scorecardresearch

१७ गावांचा पाणीपुरवठा बंद

पाणीपुरवठा योजनेतील विद्युत बिल थकीत असल्याने करवाळे धरणातून होणाऱ्या या १७ गावांचा पाणीपुरवठा गेल्या आठवडय़ाभरापासून खंडित करण्यात आला आहे.

१७ गावांचा पाणीपुरवठा बंद
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

२५ हजार कुटुंबीयांचे हाल; १२ लाख ६७ हजारांची वीज बिल थकबाकी

पालघर : पाणीपुरवठा योजनेतील विद्युत बिल थकीत असल्याने करवाळे धरणातून होणाऱ्या या १७ गावांचा पाणीपुरवठा गेल्या आठवडय़ाभरापासून खंडित करण्यात आला आहे. १२ लाख ६७ हजार १३९ रुपये इतकी वीज देयके थकीत आहेत. त्यामुळे पाण्याविना सुमारे पंचवीस हजार कुटुंबीयांचे हाल होत आहेत.

पालघर तालुक्यातील या गावांमध्ये १७ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत नियमित पाणीपुरवठा होत असे. करवाळे धरणातून या गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. या योजनेसाठी महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा केला जातो. मात्र  या पाणीपुरवठय़ासाठी लागणारी  वीज देयके भरलेली नसल्याने  सफाळे येथील करवाळे धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे.

थकबाकीदार ग्राहकांमुळे  प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरणाऱ्यांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बहुतांश जोडणीधारक ग्राहक ग्रामपंचायतीकडे  पाण्याची देयके भरत नसल्याने ती थकीत आहे. सतरा ग्रामपंचायतमधील ठरावीकच ग्रामपंचायती पाणीपट्टी कर नियमित भरणा करत आहेत; परंतु अनेक ग्रामपंचायत आणि ग्राहकांनी कर भरणा न केल्यामुळे वीज बिल थकीत राहिले आहे. परिणामी  महावितरणने योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. १२ लाख ६७ लाख १३९ रुपये इतकी थकीत रक्कम भरल्याशिवाय पाणीपुरवठा सुरू करता येणार नाही, असे महावितरणकडून सांगण्यात आले. सफाळे परिसरात दोन धरणे असूनही गेल्या दहा वर्षांपासून या ना त्या कारणाने गावांमध्ये पाणीटंचाईसदृश्य स्थिती निर्माण होत आहे. तसेच मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. नागरिक या प्रकारामुळे हैराण असून संताप व्यक्त करत आहेत. या भागातील मोरवणे धरणाखाली काही पाडे असले तरी त्यांनाही पाणी मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

विकतचे पाणी

फेब्रुवारीमध्येही या योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. आता आठवडाभरात तशीच स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे नागरिकांवर विकतचे पाणी पिण्याची वेळ ओढवली होती. २५ हजार कुटुंबांपैकी बहुतांश कुटुंबे ४० ते ५० रुपये देऊन वीस लिटर पाणी दररोज किंवा दिवसाआड विकत घेत आहेत. पाणीपुरवठा पुरवल्या जाणाऱ्या गावांना लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा माणशी ५५ लिटर प्रति दिन पाणी देण्याचे प्रयोजन आहे.

योजना काय?

१७ गाव पाणी योजना २००९ मध्ये सुरू करण्यात आली. करवाळे  धरणाच्या पाण्यातून योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी उंबरपाडा- सफाळे,  कर्दळ, माकणे, मांडे, विराथन बुद्रुक, जलसार, टेंभी खोडावे, मांजुर्लि, करवाले, नवघर, कांदळवन,  वैती पाडा आदी गावांसाठी एकत्रित योजना समिती गठित करण्यात आली. समितीमध्ये स्थानिक जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष तर पंचायत समिती सदस्य व सर्व सरपंच हे समितीचे पदाधिकारी आहेत.

‘थकबाकी का भरावी?’ 

या योजनेत समाविष्ट असलेल्या काही गावांना योग्य त्या दाबाने मुबलक पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे या गावांनी पाणीपट्टी कर भरण्यास नकार दिला व मुबलक पाणी मिळत नसल्याने थकबाकी का भरावी, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे पाणी देयकाचा प्रश्न निर्माण झाला. आमदार राजेश पाटील, जि. प. सदस्य व समिती अध्यक्ष मनीषा निमकर, काही गावचे सरपंच यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र त्यानंतरही परिस्थिती कायम आहे.

पाणीकर भरणे नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे. योजना सुरू ठेवायच्या असतील तर त्या सातत्यपूर्ण चालणे आवश्यक आहे. या पाणीपुरवठा योजनेच्या वीज बिलमध्ये व्याज-चक्रवाढ व्याज असल्याने थकबाकी मोठी दिसत आहे. दोन ते तीन दिवसांत या प्रश्नावर सर्वसमावेशक बैठक घेऊन तो निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

-मनीषा निमकर, अध्यक्ष, सफाळे-कारवाळे व इतर गाव पाणीपुरवठा समिती.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या