सर्व पक्ष, संघटनांचा स्वबळाचा नारा; आजपासून नामनिर्देशन पत्रे भरण्यास सुरुवात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रमेश पाटील

वाडा : पालघर जिल्ह्यतील तलासरी, मोखाडा व विक्रमगड या तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होत असून या निवडणुकीसाठी बुधवार, १ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात होत आहे. या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली असून सर्वाधिक प्रतिष्ठेच्या विक्रमगड नगरपंचायत निवडणुकीसाठी येथील सर्वच राजकीय पक्षांनी व संघटनांनी स्वबळाचा नारा दिला आहे.

विक्रमगड नगरपंचायतीच्या १७ प्रभागांतून १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस-जिजाऊ  संघटना पुरस्कृत विक्रमगड विकास आघाडीने सर्वाधिक ७ जागा जिंकून सत्ता काबीज केली होती, तर श्रमजीवी संघटनापुरस्कृत परिवर्तन पॅनेलने ६ जागा जिंकल्या होत्या. भाजपला २ जागा मिळाल्या होत्या, तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांना फक्त प्रत्येकी एक जागेवर समाधान मानावे लागले होते.

विक्रमगड हा एके काळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पाच वर्षांपूर्वी नगरपंचायत स्थापन होण्यापूर्वीच्या ग्रामपंचायतीवर सलग २५ वर्षे भाजपची सत्ता होती. मात्र नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत वादामुळे पाच वर्षांपूर्वी झालेल्या नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला सत्ता गमवावी लागली.

येत्या २१ डिसेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी १ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात होत आहे. ७ डिसेंबर हा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. ८ डिसेंबर रोजी छाननी होणार असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिवस १३ डिसेंबर आहे. विक्रमगड नगरपंचायतीच्या १७ प्रभागांतील एकूण मतदारांची संख्या ८४०० इतकी असून प्रत्येक प्रभागात ४०० ते ५०० सरासरी मतदार आहेत. १७ जागांपैकी अनुसूचित जमातीसाठी ११ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यामधील अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी ६ जागा आरक्षित आहेत. सर्वसाधारणसाठी ६ जागा असून त्यामधील ३ जागा महिलांसाठी राखीव आहेत.

आरोप-प्रत्यारोप सुरू

या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्यापूर्वीच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या निवडणुकीसाठी बनविण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप सर्व पक्षांच्या अध्यक्षांनी केला आहे व तशा प्रकारची तक्रार निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी व विक्रमगड नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केल्या आहेत.मतदारांच्या हरकती नसताना या मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. तर आम्ही नवीन ठिकाणी राहण्यास गेल्याने स्वत:हूनच आम्ही नव्याने दुसऱ्या प्रभागात नावे नोंदवली आहेत असे काही मतदारांनी सांगितले.

१७ प्रभागातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी पूर्ण झाली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.

– परेश रोडगे, शहराध्यक्ष, भाजप

विक्रमगड नगरपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. तशी तयारी आमदार सुनील भुसारा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आहे.

– ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

या निवडणुका आम्ही मिनी विधानसभा निवडणूक समजतोय. आगामी निवडणुकीची ही पूर्वतयारी आहे.

निलेश सांबरे, संस्थापक अध्यक्ष, जिजाऊ संघटना

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikramgad nagar panchayat election ysh
First published on: 01-12-2021 at 01:02 IST