जिल्हा परिषद कार्यालयात सूचना न देता गैरहजर आणि उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर : पालघर जिल्हा परिषदेचा नव्याने कारभार सांभाळणारे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी गेल्या दोन दिवसांपासून कार्यालयातील विविध विभागांना तपासणी करिता सकाळी भेट देत असून विना परवानगी व आगाऊ सूचना न देता गैरहजर राहणाऱ्या तसेच कार्यालयात उशिराने येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विरुद्ध कारवाई आरंभली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सुस्तावलेले कर्मचारी सतर्क झाले आहेत.

राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर शासकीय कार्यालयाचे वेळ सकाळी पावणे दहा वाजल्यापासून सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत करण्यात आली होती. मात्र जिल्हा मुख्यालयातील इतर कार्यालयांप्रमाणे जिल्हा परिषदे कार्यालयातील अनेक अधिकारी-कर्मचारी हे सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास येऊन सायंकाळी पाच-साडेपाचला घराकडे निघत होते. जिल्हा परिषदेतील काही अधिकारी चक्क दुपारी जेवणाच्या सुमारास येऊन कामानिमित्त दौऱ्यावर बाहेर जाण्याचा सबबीने कार्यालयातून बाहेर पडत होते.

या पूर्वी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचा हंगामी पदभार सांभाळणाऱ्या एका उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यालयातील तीनपैकी दोन प्रवेशद्वार बंद करून कर्मचाऱ्यांच्या अनियमिततेविरुद्ध कारवाई आरंभली होती. मात्र काही दिवसानंतर जिल्हा परिषदेची परिस्थिती पूर्वपदावर येऊन ठेपली. यामुळे दूरवरून कामासाठी येणाऱ्या नागरिकांना दुपापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत ताटकळत बसावे लागत असे.

भानुदास पालवे यांनी दिवाळी पूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला. दिवाळीच्या सुट्टी शुक्रवारी तसेच आज (सोमवारी) त्यांनी कार्यालयातील विविध विभागांना अचानकपणे भेट देऊन गैरहजर असणाऱ्या तसेच वेळेवर उपस्थित न झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तपशील गोळा केला.

जे अधिकारी कर्मचारी पूर्व परवानगीशिवाय गैरहजर असल्याचे दिसून आले त्यांना सामान्य प्रशासन विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

शुक्रवारच्या अनुभवातून धसका घेऊन नियमितपणे विलंबाने येणारे काही अधिकारी आजपासून वेळेत येऊ लागले आहेत. तर आठवडा अखेरीस मुंबई, ठाणे येथून विलंबाने येणाऱ्या काही अधिकाऱ्यांना या तपासणीचा फटका बसला आहे. विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वक्तशीरपणामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेतील कामकाजाला शिस्त प्राप्त होईल, असा आशावाद निर्माण झाला आहे.

बायोमेट्रिक्स यंत्रणेसाठी प्रक्रिया सुरू

जिल्हा परिषद कार्यालयात नियमितता जोपासली जावी यासाठी जिल्हा परिषदेने बायोमेट्रिक्स यंत्रणा बसविण्यासाठी प्रक्रिया राबवण्यास आरंभ केला असून यामुळे शासकीय कारण सांगून बाहेर फिरणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच विलंबाने येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर चाप बसणार आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zp ceo action against employees who absent and coming late without informing to zilla parishad office zws
First published on: 01-11-2022 at 02:58 IST