News Flash

नवे-जुने, अधिक-उणे आणि आपण

‘आपण जिथे आहोत तिथवर कसे आलो’

‘आपण जिथे आहोत तिथवर कसे आलो’ या विचाराचा धागा ‘आपण जिथे होतो तिथे तरी कसे आलो?’ या विचारांशी जोडलेला आहे. मी विशिष्ट कुटुंबात जन्मलो. विशिष्ट संस्कारात वाढलो. पुण्यासारख्या शहरात आलो आणि राहिलो. माझ्यावरील संस्कारांना माझ्या स्वत:च्या अशा गुणदोषांची जोड मिळाली. या सगळ्यातून माझा प्रवास वैचारिक आणि भौतिकदृष्टय़ा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर होत गेला. हे जसं माझं झालं तसंच इतरांचंही झालेलं आहे. आणि हे होत राहणार आहे. या प्रवासात प्रत्येकाच्या बाबतीत काही सूक्ष्म तर काही ठळक टप्पे असतील. प्रत्येकाची वेगळी कथा असेल. माणसाचा हा जो प्रवास आहे, ‘जनांचा प्रवाह’ जो चालला आहे त्याचं संपूर्ण, सुस्पष्ट आकलन एका व्यक्तीला, एका विचारधारेला होणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी एकत्रितपणे जो खेळ मांडला आहे तो विस्मयचकित करणारा आहे, त्रस्त करणारा आहे, हताश-दु:खी-अस्वस्थ करणारा आहे व कुतूहलाने उत्साहित करणाराही आहे. माणसाविषयी आस्था असेल, करुणा असेल तर माणसांच्या प्रवासाची गोष्ट समजून घेणं आत्मिक समाधान देणारा अनुभव ठरू शकतो.

मला नेहमी असं वाटतं की प्रश्न माणसांचा असण्यापेक्षा माणसांच्या संख्येचा असतो. ‘परंपरा’ आणि ‘नवता’ या दोन्हीकडे बघताना हे लक्षात ठेवावं लागतं. मी जेव्हा एखाद्या गोष्टीला ‘परंपरा’ म्हणतो तेव्हा ती गोष्ट काही जणांच्या जीवनशैलीचा भाग असते. कदाचित तेही त्या गोष्टीकडे ‘हे परंपरेने चालत आलेलं आहे’ अशा दृष्टीने, ‘परंपरा’ नामक काहीएक चीज अस्तित्वात आहे हे मान्य करून बघत असतील. पण त्यामुळे त्यांच्या मनात संघर्ष निर्माण होत नाही. माझ्या मनात तो होतो. मला ‘नवता’ आकर्षित करते. पण मी इथे स्वत:ला एक प्रश्न विचारला पाहिजे. तो असा की परंपरेचं काटेकोर पालन करणारा एखादा मनुष्य कधीच काही ‘नवीन’ करत नाही का? परंपरा आणि नवता या संज्ञा बहुतेकदा धर्म, श्रद्धा, नैतिकता या संदर्भात आणि सामाजिक व्यवस्थेच्या मूल्यांसंदर्भात वापरल्या जात असल्याने जगण्याची इतर अंगे – ज्यात व्यावसायिक, आर्थिक अंग प्रमुख आहे – दुर्लक्षित राहतात. एखादा धार्मिक, सश्रद्ध माणूस आहे. तो त्याबाबतीत परंपराप्रिय आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण तोच माणूस एखाद्या कंपनीत ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ विभागात महत्त्वाचं काम करतो आहे, त्याच्यात संशोधनाबद्दल आस्था आहे. म्हणजे धार्मिकदृष्टय़ा तो परंपरेचा पाईक असला तरी त्याच्या कार्यक्षेत्रात तो नवतेचा पाईक आहे. वरील प्रश्नाच्या जोडीने येणारा दुसरा स्वाभाविक प्रश्नही मी स्वत:ला विचारला पाहिजे – नवतेकडे आकृष्ट होणारा कधीच परंपरेचा आधार घेत नाही का? हे प्रश्न आणि त्यांची वास्तव उत्तरे आपल्याला सांगतात की माणूस एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आणि एक ‘सामाजिक घटित’ म्हणून एकाच वेळी जगत असतो. आपण दुभंग व्यक्तिमत्त्वाविषयी ऐकतो. मला तर वाटतं की माणूस दुभंग तर असतोच, पण तो शतभंगही असू शकतो. त्याच्या जगण्याचे अनेक धागे असतात. तो कधी एखादा धागा सोडून देतो, कधी तोच धागा धरून ठेवतो.

