डहाणू : उन्हाळयात पाणीटंचाई भासू नये म्हणून कृषी विभागातर्फे डहाणू तालुक्यातील ओहोळांवर पक्के सिमेंट बंधारे गेले, मात्र या बंधाऱ्यात पाणीच नसल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
डहाणू तालुक्यातील ओहोळांवर पक्के सिमेंट बंधारे घालून पावसाचे पाणी अडवून जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी, आजूबाजूची जमीन ओलिताखाली आल्यास लगतचे शेतकरी या पाण्यावर उन्हाळी शेती करतील यासाठी प्रत्येक गावागावांत मोठय़ा संख्येने सिमेंट बंधारे घालण्यात आले. या पाण्याचा आपल्याला फायदा होईल, या आशेने ग्रामस्थांनीही या सिमेंट बंधाऱ्यासाठी कृषी विभागाला मोठे सहकार्य केले. आष्टा, रायपुर, सायवन, दाभाडी, दिवशी, चळणी, धुंदालवाडी, हळाद्पाडा, चरी, पावन, आंबोली, चारोटी , रानशेत , ऐणा, दाभोन, , वारोती, तवा, बऱ्हाणपूर, तलवाडा, सूर्यनगर, शिसने या ठिकाणच्या ओहोळांवर बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, पावसाळा संपताच काही दिवसांनी या बंधाऱ्यामधील पाणी निकृष्ट बांधकामामुळे बंधाऱ्यांना गळती लागून बंधारे कोरडे पडले आहेत. शिसने पाटीलपाडा ओहोळांवर कृषी विभागामार्फत घालण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही नाही. सिमेंट बंधाऱ्यावर लाखोचा खर्च होत असताना बंधारे मात्र निकृष्ट सिमेंट आणि साहित्यामुळे फुटतात. त्यामुळे बंधारे केवळ ठेकेदाराच्या फायद्यासाठीच का? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. ‘बिले पास झाली मात्र बंधारे फेल गेले’, असा संताप या गावातील ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.