कासा : मोखाडा तालुक्यातील वैतरणा नदीवरील सावर्डे ते दापोरा गावांना जोडणाऱ्या लोखंडी पुलाचे लोकार्पण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यावेळी ठाकरे यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व गावे लवकरच मुख्य रस्त्यांना जोडणार असल्याची घोषणा केली.
पालघर जिल्ह्यातील बराचसा भाग हा दुर्गम आहे. येथे पायाभूत सुविधा आणि दळणवळणाच्या मूलभूत सुविधा पोहोचण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे हा सर्व भाग मुख्य रस्त्यांना पर्यायाने प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणून जोडण्यासाठी येथील दळणवळणाचे मार्ग मुख्य रस्त्याने जोडले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक तेथे रस्ते, पूल बांधले जातील, जव्हार, मोखाडासारख्या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. असे आश्वासन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. जिल्ह्यातील दुर्गम भाग मुख्य रस्त्यांना जोडल्यामुळे या भागातील शेतकरी, स्थानिक नागरिकांना व्यवसाय, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि शिक्षण, पर्यटन आणि विकासाला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्याबरोबरच येथील पाणीटंचाईचा प्रश्नही मार्गी लावण्याविषयी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले.
पर्यावरणमंत्री ठाकरे यांनी या सर्व घोषणा केल्या त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि जिल्हा अधिकारी माणिकराव बुरसळ उपस्थित होते. त्यामुळे मंत्र्यांचे हे आश्वासन केवळ आश्वासनच राहते की प्रत्यक्षात येते, याची उत्सुकता स्थानिकांना आहे.