सप्टेंबरनंतर आता वर्षअखेरीस मुख्यालयातील कार्यालये सुरू करण्याचा सिडकोचा वायदा

पालघर : पालघर जिल्हा मुख्यालय विलंबाने उभारताना करोनाचे कारण पुढे करणाऱ्या सिडकोने प्रशासकीय इमारतींमधील कार्यालयीन कामकाज सप्टेंबर अखेपर्यंत सुरू करण्याचे दिलेले आश्वासन पुन्हा लांबणीवर पडले आहे. या दोन्ही इमारती वर्षां अखेरीस कार्यरत होणार असल्याचे सिडकोतर्फे सध्या सांगण्यात येत असून नवीन वर्षांतच प्रशासकीय इमारतीमधील ५९ कार्यालय सुरू होऊ शकतील अशी स्थिती आहे.

पालघर जिल्हा मुख्यालय उभारताना करोना संक्रमणामुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे विलंब झाल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. १९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते पालघर जिल्हा मुख्यालय संकुलाचे उद्घाटन करण्यात आले त्या प्रसंगी सिडकोच्या अधिकाऱ्याने दोन्ही प्रशासकीय इमारती सप्टेंबरअखेपर्यंत कार्यरत होतील, असे कार्यक्रमादरम्यान सांगितले होते.

सद्यस्थितीत २९ कार्यालय असणाऱ्या प्रशासकीय इमारत ‘अ’चे काम काम पूर्ण झाले असून ३० कार्यालय असणाऱ्या प्रशासकीय कार्यालय ‘ब’ चे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सिडकोतर्फे सांगण्यात आले आहे. उच्च दाब विद्युत प्रणालीचे लघुदाब विद्युत प्रणालीमध्ये रूपांतर करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विनंती प्राप्त झाल्याने या इमारतींचे काम पूर्ण होण्यास विलंब झाल्याचे सिडकोतर्फे कारण पुढे करण्यात आले आहे.

प्रत्यक्षात सिडकोच्या कारणांवर जिल्हा प्रशासन असहमत असून जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयांची कामे पूर्ण करून ती कार्यालय घाईघाईने कार्यरत करण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ त्या ठिकाणी वापरल्याने प्रशासकीय इमारतीच्या कामांकडे दुर्लक्ष झाल्याचे प्रत्यारोप केले जात आहेत. विद्युत प्रणालीमधील बदल करण्याच्या सूचना ६-८ महिन्यांपूर्वी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. १ सप्टेंबरपासून या तिन्ही कार्यालयात कामकाज सुरू असले  तरी इमारतीतील अनेक लहान-मोठी कामे अजूनही सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.

सिडको इमारतीच्या उभारणीत होणाऱ्या विलंबाची वेगवेगळी कारणे पुढे येत असली तरी ठेकेदाराची अकार्यक्षमता, मनुष्यबळ आणि नियोजनाचा अभाव त्यामागील प्रमुख कारण असल्याचे आरोप होत आहेत.

पाण्याचा तुटवडा

जिल्हा मुख्यालय संकुलासाठी दोन दशलक्ष घनमीटर प्रतिदिन (एमएलडी) इतक्या पाण्याची गरज भासणार आहे. पालघर नगरपरिषदेने या संकुलाला तूर्तता एक एमएलडी पाणी मंजूर केले आहे. मात्र त्यापैकी निम्म्या प्रमाणात प्रत्यक्षात पाणी उपलब्ध होत असल्याचे सिडकोने सांगितले असून कार्यरत असणाऱ्या इमारतीमध्ये पाण्याची कमतरता भासत आहे. परिणामी शौचालयाच्या परिसरात दुर्गंधी पसरत असून सुंदर इमारतींमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांचा या दुर्गंधीमुळे हिरमोड होत असल्याचे दिसून येते.

खुर्च्या बदलण्यास आरंभ

पालघर जिल्हा परिषदेने जिल्हा अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य सभागृह, विषय सभापती दालनांमध्ये मांडण्यात आलेल्या खुर्च्यांना पाठ टेकण्यासाठी पुरेशा प्रमाणात आधार नसल्याचे तसेच या खुर्च्या कमकुवत असल्याच्या तक्रारी सिडकोकडे केल्या होत्या. या नापसंत खुर्च्या बदलण्याचे सिडकोने आश्वासन दिले होते. त्यानुसार   खुर्च्या  बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, असे सिडकोतर्फे सांगण्यात आले.