scorecardresearch

पालघर पोलिसांकडून ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

मोबाइल मनोऱ्यात असणारे बीटीएस कार्ड चोरी करून पलायन करणाऱ्या चार आरोपींना जव्हार आणि मनोर पोलिसांनी पकडले आहे

पालघर पोलिसांकडून ४० लाखांचा मुद्देमाल जप्त
(संग्रहित छायाचित्र)

पालघर: पालघर पोलिसांनी जिल्ह्यातील केळवे, सफाळे, डहाणू आणि जव्हार परिसरांत झालेल्या घरफोडय़ा आणि चोरीच्या गुन्ह्यांत नऊ गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

केळवा परिसरात पोलिसांतर्फे जन प्रतिशत अभियान राबवण्यात आले. त्यादरम्यान काही संशयित गुन्हेगारांची छायाचित्रे दाखवल्यानंतर नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्यामार्फत केळवे पोलीस स्थानकाच्या हद्दीत केलेल्या १२ घरफोडय़ांची आणि सफाळे पोलीस स्थानकाच्या हद्दीत झालेल्या तीन घरफोडय़ांची कबुली घेण्यात आली तसेच सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला गेला.

डहाणू पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका घरातील लोखंडी कपाटातील लॉकर फोडून सव्वाआठ लाखांचे दागिने चोरीस गेले होते. त्या प्रकरणी डहाणू पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे साडेसहा लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

मोबाइल मनोऱ्यात असणारे बीटीएस कार्ड चोरी करून पलायन करणाऱ्या चार आरोपींना जव्हार आणि मनोर पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून जव्हार तालुक्यातील दोन, विक्रमगड आणि शहापूर पोलीस स्थानकातील दोन असे एकूण चार चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत. चोरीच्या बीटीएस चिपची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यालादेखील अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पालघर जिल्ह्यालगत असणाऱ्या मीरा रोड परिसरातील अनेक गुन्हेगार हे या जिल्ह्यात चोरीनिमित्ताने येत असल्याचे निदर्शनास आले असून या तीन गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या आरोपींपैकी अधिकांश आरोपी हे पालघर जिल्ह्याबाहेरील रहिवासी आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने ऑल आऊट कोंबिंग ऑपरेशन हाती घेण्यात येत असल्याचीदेखील माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली.

त्यागुन्ह्य़ांचा छडा कधी लागणार?

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील एक जवान अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुसे घेऊन फरार झाला होता. या घटनेला दीड महिना उलटला तरीही त्याप्रकरणी सदर जवानाला अटक करण्यात पालघर पोलीस अयशस्वी ठरले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी बोईसर येथे गावठी कट्टा वापरून एका तरुणीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात गावठी कट्टा येथे कसा आला, याचाही अजून छडा लागलेला नाही.

दिवाळीनंतर वाहतूक पोलीस पूर्ण क्षमतेने कार्यरत

पालघर पोलिसांची वाहतूक शाखा कार्यान्वित करण्यात आली असून या शाखेत वर्ग केलेल्या निम्म्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दिवाळीनंतर पूर्ण होईल आणि त्यानंतर वाहतूक शाखा पूर्ण जोमाने कार्यरत होईल.

वाडा येथे घरफोडय़ा करणारे चोरटे अटकेत

वाडा : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीचा फायदा घेऊन पहाटे दुकाने फोडणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले आहे. मात्र टोळीतील काही चोरटे फरार आहेत.  

नवरात्रोत्सवाच्या जागरणामुळे पहाटेच्या वेळेस साधारण निवांतपणा असतो. तसेच बहुतांश नागरिकही गाढ झोपेत असतात, याचा फायदा घेऊन चोरटय़ांची ही टोळी दुकाने फोडत असे. अशाप्रकारे सलग तीन दिवसांत त्यांनी सात दुकाने फोडली. शिवाय वाडा शहरातील गणपती मंदिरातील मूर्तीवरील किमती ऐवजही चोरला होता. एका दुचाकीची चोरी केली होती. मात्र सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी या टोळीतील काही चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. काही चोरटे मात्र फरार झाले आहेत. दरम्यान, वाडा पोलिसांनी ग्रामीण भागातील कूपनलिकांचे मोटारपंप चोरी करणाऱ्या आणखी एका टोळीला पकडले आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-10-2022 at 02:30 IST

संबंधित बातम्या