वाडा : वाडा ग्रामीण रुग्णालयात श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा पाटील यांना आर्वाच्य भाषा, शिवीगाळ व असभ्य वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून याबाबत वाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. संबंधितांवर तातडीने कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. घडलेला प्रकारामुळे डॉ. हर्षदा पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला असल्याने ग्रामीण भागातील रुग्णसेवा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाडा रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी १० फेब्रुवारी दुपारी १२:३० ते १ वाजता दरम्यान, गरोदर महिलांची सोनोग्राफी सुरू असताना सुमारे २० ते २५ महिला रांगेत होत्या. यादरम्यान काही महिलांनी आपला क्रमांक असतानाही इतरांना प्राधान्य दिल्याचा आरोप करत वाद घातला. मात्र, डॉ. हर्षदा पाटील यांनी कोणतीही पक्षपाती भूमिका घेतली नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, सोनोग्राफीसाठी आलेल्या एका गरोदर महिलेला अचानक चक्कर आल्याची घटना घडली. यावेळी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला. मात्र, वैद्यकीय अधीक्षक यादव शेखरे यांनी हे आरोप फेटाळून लावत संबंधित महिलेला वेळेत व योग्य उपचार दिल्याचे “लोकसत्ता”शी बोलताना स्पष्ट केले.
या घटनेनंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. हर्षदा पाटील यांना आर्वाच्य भाषा वापरत अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाने केला आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, सुरक्षित वातावरणात काम करण्याचा हक्क हिरावला जात असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. यापुढे इतर संघटनांकडून देखील मानसिक त्रास व गैरवर्तन घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा रुग्णालय प्रशासनाची बैठक घेत कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आंदोलन झाल्यास ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान, मोफत प्रसूती सेवेमुळे खाजगी रुग्णालयांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने हा प्रकार जाणून-बुजून घडवून आणला असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
श्रमजीवी संघटनेच्या पपदाधिकाऱ्यांकडून बाचाबाची करून हुज्जत घालण्याचा प्रयत्न?
वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासमवेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यानंतर काही वेळामध्ये श्रमजीवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात येऊन बाचाबाची केल्याने गोंधळजन्य परिस्थिती निर्माण झाली.
वाडा पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये झालेल्या वादात हस्तक्षेप करत वैद्यकीय अधिकारी व श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असता संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हुज्जत घालण्यात आल्याने रुग्णालय प्रशासनाकडून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी व प्रशासन कुठली भूमिका घेऊन यावर तोडगा काढते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मी रुग्ण सेवा देत असताना रुग्णाचे नातेवाईक मीरा टोकरे यांनी संघटनेचे भरत जाधव , बाळू लहांगे यांना बोलावून खोटे आरोप करून मला अश्लील शिवीगाळ व असभ्य वर्तन केले. यामुळे माझी मोठी मानहानी झाली आहे. संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी. डॉ. हर्षदा पाटील, वैद्यकीय अधिकारी, वाडा ग्रामीण रुग्णालय
सेवेचा भार, अपमानास्पद वागणूक आणि तरीही अखंड सेवा
- वाडा ग्रामीण रुग्णालय हे 30 खाटांचे रुग्णालय असून येथे 100 खाटांच्या रुग्णालयाची सेवा दिली जाते.
- डॉ. हर्षदा पाटील ह्या स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने वाडा ग्रामीण रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात प्रसूती होतात.
- सोनोग्राफी करिता रुग्णालयात तज्ज्ञ पद अस्तित्वात नसतानाही त्याचा कारभार पाहत आहेत.
- त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांसाठी त्या आशेचा आधार व नवसंजीवनी ठरल्या आहेत.
- वाडा ग्रामीण रुग्णालयात मोफत नॉर्मल व सिझेरियन प्रसूतीमुळे गोरगरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे.
- महिन्याला ८० ते ९० महिलांची मोफत नॉर्मल व सिझेरियन प्रसूती त्या करत आहेत.
- रुग्णांच्या नातेवाईकांकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना अपमानपद वागणूक दिली जात असल्याने मुक्त वातावरणात काम करता येत

