scorecardresearch

कचरा तुडवत स्मशानभूमीची वाट; वाडा नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

वाडय़ातील एकमेव असलेली  स्मशानभूमी कचऱ्याच्या विळख्यात सापडली आहे. एखाद्या मृत व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी येथे नेताना अक्षरश: कचरा तुडवत न्यावे लागते.

कचरा तुडवत स्मशानभूमीची वाट; वाडा नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

वाडा:  वाडय़ातील एकमेव असलेली  स्मशानभूमी कचऱ्याच्या विळख्यात सापडली आहे. एखाद्या मृत व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी येथे नेताना अक्षरश: कचरा तुडवत न्यावे लागते. अशी परिस्थिती असतानाही हा कचरा उचलण्याकडे वाडा नगरपंचायत दुर्लक्ष करीत असल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

वाडा शहराची ३५ हजारांहून अधिक लोकसंख्या आहे.  वाडा शहरासाठी सिद्धेश्वरी येथे वैतरणा नदीकिनारी वाडा नगरपंचायतीच्या मालकीची एकमेव स्मशानभूमी आहे.  येथील लोखंडी कठडय़ासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी खांबावर चोरटय़ांनी डल्ला मारला आहे. यामुळे मृत व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्यास येथे अडचणी येत आहेत. असे असताना आता या स्मशानभुमीलाच येथील नगरपंचायतीच्याच  कचराभुमीचा विळखा बसला आहे.    कचरा या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीपर्यंत पोहचला  आहे.  बुधवारी वाडा शहरात एका व्यक्तींचे निधन झाले. त्यांना येथील स्मशानभूमीत घेऊन  जाताना नातेवाईक, ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागली होती. कचऱ्यातून वाट काढताना अंत्यविधीसाठी बाहेरगावाहून आलेल्या नातेवाईकांनी नगरपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला होता.

‘कागदावरची कचराभूमी जमिनीवर कधी येणार?’

 नगरपंचायत प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून कचराभूमीसाठी जागा खरेदी केली असून तिचे काम प्रगतिपथावर असल्याचे आश्वासन  वर्षभरापासून प्रशासनाकडून  दिले जात आहे. मात्र आजतागायत ही नवीन कचराभूमी कागदावरून प्रत्यक्षात जमिनीवर आलेली नाही. ती कधी येईल याबाबत विचारले असता नगरपंचायत प्रशासन अथवा येथील पदाधिकारी बोलायला तयार नाहीत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

वाडा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयाच्या लगत असलेली कचराभूमी हटवावी ही मागणी गेल्या तीन वर्षांपासून आम्ही सातत्याने करीत आहोत. मात्र ढिम्म प्रशासन लक्ष देत नाही.

-राजेंद्र समेळ, रहिवासी.

कचराभूमीसाठी खरेदी करण्यात आलेल्या जागेबाबत काही तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे उशीर झाला, सर्व अडचणी दूर झाल्या आहेत, लवकरच नवीन जागेत कचराभुमी स्थलांतरित होईल.

-राम जाधव, नगरसेवक, नगरपंचायत, वाडा.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या