scorecardresearch

विक्रमगडमधील आदिवासी पाडय़ांमध्ये पाणीटंचाई; ग्रामस्थांची टँकरची मागणी

विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या घोडीचा पाडा येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

वाडा : विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या घोडीचा पाडा येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.या पाडय़ात ७० कुटुंबे राहत असून ३०० ते ३५० च्या आसपास लोकवस्ती आहे. पावसाळा सुरू होण्यास अजून दोन महिने बाकी असतानाच येथील ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली आहे. ग्रामस्थांनी या समस्येसंदर्भात खुडेद ग्रामपंचायत प्रशासनाकडे गेल्या दहा दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे, मात्र आजतागायत दखल घेतली गेलेली नाही. घोडीचापाडा येथे दोन विहिरी असुन या विहिरींची भूजल पातळी अतिशय खोलवर गेलेली आहे. पहाटे थोडेफार झिरपणाऱ्या पाण्यासाठी येथील महिलांना पहाटेच्या अंधारात पिण्याच्या पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. खुडेद ग्रामपंचायतीने घोडीचा पाडा येथील रहिवाशांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना केली होती. मात्र ही पाणीपुरवठा योजना गेल्या चार वर्षांपासून बंद असल्याने येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीने तातडीने सुरू करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे. तोपर्यंत या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
येथील विहिरी कोरडय़ा पडल्याने एका खासगी मालकीच्या विहिरीतील पाणी भरण्यासाठी दीड किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत आहे. -कुसुम म्हसे, स्थानिक महिला, घोडीचा पाडा, ता. विक्रमगड.

येथील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी पंचायत समिती अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे. लवकरच टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल. -विश्राम वेडगा, ग्रामसेवक, ग्रामपंचायत खुडेद, ता. विक्रमगड.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water scarcity tribal padas vikramgad demand tanker villagers khuded gram panchayat taluka amy

ताज्या बातम्या