डहाणू : डहाणू किनारपट्टीवरील गावांमध्ये भर उन्हाळय़ात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील गावांना आठ दिवसाआड पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. दुरुस्तीच्या कामामुळे ही टंचाई निर्माण झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
डहाणू किनारपट्टी भागांतील २२ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गाव खेडय़ापडय़ांना बाडा पोखरण प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत साखरे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु पाणीपुरवठा विभागाचे नियोजनशून्य कारभारामुळे या परिसरात भर उन्हाळय़ात पाण्यासाठी महिलांवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. किनारपट्टीवरील चिंचणी, तनाशी, वरोर, गुंगवाडा, ओशार, वासगाव, तडियाले, धाकटी डहाणू, वानगाव या गावांना आठ दिवसाआड पाणी मिळत आहे. गेल्या आठ दिवसांपासून पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांचे हाल सुरू आहे.
याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण्, वाणगाव विभाग कार्यालयातील शाखा अभियंता तांडेल यांना विचारले असता साखरे धरणाच्या जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला आहे. येत्या दोन दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले.