scorecardresearch

ग्रामीण भागातील अकुशल मजुरांची मदार रोजगार हमी योजनेतील कामावर

जिल्हा परिषदेच्या शाळांना संरक्षक िभती बांधण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला.

मनुष्यदिन निर्मितीमध्ये पालघर जिल्हा आघाडीवर, १०० टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्टपूर्ती

पालघर : जिल्हा परिषदेच्या शाळांना संरक्षक िभती बांधण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला. या भिंती बांधण्याचे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत केले जाणार असून कुशल – अकुशल मजूर यांना ही कामे मिळणार आहेत. योजनेत दिल्या जाणाऱ्या मजुरी व्यतिरिक्त लागणारी मजुरी जिल्हा नियोजन निधीमधून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील ११० शाळांमध्ये आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत पाच कोटीपेक्षा जास्त रकमेची तर सर्वसाधारण योजनेअंतर्गत ४८ शाळांमध्ये एक कोटीपेक्षा जास्त रकमेच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर कुशल अकुशल मजुरांना या योजनेअंतर्गत कामे प्राप्त होणार आहेत.

विक्रमगड, जव्हार, वाडा, मोखाडा, पालघर या तालुक्यांमध्ये रोजगार हमी योजनांच्या कामांवर मोठय़ा प्रमाणात अकुशल मजूर कामाची मागणी करताना दिसत आहेत. रोजगार हमी योजनेमध्ये मनुष्यदिन उपस्थितीमध्ये जिल्हा संपूर्ण राज्यात दुसऱ्या तर निर्मितीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. याचबरोबरीने आदिवासी मजुरांना काम देण्यामध्येही राज्यात पालघर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. मनुष्यदिन निर्मितीमध्ये पालघर जिल्ह्याने १०० टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य केले आहे. दिलेल्या उद्दिष्टापैकी आत्तापर्यंत ३४ टक्के जास्त निर्मिती साध्य झाली आहे. जिल्हा प्रशासनाने कामगार विभागाला या योजनेत सामावून घेऊन त्यांच्यामार्फत माध्यान्न भोजन योजना सुरू केली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात मजूर उपस्थिती राहात आहे. विक्रमगड, जव्हार, वाडा, मोखाडा, पालघर अशा तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या कामांमध्ये सर्वाधिक कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहेत. यासह इतर यंत्रणांचीही कामे सुरू आहेत. तलासरी, डहाणू, वसई या तालुक्यांमध्ये कमी प्रमाणात कामे सुरू असली तरी मजूर उपस्थिती चांगली आहे. 

रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांनी तालुकास्तरावर यंत्रणानिहाय सातत्याने घेतलेल्या बैठका, विविध कामांचा केलेला अंतर्भाव, योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. ग्रामीण भागातील कुशल – अकुशल मजुरांना योजनेत जोडून घेण्यासाठी नवले यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे जिल्हा राज्यात या योजनेअंतर्गत वरचढ ठरत आहे.

  •    रोजगार हमीची कामे सुरू असलेल्या ग्रामपंचायती – २७०
  •    एकूण सुरू असलेली कामे – ११५५
  •    एकूण मजूर उपस्थिती –  ६१८१६
  •    मनुष्यदिन निर्मिती उद्दिष्ट: २३६४४३
  •    मनुष्य दिन निर्मिती साध्य: ३१७७२०६ –  १३४.०९%
  •    ग्रामपंचायत स्तर कामे : ३१.२६%
  •    इतर यंत्रणा कामे : ६८.७४%

जिल्ह्यातील सर्व यंत्रणांच्या समन्वयामुळे व त्यांच्या प्रयत्नांमुळे रोजगार हमी योजनेवर मजूर उपस्थिती समाधानकारक आहे. आणखीन जोमाने प्रयत्न करून या योजनेत असेच सातत्य राखून पालघर जिल्हा रोजगार हमी योजनेसाठी राज्यात आदर्श निर्माण करेल असा पूर्ण विश्वास आहे.

– डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर जिल्हा

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Work unskilled laborers rural areas ysh

ताज्या बातम्या