रमेश पाटील
वाडा : विक्रमगड तालुक्याच्या कार्यक्षेत्रात सूर्या नदीवर धामणी येथे मोठे धरण असतानादेखील या तालुक्यातील आदिवासी लोकवस्ती असलेल्या जवळपास ३५ ते ३८ पाडय़ांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पाडय़ांना केवळ एकच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून त्यामुळे येथील ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
धामणी धरणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर असलेल्या पाणीसाठय़ाचे योग्य नियोजन करून विक्रमगड तालुक्यातील अनेक टंचाईग्रस्त गाव, पाडय़ात पाणीपुरवठा करणे शक्य आहे. येथील बराचसा परिसर डोंगर-माथ्याचा असल्याने या उंच जागी पाणीसाठा करणारी भव्य टाकी बांधून धामणी धरणाचे पाणी या टाकीत नेऊन परिसरातील गाव, पाडय़ांचा कायमस्वरूपी पाणीटंचाई प्रश्न निकाली लागू शकतो, पण तसा प्रस्ताव आजवर कुणीच मांडलेला नाही.
विक्रमगड तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या देहेर्जे धरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. या धरणामध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणीसाठा करून ठेवला तर या धरण परिसरातील गाव, पाडय़ांमधील शेकडो विहिरी, कूपनलिका यांची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल व एप्रिल, मे या महिन्यात या ठिकाणी भासणाऱ्या पाणीटंचाईवर मात करता येईल. मात्र या धरणाचे काम विविध प्रकारच्या कारणांमुळे गेल्या ३५ वर्षांपासून रखडलेले आहे. विक्रमगड तालुक्याच्या मध्यवर्ती भागातून देहेर्जा नदी वाहात आहे, तालुक्याच्या सरहद्दीवरुन पिंजाळी व सूर्या नदी वाहात आहे. मात्र या तिन्ही नदींवर पाणीसाठा करणारे चांगल्या दर्जाचे बंधारे बांधले गेलेले नाहीत, जे बांधण्यात आलेले आहेत त्याचे काम निकृष्ट झाल्यामुळे गळती होऊन पाणीसाठा राहात नाही.
तालुक्यात ३८ पाडय़ात पाणीटंचाई भासत असली तरी प्रशासनाने या तालुक्यात फक्त खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील घोडीचापाडा व या परिसरातील दोन ते तीन पाडय़ांसाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. या परिसरात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईला सुरुवात होते असते. दरम्यान, तालुक्यात काही ठिकाणी असलेल्या मुबलक पाण्याच्या साठय़ाचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे झडपोली येथील सामाजिक कार्यकर्ते व्ही. जी. पाटील यांनी म्हटले आहे.
निकृष्ट दर्जाच्या कामाचा परिणाम
विक्रमगड तालुक्यात पाण्याचे साठे मोठय़ा प्रमाणात असताना नियोजनाचा अभाव असल्याने या ठिकाणी ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ठिकठिकाणी पावसाळय़ातील पाणी अडविले जात नसल्याने या ठिकाणी असलेल्या विहिरी फेब्रुवारी महिन्यापासून तळ गाठायला लागतात. पाणी अडवा, पाणी जिरवा हा उपक्रम या ठिकाणी राबविण्याची आवश्यकता असताना आजवर पाण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये संबंधितांनी निकृष्ट दर्जाचे काम करून पाणी अडविण्यापेक्षा पैसेच जिरविण्याचे काम केल्याचे आरोप ग्रामस्थांकडून होत आहेत.