निखिल मेस्त्री
पालघर: पालघर तालुक्यातील समुद्र किनारपट्टी भागातील एडवण, दातिवरे, कोरेसह आठ ते दहा गावांचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अस्तित्वात असल्या तरी त्या सदोष असल्यामुळे प्रत्येक घरांमध्ये पाणी पोहोचत नाही. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांमध्ये तालुक्यातील गावांना पाण्याची झळ सोसावी लागते. या महिन्यांत विविध जलस्त्रोतांची पातळी खालावते. किनारपट्टीतील गावे असल्यामुळे जलस्रोत असलेल्या विहिरी, झऱ्यांमध्ये खारे पाणी मिसळून ते पिण्यायोग्य राहत नाही. चार महिने ही गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून असतात. मात्र त्या योग्यरीत्या कार्यान्वित नसल्याने ग्रामस्थांना पाणी खरेदी करण्याशिवाय पर्याय उरत नाही. जी कुटुंबे सधन आहेत, अशी कुटुंबे विकत पिण्याचे पाणी आणतात. मात्र मध्यमवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकातील ग्रामस्थांना ते परवडत नाही.
अलीकडच्या काळामध्ये झांझरोली धरणाच्या कामामध्ये सुमारे दहा ते बारा दिवस ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल झाले होते. प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असताना सेवाभावी संस्थेने टँकरद्वारे पाणी नेऊन ग्रामस्थांना दिलासा दिला होता.
दरम्यान किनारपट्टीतील गावांना जाणवत असलेली पाणीटंचाई लक्षात घेत जिल्हा परिषदेने आराखडा तयार करून पाणीप्रश्नावर मात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी मागणी समोर येत आहे.
गावामध्ये असलेले पाणीस्रोत व पाणीसाठे पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. शाश्वत पाण्यासाठी कोणावर अवलंबून न राहता गावातच पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध करून दयावा, अशी मागणी आहे. त्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार करून त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. – सचिन माणिक वर्तक, उपसरपंच, एडवण.
ज्या वेळी पाणी प्रश्नाच्या समस्या उद्भवतात. त्या वेळी त्या सोडवल्या जातात. किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये जल जीवन मिशनअंतर्गत काही योजना पुनरुज्जीवित तर काही नव्याने मंजूर करण्यात येत आहेत. यामुळे प्रत्येक घरामध्ये मुबलक पाणी मिळेल अशी आशा आहे. – वैदेही वाढाण, अध्यक्षा, जि.प.पालघर
चटाळे गावाचा आदर्श
कोणत्याही योजनेवर अवलंबून न राहता चटाळे या ग्रामपंचायतीने स्वत:च्या गावातच उपलब्ध असलेला तलाव पुनरुज्जीवित करून त्या तलावातील पाण्याचा वापर गावासाठी करून स्वावलंबनाचा मार्ग निवडला व तेथील पाणीप्रश्न दूर केला होता. याच धर्तीवर इतर गावांमध्येही असा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
राजकारणात ग्रामस्थांचे हाल
पाण्यावाचून नागरिकांना हाल सहन करावे लागल्याने प्रथमत: आ. राजेश पाटील यांनी तातडीच्या उपाययोजनांसाठी प्रशासनाला पत्राद्वारे सूचना दिल्या. त्यानंतर या समस्यांसाठी विविध लोकप्रतिनिधी यांनी येथे धाव घेतली व आपण त्यासाठी प्रयत्न केल्याचे दाखवण्यात आले. एकंदरीत नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न बाजूला सारून येथे राजकारण व श्रेयवाद उफाळून आला. त्यानंतर आताही नागरिकांच्या पाण्याची समस्या कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water problem coastal villages palghar taluka serious faulty water supply scheme hits villagers amy
First published on: 18-05-2022 at 00:06 IST