लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना अपयश

रमेश पाटील

वाडा :  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून  ग्रामीण भागाचा विकास व्हावा या उदात्त हेतूने एमएमआरडीएच्या क्षेत्रात दरवर्षी विस्तार करण्यात येतो. या वर्षी ठाणे, पालघर, रायगड या तीन ९८ गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. मात्र मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या वाडा तालुक्यातील क्षेत्राला पुन्हा एकदा नवीन विस्तारित क्षेत्रातून वगळण्यात आले आहे.

 वाडा तालुक्यात गारगाई व पिंजाळ हे दोन मोठे पाणी प्रकल्प प्रस्तावित आहेत. या दोन्ही प्रकल्पांचे पाणी मुंबई महानगराला या पुढे जाणार आहे. या अनुषंगाने या भागाचा विकास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा हद्द वाढीचा प्रस्ताव अलीकडेच राज्य सरकारसमोर सादर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील एकूण ९८ गावे घेण्यात प्रस्तावित करण्यात आली आहेत. मात्र यामधून वाडा तालुका पूर्णपणे वगळण्यात आला आहे. शासनाने ९ सप्टेंबर २०१९ रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विस्तारित क्षेत्रात भिवंडी, वसई, पालघर तालुक्यातील १९४९ चौरस किलोमीटर क्षेत्र नव्याने समाविष्ट केले होते. मात्र या वेळी या क्षेत्रात वाढ केलेली नाही.

दरम्यान, एमएमआरडीएच्या माध्यमातून या भागाचा विकास झाला तरच या भागात पायाभूत सुविधा उपलब्ध होऊन मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, याकडे वाडा येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश आकरे यांनी प्राधिकरणाचे लक्ष वेधले आहे.

अपयशाचे धनी कोण?

गेल्या काही वर्षांपासून एमएमआरडीएच्या क्षेत्रात वाडा तालुक्यातील औद्योगिक पट्टा समावेश करण्यात यावा, अशी मागणी येथील सर्वच लोकप्रतिनिधींनी केली होती. पण यश आले नाही. सध्या राज्यात आघाडीची सत्ता आहे. व वाडा तालुक्याला लाभलेले तिन्ही आमदार सत्ताधारी आघाडी पक्षाचे आहेत. तरीही या लोकप्रतिनिधींच्या मागणीला यश का येत नाही, अपयशाचे धनी कोण आहेत, असे येथील नागरिकांकडून बोलले जात आहे.