दांडाखाडी गाव परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गावाची पारंपरिक असलेल्या एका ठरावीक जागेवर स्मशानभूमी आहे. अंत्यसंस्काराचे विधी गेल्या अनेक वर्षांपासून तेथे केले जातात. मात्र अलीकडच्या काळामध्ये या स्मशानभूमीवर जाणाऱ्या रस्त्यात एका व्यक्तीने भिंतीचे कुंपण घालून हा रस्ता बंदिस्त केल्यामुळे गावातील नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. तहसीलदार कार्यालयाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने २० गुंठे सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्याचे मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या अहवालात म्हटले होते. त्याचबरोबर तहसीलदार यांच्याकडे या प्रकरणात झालेल्या सुनावणीत अतिक्रमण झाल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले होते.
या प्रकारानंतर पालघरचे तहसीलदार यांनी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना पत्र लिहून हे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे व सरकारी जागा मोकळी करावी, असे आदेश दिले होते. त्यानंतरही ते हटवण्यात येत नसल्यामुळे दांडाखाडी गावातील नागरिकांचा रोष वाढतच गेला. आक्रमक झालेल्या दांडाखाडी येथील ग्रामस्थांनी मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीलगतच जाळून ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला.
दांडाखाडी येथील बारी समाजाचे आशीष नारायण बारी या पन्नास वर्षे वयाच्या व्यक्तीच्या मृतदेहावर स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारातील इमारतीलगतच अग्निसंस्कार करत स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या वेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक होत याच ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.