पालघर : बोईसर येथे नवापूर मार्गावर संजयनगर येथे असणाऱ्या ओहोळावर पूल बांधण्याचे काम धिम्या गतीने सुरू असल्याचे नागरिकांकडून आरोप होत असले तरी या ओहोळात सातत्याने सांडपाणी वाहात असल्याने उभारणीत अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाले आहेत. या मार्गावरील वाहतूक मे महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ववत करण्यासाठी एमआयडीसी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
बोईसर- नवापूर मार्गावर संजयनगर येथे असणाऱ्या ओहोळावरून पावसाळय़ात पाणी वाहात असल्याने त्या ठिकाणची वाहतूक विस्कळीत होत असे. या ठिकाणी छोटा पूल बांधण्यासाठी एमआयडीसीतर्फे काढलेल्या पहिल्या निवेदनाला ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळालेला नव्हता. मात्र दुसऱ्या प्रसंगी काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाल्याने हे काम सुमारे दीड महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून वाहने ओसवाल अथवा यशवंत सृष्टी गृहसंकुल मार्गे रेल्वे स्थानकाच्या परिसरात पोहोचत असतात.
या पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले असता ओहोळातून वाहणारे सांडपाणी रोखण्यासाठी ठेकेदाराने केलेले प्रयत्न विफल ठरले. अखेर हे सांडपाणी उपसण्यासाठी मोठय़ा क्षमतेचे आठ पंप बसविण्यात आले असून पुलाच्या बंदकामासाठी खणलेला भाग कोरडा झाल्यानंतर त्याच्या पायाचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्य:स्थितीत पुलाच्या पायाच्या खालच्या भागात प्लम काँक्रीट करण्यात आले असून येत्या काही दिवसांत पाया भरण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पुढे या पुलाच्या उभारणीसाठी लागणारे लोखंड कापून तयार असून पुलावरील भागाची बांधणी करून मे महिन्याच्या मध्यापर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल यासाठी एमआयडीसी प्रयत्नशील असल्याचे अधिकारीवर्गाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या पुलाच्या उभारणीसाठी मनुष्यबळ कमी असल्याचे व काम धिम्या गतीने सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहेत. यामुळे नागरिकांना वळसा पडत असल्याचा सूर उमटला आहे. मात्र पाया उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक मनुष्यबळाच्या आधारे अहोरात्र काम हाती घेण्यात येईल, असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.