बोईसर: मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान सुनिता रोकडे या प्रसूत मातेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा समोर आलेला आहे. नांदगाव तर्फे मनोर गावच्या हद्दीतील मोहू पाड्याची रहिवासी असलेली सुनीता कोरडा (वय.२४) या गरोदर महिलेला प्रसुती काळा येत असल्याने मंगळवारी सकाळी मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणी अंती नैसर्गिक बाळंतपण शक्य नसल्याने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मनोर ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ यादव यांनी मंगळवारी सकाळी सिझेरियन शास्त्रकिया करून बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर गेले दोन दिवस सुनीता कोरडा हिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान तिच्या शरीरात रक्ताची कमतरता आढळल्याने दोन युनिट रक्त चढवण्यात आले होते. मयत सुनीता कोरडा गुरुवारी सकाळी प्रातर्विधी साठी गेली असताना बेशुद्ध पडली, त्यानंतर तात्काळ तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या उपचारादरम्यान आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी केला.