पालघर : पश्चिम रेल्वेने उपनगरीय क्षेत्रासाठी १ जानेवारीपासून अमलात आणलेल्या नवीन वेळापत्रकात बहुतांश उपनगरीय गाड्यांची वेळ पूर्वीच्या वेळापत्रकाचा तुलने पाच ते दहा मिनिटे अगोदर करण्यात आले होते. मात्र दैनंदिन प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या अनेक गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे.
पश्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात अनेक गाड्यांचे वेळा बदलण्यात आला असून बहुतांश गाड्या या पूर्वीच्या वेळापत्रकाच्या तुलनेत काही मिनिटे लवकर धावत आहेत. प्रत्यक्षात काही बदल हे प्रवाशांच्या दृष्टीने दीर्घकालीन सोयीचे असले तरीही पश्चिम रेल्वेचे नवीन वेळापत्रक स्थिरस्थव झाले नसल्याने अनेक गाड्या विलंबाने धावताना दिसून येत आहेत. बोरिवली व विरार येथे फलाट व रेल्वे रुळांच्या जोडणीचे काम या विलंबा मागेचे कारण असल्याचे स्थानीय रेल्वे अधिकारी सांगत असले तरी नवीन वेळापत्रकाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने प्रवाशांना गैरसोळीला सामोरे जावे लागत आहे.
विरार सुरत एक्सप्रेस (शटल) ही सायंकाळी पाच वाजता सुटणारी गाडी १ जानेवारीपासून वेळापत्रकातील बदलानंतर सातत्याने उशिराने धावत असून या गाडीतून प्रवास करणार्या नोकरदारांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या गाडीची पालघर रेल्वे स्थानकातील वेळ यापूर्वी पेक्षा १३ मिनिटे लवकर करून ५.२५ करण्यात आल्यानंतर ही गाडी दररोज किमान २० मिनिटे उशिराने येत असल्याचे दिसून आले आहे.
अनेक वर्षे सायंकाळी ५.१० वाजता सुटणार्या सुरत शटलला करोनानंतर एक्सप्रेसचा दर्जा दिला गेला आणि त्या गाडीची सुटण्याची वेळ ५.०५ करण्यात आली होती. या नवीन वेळापत्रकातील बदलानंतर १९००१ डाऊन विरार सुरत एक्सप्रेस विरारहून ५ वाजता सुटून पालघर स्थानकात ५.२५ वाजता येणे अपेक्षित आहे. मात्र वेळापत्रक बदलल्यानंतर ही गाडी सातत्याने २० मिनिटांहून अधिक उशिराने धावत आहे.
विरार सुरत एक्सप्रेस ही गाडी ५९०४६ अप वलसाड विरार पॅसेंजर या स्वरूपात धावत असून दुपारी २.१५ वाजता वलसाडहून सुटल्यानंतर वापी, बोईसर, पालघर आणि सफाळे हे मर्यादित थांबे घेऊन ४.२५ वाजता विरार येथे पोहचणे अपेक्षित आहे. ही गाडी सातत्याने उशिराने धावत असल्यामुळे विरार येथे पोहचल्यानंतर इंजिनची दिशा बदलणे आणि याच वेळी डाऊन दिशेने निझामुद्दीन एक्सप्रेस आणि राजधानी एक्सप्रेस गाड्या धावत असल्यामुळे विरार सुरत एक्सप्रेस सायडिंगला काढून ठेवल्यामुळे या गाडीचे वेळापत्रक कोलमडले आहे.
विरार सुरत रेल्वे सेवेचा वापर पालघर-बोईसर भागातून नोकरी करणारे औद्योगिक कामगार व अधिकारी करतात. ९३०३१ डाऊन चर्चगेट डहाणू लोकल पालघरला ५.१८ वाजता येत असल्यामुळे ५ वाजल्यानंतर सुटणार्या नोकरवर्गाला विरार सुरत सेवेचा आधार आहे. डहाणू पलीकडे घोलवड-बोर्डी-उंबरगाव रेल्वे स्थानकात जाणार्या प्रवाशांना त्यांच्या घरी पोहचायला ३० ते ४५ मिनिटे उशीर होतो. विरार सुरत एक्सप्रेस उशिराने धावत असताना पालघरला त्या गाडीला फलाट क्रमांक एक ऐवजी तीनवर आणले जाते आणि काही शेकडा प्रवाशांना जिना चढून धावपळ करावी लागते.
रेल्वेच्या गडगडलेल्या वेळापत्रकाची नोंद रेल्वे अधिकारी वेदनाशून्य पद्धतीने घेत असून याबाबत सुधारणा न झाल्यास प्रवाशांचा उद्रेक होईल अशी संतप्त भावना प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
९३००४ लोकल देखील विलंबाने
मुंबईकडे कामानिमित्त दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सकाळी ०६.३७ वाजता पूर्वी पालघर स्थानकात दाखल होणारी डहाणू चर्चगेट उपनगरीय सेवा नवीन वेळापत्रकात ०६.२७ वाजता येण्याचे निश्चित करण्यात आले आहे मात्र ही गाडी पालघर येथे अनेकदा १० ते १५ मिनिटे बाजूला काढून साईडिंगला ठेवण्यात येत असून त्यामुळे चर्चगेट कडील पुढील प्रवासा दरम्यान जुन्या वेळापत्रकानुसारच धावत आहे. त्यामुळे या उपनगरीय सेवेची वेळ लवकर करून प्रवाशांना त्रासदायक ठरले आहे.
उपनगरीय सेवा साईलिंगला ठेवण्याचे दुष्टचक्र सुरूच
विरार पलीकडच्या उपनगरीय क्षेत्रात कर्वे रोड, पालघर, बोईसर, वाणगाव या रेल्वे स्थानकात अनेकदा उपनगरीय व शटल, पॅसेंजर गाड्या लूप लाईन वर साईडिंग ला काढून ठेवून लांब पल्ल्याच्या जलद गाड्यांना पुढे जाण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. यामुळे उपनगरीय क्षेत्रातील लोकलचे वेळापत्रक कोलमडत असून प्रवाशांना आपल्या नियोजित स्थानी पोहोचण्यास विलंब होताना दिसून येत आहे.
लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस सुपरफास्ट गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने उपनगरीय गाड्यांना विलंब होत असतो असे उत्तर रेल्वे ने अनेक वेळा दिलेले असून आता ते मुखोदगत झाले आहे. नवीन वेळापत्रकात केले गेलेले बदलही जलदगती मेल एक्सप्रेस गाड्यांची गती वाढावी म्हणून केलेले दिसतात. नव्या वेळापत्रकात झालेल्या बदलांना न्याय देणे ही पश्चिम रेल्वेला कठीण जात आहे. लोकल ट्रेन उशिराने चालणे, मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी लोकल ट्रेन बाजूला काढून ठेवणे. असे प्रकार आजही सुरू असलेले दिसतात. त्यामुळे नवीन वेळापत्रकात प्रशासनाने सामान्य प्रवाशांना वेठीस धरण्याशिवाय दुसरे काहीही केलेले नाही. – हितेश सावे, जनसंपर्क अधिकारी, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था.
