scorecardresearch

तलासरी तालुक्याला ‘कुर्झे’च्या पाण्याचे वेध

तलासरी तालुक्यातला गेल्या २० ते २५ वर्षांपासूनचा पाण्याचा तुटवडा संपवून कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी कुर्झे धरणाचे पाणी मिळण्याची मागणी नागरिक वारंवार करत आहेत.

कासा : तलासरी तालुक्यातला गेल्या २० ते २५ वर्षांपासूनचा पाण्याचा तुटवडा संपवून कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी कुर्झे धरणाचे पाणी मिळण्याची मागणी नागरिक वारंवार करत आहेत. प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
तलासरी तालुक्यात पाण्याची समस्या नवीन नाही. गेले २०-२५वर्षे इथले गाव पाडे, खेडी, वस्त्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. पण यावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना शासनाकडून केली गेलेली नाही. त्यामुळेच तलासरी तालुक्यातील कुर्झे धरणातील पाण्याची मागणी नागरिक करत आहेत. तालुक्यात २० ग्रामपंचायती आणि एक नगरपंचायत मिळून एकूण लोकसंख्या १ लाख ६० हजाराच्या वर आहे. पिण्यासाठी पाणी नसतेच पण शेतीसाठीही पुरेसे पाणी मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हैराण आहेत.
दापचरी येथील दुग्धविकास प्रकल्पाला मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी १९७४साली कुर्झे धरण बांधले होते. परंतु काही वर्षांतच हा दुग्धविकास प्रकल्प बंद पडला. आज मितीस लाखो गॅलन पाण्याचा साठा या धरणात आहे. पण तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याकरता हे पाणी दिले जात नाही. तलासरी या आदिवासी बहुल तालुक्यास सदरच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे, हा मोठा अन्याय आहे, असा येथील शेतकऱ्यांचा आरोप आहे. २०१५ साली दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांनी कुर्झे धरणाचे पाणी तलासरीला मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र प्रशासनाने अद्याप याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही.
कुर्झे धरणाचे पाणी का महत्त्वाचे?
तलासरी तालुक्यात शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भाजीपाला, कडधान्ये, किलगड, मोगरा, झेंडू, आंबा अशी विविध पिके आता येथे घेण्यात येत आहेत. शेतीला बाकी अनुकूल वातावरण आहे, मात्र पाणीटंचाईचे संकटही आहेच. त्यामुळे तलासरी तालुक्याला कुर्झे धरणाचे पाणी मिळाल्यास शेतीसाठी त्याचा नियोजनबद्ध वापर करता येईल. असे झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळून तालुक्यातील स्थलांतरही थांबेल, अशी शक्यता आहे.
कुर्झे धरणात सद्य:स्थितीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. आम्हाला जर या धरणाचे पाणी मिळाले तर पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण थांबेल. शिवाय पुरेसे पाणी मिळाल्यास शेतीलाही चांगले दिवस येतील.-अनिल धोंडी, शेतकरी

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water supply kurze talasari taluka administration amy

ताज्या बातम्या