scorecardresearch

मागण्या मान्य केल्यानंतर मालवाहतूक मार्गाचे काम पुन्हा सुरू

मालवाहतूक लोहमार्ग (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर)  रेल्वे प्रकल्पाच्या कामामुळे उद्भवणाऱ्या समस्यांकडे आंदोलनाने लक्ष वेधले असता या कामाची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली.

ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांची पाहणी

डहाणू : मालवाहतूक लोहमार्ग (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर)  रेल्वे प्रकल्पाच्या कामामुळे उद्भवणाऱ्या समस्यांकडे आंदोलनाने लक्ष वेधले असता या कामाची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. या वेळी ग्रामस्थांच्या मागण्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्यामुळे बंद पाडण्यात आलेले प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. फ्रेड कॉरिडॉर रेल्वे प्रकल्पाच्या कामातील भरावामुळे  सरावली मोरपाडा, वाकी मुसळपाडा,  सरावली व इतर ठिकाणी पावसाळय़ात पाणी जमा होऊन ते ग्रामस्थांच्या घरात शिरण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. हे काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप असल्याचा आरोप करत आमदार विनोद निकोले यांनी हे काम बंद पाडले होते. 

कैनाड, वाकी, सरावली येथे रेल्वेलाइन खालून जाणारा रस्ता खोलवरून जात असल्याने, तेथे पावसाळय़ात पाणी भरले जाते. या वेळी सर्व रस्ते बंद होतात. पुलाची उंची कमी असल्याने, त्या खालून वाहने जाऊ  शकत नाही. कंक्राडी पूल बुडत असल्याने कैनाड, वाकी, सरावली, येथे मोठे उंच उड्डाणपूल बांधण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कॉरिडॉरचे व्यवस्थापक एल. एन. राव म्हणाले की, पूर्वी केलेल्या सव्‍‌र्हेनुसार झालेल्या नियोजनाप्रमाणे सध्या काम केले जात आहे. त्यात नव्याने सुधारणा कराव्या लागल्यास प्रत्यक्ष जागेची पाहणी करून, त्याप्रमाणे मंजुरी मिळाल्यानंतरच ती केली जातील, असे सांगितले.  पाहणी दौऱ्यात डहाणू विधानसभा मतदारसंघाचे माकप आमदार कॉ.विनोद निकोले, तहसीलदार अभिजित देशमुख, फ्रंट कॉरिडोरचे व्यवस्थापक एल. एन. राव, इरकॉन व्यवस्थापक प्रवीण कुमार, उपअभियंता अजय जाधव, माजी नगराध्यक्ष मिहीर शहा, कॉ. चंद्रकांत गोरखना आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Work on the freight route resumes after demands met ysh

ताज्या बातम्या