा बँकेत बचत खाते उघडण्यात आल्याचे त्यांच्या पासून लपवून ठेवण्यात आले.

आदिवासी लाभार्थ्याला ५० लाखाने लुबाडले.

महिनाभर उलटल्यानंतर देखील आपल्याला जागेचा मोबदला न मिळाल्याने किरण पालवा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन कक्ष गाठल्यानंतर त्यांना पूर्ण रक्कम अदा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी कोटक महिंद्रा बँकमध्ये जाऊन चौकशी केली असता जमा झालेल्या रकमेपैकी ५०.२७ लाख रुपये रक्कम परस्पर वापरल्याचे दिसून आले. बँकेकडून मिळालेल्या तपशिलामधून नऊ लाख रुपयांची दोन लाख रोख रक्कम काढण्यात आली असुन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी, कपडे खरेदी, मद्यपानासाठी वापर, इंधन तसेच एटीएम मधून रोख रक्कम काढल्याचे व इतर नागरिकांना ट्रान्सफर केल्याचे दिसून आले.

या प्रकरणात संबंधितांनी पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांची भेट घेऊन प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी तारापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याबाबत मार्गदर्शन केले. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी तक्रार अर्ज स्वीकारण्यात आला असून चौकशी करून गुन्हा नोंदविण्यात येईल असे पोलिसांकडून लोकसत्ता ला सांगण्यात आले. आज सकाळी बँकेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने पालवा यांच्या तवा निवास्थानी जाऊन भेट घेतली. या प्रकारांतील सर्व बाबी तापण्यात येतील व या कुटुंबाला अवगत करण्यात येईल असे सांगण्यात आले. दरम्यान या बँकेची कार्यपद्धती पाहता या बँकेची व्यवहार स्थगित करण्याचे विचाराधीन असल्याचे भूसंपादन विभागामधील विश्वसनीय सूत्रांकडून समजले.

कसा केला मोबाईलला रकमेचा अपहार

पॅन कार्ड मध्ये असणाऱ्या तांत्रिक दोषांची पूर्तता करताना किरण पालवाचा बायोमेट्रिक थंब अर्थात आधार प्रमाणीकरण बोईसर येथील रस्त्यावर करण्यात आले. या ठिकाणापासून बोईसरची शाखा अवघ्या ५०- ७० मीटर अंतरावर असताना रस्त्यावर हे कृत्य दलाल व बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संगतमताने केल्याचे आरोप होत आहेत. बायोमेट्रिक्स करताना दलालाचा भ्रमणध्वनी देण्यात आला होता व बोईसरचे कोटक महिंद्रा बँकेत त्याचे बचत खाते उघडण्यात आले.

मात्र खाते उघडताना चेक बुक, एटीएम कार्ड व इतर माहिती पुस्तिका असणारे वेलकम किट किरण पालवा यांना देण्यात आले नाही. दरम्यान प्राप्त झालेल्या चेकबुकचा तपशील जिल्हा भूसंपादन विभागाकडे दिल्यानंतर तेथील कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या संगनमताने मोबदला रक्कम पूर्वी दिलेल्या महाराष्ट्र बँक एवजी कोटक महिंद्रा बँक खात्यामध्ये टाकण्यात आली असल्याचे दिसून आले. दलाल मंडळींकडे असणाऱ्या एटीएम, ट्रान्सफर व चेकचा गैरवापर करून ५० लाख रुपयांची रक्कम वैयक्तिक कारणासाठी उपभोगण्यात आली.

प्रकरणातील कच्चे धागे…

किरण पालवा यांच्या पॅन कार्डवर स्वाक्षरी असताना भूसंपादनाचे काम त्यांच्या अंगठ्या द्वारे नोंदविण्यात आले. मुळात अंगठा वापरणाऱ्या नागरिकाला चेकबुक मिळत नसते हे सर्वश्रुत असताना त्यांच्या मार्फत देण्यात आलेला चेक ग्राह्य धरून कोटक बँकेच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली. तसेच यापूर्वी जमा केलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या कागदपत्रांची पूर्तता झाली असताना व कोटक बँकेत रक्कम जमा करण्यासंदर्भात कोणतेही विनंती अर्ज नसताना मोबदला अदा करण्यात आला. हा चेक देण्यासाठी आपण आलो नसल्याचे किरण पालवा सांगत असून चेक जमा करताना व्यक्तीची खातरजमा करण्यात आला नाही असे देखील या प्रकरणात दिसून आले आहे.

कोट्यावधी रुपये जमा होत असताना वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूसंपादन लाभार्थ्यांचे बँक खाते कोटक महिंद्रा बँकेने ऑनलाईन पद्धतीने उघडण्याची मुभा दिली. त्यामुळे या लाभार्थ्याला बँक खाते उघडल्यानंतर चेक बुक एटीएम कार्ड न मिळाल्याने त्याचा गैरवापर करण्यात आला.
बँक खाते उघडताना वापरण्यात आलेला आधार संलग्न मोबाईल नंबर बदलण्यासाठी बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली. त्यामुळे मोठ्या रकमेच्या चेक द्वारे रक्कम काढताना किंवा अन्यप्रसंगी मूळ प्रमाणित मोबाईल क्रमांक ऐवजी बदललेल्या भ्रमणध्वनीवर फोन करून खातरजमा करण्यात आल्याने यंत्रणेतील त्रुटी चा लाभ घेण्यात आला. विशेष म्हणजे लाभार्थी हा एकदाही संबंधित बँकेत गेला नसताना इतके मोठे व्यवहार करून घेण्यास संपूर्ण यंत्रणेतील पळवाटांचा तसेच अधिकारी, कर्मचारी व बँक कर्मचाऱ्यांच्या संगनताने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

भूसंपादनाची मोबदला रक्कम लवकरात लवकर लाभार्थ्यांना मिळावी म्हणून प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करीत आहे. लाभार्थ्यांनी दिलेल्या बँक खात्याचा तपशील खातरजमा करून रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे भूसंपादन विभागाकडून या प्रकरणात कोणतेही गैरकृत्य केले नसून सर्व लाभार्थ्यांना सहकार्य करण्याची भावना जोपासली आहे. या प्रकरणात बँकेच्या व्यवहाराची चौकशी करण्यात येईल.

  • महेश सागर, भूसंपादन अधिकारी

“ग्रीनफिलड महामार्ग (वाढवण बंदर) प्रकल्प राष्ट्र हिताचा प्रकल्प असल्याने नियमाच्या चौकटीत राहून लाभार्थींना मोबदला मिळावा यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत, कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी प्रशासनाकडून पुर्ण सहकार्याची भावना आहे. लाभार्थींच्या मोबदल्या बाबतीत आम्ही संवेदनशिल असून भूसंपादन मोबदला विषयी कोणतीही तक्रार आल्यास त्याची तातडीने चौकशी केली जाईल व कारवाई देखील केली जाईल.”

  • मनोज रानडे