चारोटी टोल नाक्यावर फास्टॅग स्कॅनिंग होत नसल्याने वाहनांच्या रांगा

पालघर : दिवाळी सण आल्यामुळे मुंबईकडून गुजरात, राजस्थानच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी वाहनांची संख्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची चारोटी टोल नाक्यावर मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्राशेजारील गुजरात, राजस्थान या राज्यांतील नागरिक रोजगार, नोकरीनिमित्त मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई, वसई, पालघर जिल्ह्यात येतात. दिवाळी साजरी करण्यासाठी हे सर्व नागरिक मूळ गावी जायला निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे चारोटी टोल नाक्यावर फास्टटॅग जलद गतीने स्कॅनिंग होत नसल्याने वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.

टोल भरूनही महागडे इंधन विनाकारण टोल नाक्यावर खर्च करावे लागत असल्याने वाहनचालकांमध्ये संताप दिसून येत आहे. वाहतूक नियमानुसार टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होत असेल आणि पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ अडकून पडावे लागत असेल तर टोल खुला करून वाहनांना जाऊ  देण्याचा नियम आहे. परंतु या नियमांचे पालन कधीच करताना दिसून येत नाही. तरी टोल नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत आयआरबी प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.