लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर: पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गाच्या न्यू सफाळे ते जेएनपीटी दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे रखडलेले काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून दुतर्फा मालगाड्यांची वाहतूक करून यशस्वी चाचणी पूर्ण झाली. यामुळे या मार्गिके वरून डबल डेकर मालगाड्या धावणे शक्य होणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या वसई ते डहाणू दरम्यानच्या उपनगरीय मार्गिकेवरील भार हलका होणार असून या मार्गावर नवीन उपनगरीय सेवा सुरू करण्याचा मार्ग खुला झाला आहे.

पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गाची (डब्ल्यूडीएफसी) ‘जेएनपीटी’ पर्यंतची जोडणी पूर्ण झाली असून, या मार्गावरून जेएनपीटी – न्यू सफाळे विभागात पहिल्या इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी ३१ मार्च रोजी यशस्वीपणे पार पडली. यामुळे आता उत्तर प्रदेशमधील दादरी ते मुंबईतील ‘जेएनपीटी’ दरम्यान अखंड मालवाहू रेल्वेगाडी चालवण्याचा मार्ग खुला झाला.

देशातील मालवाहतुकीला गती देणार्‍या (डब्ल्यूडीएफसी)ची उभारणी ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ कडून (डीएफसीसीआयएल) करण्यात येत आहे. देशाच्या अंतर्गत भागातील मालवाहतूक आणि जेएनपीटी बंदर यामधील वाहतूक अधिक वेगाने व्हावी यासाठी केवळ मालवाहतूक करणारा हा १५०६ किमी लांबीचा दुहेरी रेल्वेमार्ग ठरणार आहे. एप्रिल २००६ मध्ये मंजूर झालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ३० ऑक्टोबर २००६ रोजी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची स्थापना करण्यात आली. दादरी (उत्तर प्रदेश) ते जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी, नवी मुंबई) दरम्यानचा हा मार्ग देशातील सर्वात मोठ्या मालवाहतूक प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमधून हा कॉरिडॉर जातो. दादरी ते संजाण (गुजरात) हा टप्पा लोकसभा २०२४ निवडणुकीपूर्वी सुरू झाला होता. त्यानंतर संजाण (न्यू उंबरगाव) ते न्यू सफाळे दरम्यान रेल्वे मार्गाची यशस्वी चाचणी ११ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आल्यानंतर २६ एप्रिलपासून या मार्गावरची मालवाहतूक सुरू करण्यात आली होती.

या यशस्वी चाचणीनंतर जेएनपीटी ते थेट दादरी दरम्यान मालवाहतूक सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. ३० मार्च रोजी दुपारी १.५८ वाजता ६०१३३ क्रमांकाचे इंजीन जेएनपीटीतील नव्या ‘डीएफसी’ या यार्डातून रवाना झाले. हे इंजीन सायंकाळी ७.२० वाजता न्यू सफाळे स्थानकात दाखल झाले. १०२ किमीचे अंतर इंजिनने पाच तास २२ मिनिटांत पार केले. चाचणी यशस्वी झाल्याने नवा दुहेरी मालवाहतुकीचा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. नव्या रुळांच्या क्षमतेच्या तपासणीसाठी दोन्ही दिशेने कंटेनर जोडलेल्या मालगाड्या चालविण्यात आल्या. जेएनपीटी ते न्यू सफाळे दरम्यान इलेक्ट्रिक इंजीन आणि न्यू सफाळे ते जेएनपीटी दरम्यान डिझेल इंजिनची मालगाडी धावली. एकाच वेळी दोन्ही दिशेने मालगाड्या धावत्या करून संपूर्ण विभागाची तपासणी करून देण्यात आली आहे. ही चाचणी ‘डीएफसीसीआयएल’ चे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. संचालन, पायाभूत सुविधा, विद्युत, सिग्नलिंग आणि प्रकल्प विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

चार तासांची बचत शक्य

पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गाच्या ‘जेएनपीटी’ जोडणीमुळे मालवाहतुकीच्या प्रवास वेळेत चार तासांची बचत शक्य होणार आहे. न्यू मकरपुरा ते ‘जेएनपीटी’ दरम्यान कमी मनुष्यबळात वाहतूक करणे शक्य होणार आहे. ‘डब्ल्यूडीएफसी’ पूर्ण क्षमतेने क़ार्यान्वित झाल्यानंतर मालगाड्यांचा वेळ, वक्तशीरपणातील अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. देशातील मोठ्या बंदराचा विनाअडथळा थेट रेल्वे जोडणीमुळे मालवाहतूक अधिक वेगवान आणि पर्यावरणपूरक होण्यास मदत होईल. परिणामी रेल्वेतून मालवाहतूक करण्याकडे ओढा अधिक वाढेल, असा दावा रेल्वे अधिकार्‍यांनी केला आहे.

७५ उपनगरीय फेर्‍या शक्य

वसई ते डहाणू रोड दरम्यान सध्या सुमारे ५० मालगाड्या धावत असून पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्ग कार्यांन्वित झाल्यानंतर या मालगाड्यांच्या वेळेदरम्यान ७५ ते ८० उपनगरीय फेर्‍या धावू शकतील अशी शक्यता या क्षेत्रातील जाणकाराने व्यक्त केली आहे. विरार ते डहाणू रोड दरम्यान रेल्वे ट्रॅकची वाहन क्षमता संपल्याचे कारण देणार्‍या रेल्वे अधिकार्‍यांना आता सबबीचे हे कारण नव्याने सांगता येणार नाही असे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे.

डबल डेकर मालगाडी धावणे होणार शक्य

समर्पित रेल्वे मालवाहू मार्गीकेवरून डबल डेकर मालगाडी धावेल असे चित्र रंगवण्यात आले होते. महाराष्ट्रामध्ये या मार्गीकेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर मालगाडींची पुढील वाहतूक पश्चिम रेल्वेवरून होत असल्याने तसेच पश्चिम रेल्वेचे अस्तित्वात असणारे विद्युत वाहिनी (ओएचई) ची उंची (५.७० मीटर) ही डीएफसीसी च्या ओएचई (७.५० मीटर) पेक्षा कमी असल्याने डबल डेकर मालगाडी धावणे शक्य नव्हते. आता थेट जेएनपीटी पर्यंत समर्पित मालवाहू लोहमार्ग सुरू झाल्याने डबल डेकर मालगाडी धावणे शक्य होणार आहे.

प्रकल्पाची उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये

* डब्ल्यूडीएफसी प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्टे मालवाहतुकीसाठी वेगवान आणि उच्च क्षमतेची रेल्वे वाहतूक व्यवस्था निर्माण करणे आहे. यामुळे केवळ मालवाहतुकीचा खर्च कमी होणार नाही तर भारतातील उद्योग क्षेत्राची स्पर्धात्मकता वाढून आर्थिक विकासालाही गती मिळणार आहे.

* जेएनपीटी ते वैतरणा हा विभाग सुमारे १०२ किमी लांबीचा असून, तो खारबाव, तळोजा आणि जेएनपीटी या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणार आहे. या विभागात ५३ मोठे पूल, २४२ लहान पूल, तीन वार्ड/स्थानके, १० रोड ओव्हर ब्रिज, नऊ रोड अंडर ब्रिज तसेच सुमारे १.१७ किमी लांबीचे बोगदे उभारण्यात येत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प अभियांत्रिकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे.