डहाणू : विवळवेढे येथील उड्डाणपुलावरील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आता या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. या उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांबाबतचे वृत्त यापूर्वी प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर संबंधित विभागाकडून या ठिकाणी दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या या उपाययोजना आणि दुरुस्तीची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची ठरली आहेत. योग्य तांत्रिक पद्धतीचा वापर न करता केवळ थातूरमातूर डागडुजी केल्यामुळे, पुलावरील ज्या ठिकाणी आधी खड्डा होता, त्याच ठिकाणी आता आरपार मोठे भगदाड पडले आहे.

या गंभीर परिस्थितीमुळे विवळवेढे उड्डाणपुलाच्या मुख्य संरचनेच्या (स्ट्रक्चरल) सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुलाच्या मधोमध पडलेल्या या भगदाडामुळे उड्डाणपुलावरून प्रवास करणाऱ्या जड तसेच हलक्या वाहनधारकांना रात्रीच्या वेळी आणि गतिमान प्रवासात मोठा धोका निर्माण झाला आहे. येथील वाहतूक धोकादायक बनली असून, वाहनांचे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. उड्डाणपुलाची ही दुरवस्था केवळ पुलावरील वाहतुकीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर या भगदाडामुळे पुलाखालून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहने आणि पादचारी नागरिकांच्या सुरक्षिततेलाही थेट धोका निर्माण झाला आहे. पुलाचा सिमेंट, खडी आणि लोखंडी सळ्यांचा भाग खालच्या बाजूने कधीही कोसळू शकतो, अशा स्थितीत खालून प्रवास करणे अत्यंत भीतीदायक बनले आहे.

प्रशासकीय यंत्रणेकडून उड्डाणपुलाच्या दुरुस्तीवर आतापर्यंत झालेला खर्च आणि करण्यात आलेले प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरले आहेत. वारंवार खड्डे बुजवूनही जर उड्डाणपुलाला भगदाड पडत असेल, तर या कामाच्या तांत्रिक गुणवत्तेबाबत सार्वजनिक पातळीवर तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या प्रशासनाच्या धोरणामुळे ही समस्या अधिक बिकट झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने आता तरी या घटनेची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. या उड्डाणपुलाची केवळ वरवर दुरुस्ती न करता, तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत संपूर्ण पुलाची तांत्रिक तपासणी करण्यात यावी आणि या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी व मजबूत स्वरूपाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी विवळवेढे येथील स्थानिक नागरिक आणि नियमित वाहनचालकांकडून केली जात आहे.