शिक्षण विभागाच्या कनिष्ठ सहाय्यकांवर आरोप

पालघर : पालघर जिल्हा परिषद कार्यालय सुट्टीच्या दिवशी ठेकेदारांचा अड्डा बनत चालल्याचे उघड झाले आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी प्राथमिक शिक्षण विभाग कार्यालयातील कनिष्ठ साहाय्यक (लेखा) हे चक्क एका ठेकेदारासोबत जिल्हा परिषद कार्यालयात  निविदेसंदर्भात कामकाज करीत असल्याचे आढळून आले.

आदिवासी शिक्षक पात्रताधारक उमेदवारांची आंदोलने सुरू असल्यामुळे त्या कामासंबंधित कर्मचाऱ्यांना रविवारी सुट्टीच्या दिवशी शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषद कार्यालयात बोलावले होते. मात्र, कनिष्ठ साहाय्यक ठेकेदाराच्या निविदेची कामे करीत असल्याचे येथे पाहायला मिळाले.  याबाबत कनिष्ठ साहाय्यक यांना विचारणा केली असता त्यांनी कार्यालयीन काम करत असल्याचे सांगितले तर त्यांच्यासमोर बसलेल्या ठेकेदाराने मी त्यांचा नातेवाईक असल्याचे उत्तर दिले. मात्र प्रत्यक्षात हा ठेकेदार कनिष्ठ साहाय्यक यांचा कोणीही नातेवाईक नसून तो दादर येथील एक ठेकेदार असल्याचे समोर आले. कामानिमित्त कार्यालयात आलेल्या शिक्षणाधिकारी लता सानप यांनी ठेकेदाराला कार्यालयातून बाहेर काढावे, असे आदेश कनिष्ठ साहाय्यक यांना दिल्यानंतर ठेकेदाराने तेथून पळ काढला. कार्यालयीन कामासाठी आलो असल्याचे उत्तर या कनिष्ठ साहाय्यकांनी दिले असले तरी उपोषणासंदर्भात कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे   उत्तरांमध्ये विसंगती आढळून आली.

ठेकेदाराला थेट कार्यालयात घेऊन बसणे, तेही सुट्टीच्या दिवशी, हा प्रकार चुकीचा व गैरप्रकाराला खतपाणी घालणारा आहे. संबंधितांची तात्काळ चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल.

-ज्ञानेश्वर सांबरे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती,जि.प.पालघर

संबंधित कर्मचारी यास कारणे दाखवा नोटीस बजावत आहे. यापुढे असे होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना कार्यालयास दिल्या जातील.

-लता सानप, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि. प. पालघर