पालघर: मुंबई रेल विकास महामंडळातर्फे हाती घेण्यात आलेल्या विरार ते डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्प मार्च २०२७ मध्ये पूर्ण होऊन त्यानंतर आवश्यक तपासणी व चाचण्यानंतरच या मार्गावर उपनगरीय वाहतूक सुरू करण्यात येऊ शकते असे पश्चिम रेल्वेने माहितीच्या अधिकार अंतर्गत दिलेल्या उत्तरामध्ये स्पष्ट झाले आहे. यामुळे डहाणू पर्यंतच्या उपनगरीय प्रवाशांना पुढील किमान दोन अडीच वर्ष गर्दी मधून प्रवास करणे भाग पडणार आहे.

विरार-डहाणू दरम्यान रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रकल्प सध्या संथ गतीने सुरू असून उपनगरीय सेवेची संख्या मर्यादित असल्याने प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पा पूर्णतेबाबत आरंभी वेळापत्रक निश्चित न झाल्याने आणि कांदळवन तोडणे व इतर काही परवानग्या उशिरा मिळाल्याने प्रकल्प रखडला आहे अशी माहिती माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली आहे.

विरार ते डहाणू दरम्यानच्या प्रवाशांसाठी हा प्रकल्प लवकर पूर्ण होणे अत्यावश्यक असून सततच्या विलंबामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे अशी अपेक्षा डहाणू वैतरणा प्रवासी सामाजिक संस्थेमार्फत व्यक्त करण्यात येत आहे.

खारफुटीच्या तोडीस परवानगी मिळण्यास उशीर

माहितीच्या अधिकारांतर्गत पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खारफुटीची झाडे तोडण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी झालेला विलंब हा या प्रकल्पात सर्वात मोठा अडथळा ठरल्याचे नमूद केले आहे. पर्यावरण आणि वन मंत्रालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाकडून यासाठी परवानगी मिळण्यास मोठा कालावधी लागल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीत विलंब झाला असे पश्चिम रेल्वेचे म्हणणे आहे

पूर्णत्वास २०२७ पर्यंत प्रतीक्षा

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (MRVC) माहितीनुसार या प्रकल्पाचे नव्याने निश्चित केलेली पूर्णत्वाची तारीख मार्च २०२७ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सुरुवातीला प्रकल्पाच्या मंजुरीवेळी (२०१६) कोणतेही टप्पे किंवा पुर्णत्वाची तारीख निश्चित करण्यात आलेली नव्हती असे माहितीच्या अधिकारात सांगण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, त्याची चाचणी रेल्वे सुरक्षा आयुक्त (CRS) यांच्या मान्यतेनंतर केली जाईल. त्यानंतर प्रकल्प पश्चिम रेल्वेला हस्तांतरित केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले असून त्यावेळी लोको रेकच्या उपलब्धतेबाबत मात्र अजून पर्यंत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

प्रवाशांना अजूनही त्रास

विरार ते डहाणू दरम्यान रेल्वे फक्त दोन मार्गांवर धावत असून या मार्गावरील प्रवासी गर्दी आणि गाड्यांची कमतरता अजूनही कायम आहे. लोकल, मेल एक्सप्रेस आणि मालवाहतूक रेल्वे या एकाच मार्गावर चालवल्या जात असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

प्रलंबित राहिलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष

गेल्या काही वर्षांपासून या प्रकल्पाच्या संदर्भात नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत असून सुद्धा प्रकल्पाच्या प्रगतीत कोणताही ठोस बदल झालेला नाही. जमीन संपादन, जागा उपलब्धता, स्थानिक समस्या आणि पर्यावरणीय अडथळे यामुळे हा प्रकल्प सतत पुढे ढकलला जात आहे.

अधिकारी स्तरावर समाधानकारक उत्तर नाही

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अद्यापही काही महत्वाचे मुद्दे प्रलंबित आहेत. अधिकार्‍यांनी माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले की प्रकल्प पूर्णत्वानंतरच चाचणी व हस्तांतरण प्रक्रिया होईल.

शहरी भागात विस्ताराला अडथळा

अस्तित्वात असलेल्या पश्चिम रेल्वेच्या रुळांच्या पश्चिमेला चौपदरीकरण प्रकल्प राबविण्यात येत असून विरार ते केळवा रोड व पुढे पालघर शहरापर्यंत रुंदीकरणचे काम जोमाने सुरू आहे. मात्र पालघर व बोईसर शहराच्या परिसरात तसेच बोईसर ते डहाणू दरम्यान काही ठिकाणी नागरी वस्त्यांमुळे तसेच रेल्वे कार्यालय पादचारी फुल उभारणी शिल्लक असल्याने काम प्रलंबित राहिल्याचे दिसून आले आहे. बोईसर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असणारे मालवाहू यार्ड भिमनगर परिसरात स्थलांतरित करणे देखील प्रलंबित असून भूसंपादन, अस्तित्वात असलेल्या रेल्वे सोयी सुविधांचे स्थलांतर यामुळे हा प्रकल्प सध्या धिम्या गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौपदरीकरणाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध व्हावी

मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन तर्फे विरार ते डहाणू रोड दरम्यान चौपदरीकरण करण्याचा प्रकल्प सन २०१६ पासून हाती घेण्यात आला आहे. मात्र अर्थसंकल्पातील तरतुदी कामाच्या गर्दीमध्ये तांत्रिक अडचणी व परवानगी यांचा अडथळा, नागरी वस्ती मधील भूसंपादन, पश्चिमेकडील रेल्वे यार्डांचे स्थलांतर इत्यादी प्रश्नांवर हा प्रकल्प रखडला आहे. जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन), मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग, समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग सारख्या राष्ट्रीय प्रकल्पांची माहिती संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर अथवा समाज माध्यमांवर वेळोवेळी प्रकाशित केली जात असते. याच धरतीवर उपनगरीय क्षेत्रातील चौपदरीकरण प्रकल्पाची सद्यस्थिती संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.