पालघर : डहाणू तालुक्यात वाणगाव रेल्वे स्थानकाजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी वाणगाव ते आसनगाव दरम्यान वाणगाव बायपास रस्त्याची उभारणीचे काम हाती घेण्यात आले असून या मुळे खारफुटी बाधित होईल या आशयाच्या तक्रारी स्थानिक यांनी केले आहेत. मात्र या रस्त्याच्या ठिकाणाची पाहणी कांदळवन विभाग तसेच महसूल विभागाने केली असून कोणताही प्रकारची खारफुटी बाधित झाली नसल्याचे शासकीय विभागाचे म्हणणे आहे.

वाणगाव रेल्वे स्थानकाच्या जवळ असणाऱ्या रस्त्यांलगत असणारी बांधकाम, रस्त्याकडेला बसणारे विक्रेते, उभ्या असणारा रिक्षा व वाढलेल्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे. यावर तोडगा म्हणून आदिवासी विकास विभागाच्या अर्थसंकल्पातून वाणगाव परिसर बायपास करणारा तीन कोटी रुपये खर्चून सुमारे ८०० मीटरचा रस्ता उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतले आहे.

या रस्त्याच्या उभारणी दरम्यान मोठ्या प्रमाणात भराव करावा लागत असून यामुळे यामुळे लगतच्या भागात असणारे खारफुटीवर परिणाम होईल अशा आशयाच्या तक्रारी ग्रामस्थांनी विविध शासकीय विभाग तसेच महिन्याभरापूर्वी झालेल्या जनता दरबारा दरम्यान पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केल्या होत्या. या संदर्भात ग्रामस्थांना शासकीय विभागांकडून कोणत्याही स्वरूपात उत्तर आले नसल्याची माहिती ग्रामस्थानी दिली आहे.

या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांच्याशी संपर्क साधला असता रस्त्याची उभारणी होत असलेल्या जमिनीचा भाग हा महसूल विभागाच्या अंतर्गत येत असल्याचा खातर जमा वनविभाग तसेच खारफुटी विभागाने केले असल्याचे सांगितले. या रस्त्याच्या उभारणीच्या कामात कोणत्याही कांदळवन ला बाधा पोहचली नसल्याचे वन विभागाने स्थळ पाहणी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितले आहे. तसेच महसूल विभागाने देखील या ठिकाणची स्थळ पहाणे केल्याचे सांगण्यात आले.

सद्यस्थितीत या रस्त्याच्या उभारणीसाठी भराव करण्यात आला असून त्यावर खडीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली असून या रस्त्याच्या उभारणीमुळे वाणगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण होईल असे सांगण्यात आले.