बोईसर : पालघर तालुक्यातील गारगाव येथील दगड खाण प्रकल्पांच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामार्फत आयोजित जाहीर जन सुनावणी मध्ये सहभाग घेण्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला. दगड खाण प्रकल्पामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान आणि त्याचा स्थानिकांवर होणारा परिणाम याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या अहवालाचा अभ्यास करण्यास पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्यात आला नाही तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जन सुनावणी रद्द करून पुढे ढकलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली.मात्र नागरिकांच्या प्रखर विरोधानंतर देखील प्रशासनाने जन सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली.
डहाणू नजीक अरबी समुद्रात प्रस्तावित वाढवण बंदराची उभारणी करण्यात येणार आहे. बंदराच्या उभारणीसाठी खोलवर समुद्रात भराव करण्यात येणार असून भरावासाठी आवश्यक गौण खनिजाचे गारगाव आणि खाणीवडे येथील डोंगरातील दगड खाणींधून उत्खनन केले जाणार आहे. या दगड खाण प्रकल्पांच्या परवानगीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे मार्फत रविवारी ( २ जुलै) रोजी शिगाव – खुताड येथे जाहीर जन सुनावणी सुरू करण्यात आली. मात्र दगड खाण प्रकल्पामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान आणि त्याचा स्थानिक नागरिकांवर होणारा संभाव्य परिणाम याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामार्फत स्थानिक पाच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या अहवालाचा अभ्यास करण्यास पुरेसा कालावधी देण्यात आला नसल्याचा आरोप जन सुनावणीच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांना केला.
जुलै महिन्याच्या पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी झाली,त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे सगळीकडे भात शेतीची लगबग सुरू असून बहुतांश शेतकरी भात लावणीच्या कामाला लागले आहेत,अशा परिस्थितीत जाहीर जन सुनावणी रद्द करून पुढे ढकलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. गारगाव गट क्रमांक ८२ (क्षेत्र.२४.९४ हे.) साठी आयोजित सुनावणीमध्ये ९० नागरिक, गट क्रमांक ८२ (क्षेत्र.१७.०८ हे.) साठी ७२ आणि खानिवडे गट क्रमांक ९ (क्षेत्र.१५.३९ हे.) ६० नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. प्रखर विरोधानंतर देखील प्रशासनाकडून जन सुनावणीची प्रक्रिया सुरू केल्याने नागरिक संतप्त झाले. तीव्र विरोधानंतर देखील प्रशासन जन सुनावणीची प्रक्रिया जबरदस्तीने रेटून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत बहुतांश नागरिकांनी सभा मंडपात प्रवेश करण्यास नकार देत विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी राजू वसावे आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी नागरिकांनी जन सुनावणी प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या सुचना,हरकती आणि आक्षेप तोंडी किंवा लिखित स्वरूपात नोंदवण्याची विनंती केली, मात्र नागरिकांनी त्यांची ही मागणी धुडकावून लावत सभा मंडपाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करून आपला निषेध नोंदविला.
वनविभागाच्या ५७ हेक्टर जागेत दगड खाण प्रकल्प :
डहाणू नजीक अरबी समुद्रात आठ ते १० किमी खोल अंतरावर १४४८ हेक्टर क्षेत्रफळावर वाढवण बंदराची उभारणी करण्यात येणार आहे. बंदर उभारण्यासाठी समुद्रात दगड आणि वाळू इत्यादी बांधकाम साहित्याचा भरावासाठी वापर केला जाणार आहे. भरावासाठी दमण जवळील समुद्रातील वाळू वापरली जाणार असून पालघर तालुक्यातील गारगाव आणि खाणीवडे येथील वनविभागाच्या मालकीच्या ५७.४१ हेक्टर जागेतून एक कोटी दोन लाख चार हजार टन/वार्षिक दगड उत्खनन करण्याचे प्रस्तावित आहे. दगड खाण प्रकल्पाकरिता पर्यावरण आणि वने मंत्रालय, भारत सरकार यांच्या अनुपालनानुसार, मेसर्स जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी द्वारे प्रस्तावित दगड खाण प्रकल्पांसाठी पर्यावरणीय मंजुरी घेणे आवश्यक आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात :
शिगाव – खुताड येथील आश्रम शाळेच्या परिसरात आयोजित जन सुनावणी दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता पालघर पोलिस दलातर्फे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विनायक नरळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकारी,कर्मचारी यांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेच्या निर्धारित वेळेत जन सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
