विजय राऊत
कासा : पालघर जिल्ह्यात धामणी, कवडास अशी दोन मोठी धरणे आहेत या धरणातून शहरी भागात पाणीपुरवठा केला जातो. परंतु जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात पाणीटंचाईची समस्या कायम आहे. तालुक्यातील अनेक गाव -पाडे हे अनेक वर्षांपासून आजही तहानलेलेच आहेत.
मोखाडा तालुक्यात १५७ पाडे व ५९ महसूल गावे आहेत. निम्म्यापेक्षा अधिक गावपाडय़ांना दरवर्षीच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून जल स्वराज्य योजना, शिवकालीन टाक्यांची योजना, रोजगारासाठी हमी योजनेंतर्गत विहिरी बांधणे अशा अनेक कोटय़वधी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या. परंतु या योजना फोल ठरल्या आहेत.
सन २०१५ ते २०२१ या सात वर्षांच्या कालावधीत चार कोटी ५४ लाख ७५ हजारपेक्षा अधिक रुपयांचा खर्च झाला आहे. तसेच मागील दोन वर्षांत टँकरवर अतिरिक्त स्वरूपात खर्च झाला आहे. मात्र निधी मागील २ वर्षांत उपलब्ध झाला नसल्याचे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले आहे. मोखाडय़ात प्रतिवर्षी जानेवारी ते फेब्रुवारीपासून पाणीटंचाईला सुरुवात होते. दरवर्षीच लाखो-करोडोचा टैंकरच्या नावाखाली खर्च होत आहे.
गावपाडय़ांना २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदा उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे टंचाईग्रस्त गावपाडय़ांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या भागात प्रचंड पाणीटंचाईची माणसालाच काय तर जनावरांना देखील त्याची दाहकता जाणवत आहे. दरवर्षी केलेल्या कोटय़वधी खर्चात या ठिकाणी छोटे-मोठे पाण्याचे स्तोत्र करता आले असते. मात्र टँकर लॉबीशी प्रशासनाचे साटेलोटे आहे का असा प्रश्न उपस्थित केले जात आहे. जलजीवन मिशन आणि
अन्य पाणी पुरवठा योजना या कागदावरच राहिल्या आहेत, असे सांगितले जाते.
तालुक्यातील पाणीटंचाई ही वर्षांनुवर्षे आदिवासींच्या पाचवीलाच पूजलेली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधीनी अनेक वेळा टैकरमुक्तीचा नारा दिला,
अनेक सत्तांतरे झाली, वेळोवेळी सर्वच राजकीय पक्षांकडून टँकरमुक्तीचे आश्वासन दिले गेले, परंतु प्रत्यक्षात टँकरमुक्त मोखाडा ही संकल्पनाह्ण राबविलीच गेली नाही.
जन जीवन मिशन चा सर्वे पूर्ण झालेला आहे जवळपास पाचशे कोटी रुपये इतका खर्च करून हा प्रकल्प उभारला जाईल .-सुनील भुसारा विक्रमगड मतदार संघ आमदार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity mokhada talukabig dams district village thirsty amy
First published on: 17-05-2022 at 00:03 IST