माणसाच्या या ‘धरसोडी’चा सूक्ष्म विचार केला तर असं लक्षात येईल की त्यामागे ‘स्वार्थ’ ही प्रमुख अंत:प्रेरणा कार्यरत असते. एक उदाहरण घेऊ. एखादा मनुष्य कौटुंबिक दबावामुळे परंपरेचं पालन करत असेल तर सकृतदर्शनी ‘तो स्वार्थी आहे’ असं आपण म्हणणार नाही. परंतु आपण थोडं अधिक खोलात जाऊ. कौटुंबिक दबावाला झुगारण्याची दुसरा पर्याय निर्माण करण्याची ताकद माझ्यात नाही, त्यामुळे सध्या या चौकटीत राहणंच श्रेयस्कर आहे अशा विचाराने जेव्हा बंधनं स्वीकारली जातात तेव्हा तो ‘स्वार्थी’ विचार असतो हे स्पष्टीकरण आपल्याला मान्य होईल. यासाठी ‘स्वार्थ’ या एकाच संकल्पनेची विविध रूपे लक्षात घ्यायला हवीत. स्वार्थ ही स्व-केंद्री संकल्पना आहे हे बरोबरच आहे. पण त्यातही ‘स्व-विलासी’ आणि ‘स्व-विरोधी’ असा फरक करता येईल. पहिल्यात ‘स्व’चे थेट सुख, तशा सुखाची आकांक्षा आहे. दुसऱ्यात ‘स्व’च्या इच्छेला मुरड घालून, तडजोड करून ‘स्व’रक्षणार्थ मिळवलेलं ‘मानीव’ सुख आहे. मनुष्याकडे ‘स्वार्थी माणूस’ म्हणून पाहिलं तरी त्या स्वार्थाची उकल करता आली तर मनुष्याच्या वागण्यातल्या ‘विसंगतीची संगती’ लावायला मदत होईल.

तत्त्वज्ञानात द्वंद्ववाद (dualism) ही एक संकल्पना आहे. ही संकल्पना दोन विरुद्ध तत्त्वांचा संघर्ष मांडते. माणसाच्या मनाबाबत मला असं जाणवतं की संस्कृतीजन्य ‘विवेक’ आणि उत्क्रान्तीजन्य ‘विद्रोह’ हा मनाचा एक मुख्य संघर्ष आहे. मन हे कायम या द्विस्थितीमध्ये (dual mode) असतं. इतकंच नाही तर कुठल्याही गोष्टीला ‘एकच बाजू’ नसते, दोन बाजू असतात असं जे आपण म्हणतो त्याअर्थीही मला द्वंद्ववाद महत्त्वाचा वाटतो. ‘एक’ असं काही नसतं, ‘दोन’ असतं, ‘एका’वरच सगळा भार नाही, जे आहे ते ‘दोघां’चं आहे हे समजणं माझ्यासाठी वेळोवेळी महत्त्वाचं ठरलं आहे. याच तर्काने परंपरेचा, नवतेचा किंवा अन्य कुठल्याही संकल्पनेचा ‘एक आणि एकच’ खुलासा करता येत नाही. संकल्पना, विचार विविध पदर घेऊन येतात. त्या सगळ्या बाजूंचं आपलं आकलन जसजसं वाढत जातं तसतशी आपली वाढ होत जाते. हा विचार केंद्रस्थानी ठेवून आपण या सदराची वाट चालणार आहोत.

‘परंपरा आणि नवता’ हे विंदा करंदीकर यांच्या एका समीक्षात्मक पुस्तकाचे शीर्षक आहे. या सदराविषयी संपादकांशी चर्चा करताना हे नाव सदराच्या विषयवस्तूसाठी मला अगदी समर्पक वाटलं. सार्वजनिक चर्चाविश्वातील अनेक चर्चा या विषयाच्या कक्षेत येतात. साहित्य, कला, सामाजिक प्रबोधन इथपासून राजकीय विचार, विज्ञान-तंत्रज्ञान, आर्थिक-व्यावसायिक क्षेत्र, शेती इथपर्यंत अनेक घटकांना हा विषय स्पर्श करतो. या विषयाचा विचार करताना आपण एक लक्षात ठेवू की ‘परंपरा आणि नवता’ हा एक मोठा ‘स्पेक्ट्रम’ आहे. यात व्यक्तिजीवनातील आणि समाजजीवनातील अनेक अंगे सामावली जाऊ शकतात. त्या सर्वच अंगांविषयी काही मांडणी करण्याची माझी पात्रता नाही. परंतु माझे जे आस्थाविषय आहेत त्याबाबत बोलायला, खरं म्हणजे संवाद साधायला आवडेल. मात्र आपण या संवादात एक काळजी घेऊ. परंपरा म्हणजे ‘क्ष’ नावाची एक गोष्ट आहे आणि ‘नवता’ म्हणजे ‘य’ नावाची एक गोष्ट आहे अशा साचेबद्ध पद्धतीने आपण या संकल्पनांकडे बघायला नको. वैचारिक खुलेपणाने परंपरा आणि नवता या दोन्ही संकल्पनांकडे पाहूया.

‘जे आहे ते’ आणि ‘जे वाटतंय ते’ या द्वंद्वात माणूस अडकलेला असतो. या द्वंद्वाची धार कमी-जास्त होत असते, पण द्वंद्व संपत नाही. माणसाचं हे एक प्रमुख वैशिष्टय़ आहे आणि ते सर्जनशीलतेचं उगमस्थानही आहे. या द्वंद्वाचा शोध घ्यावा आणि काही धागे आपल्याला सोडवता येतात का ते पाहावं हा या सदरामागचा माझा उद्देश आहे. तो सफल होतो की नाही हे आता वाचकांच्या प्रतिसादावरूनच ठरेल!

उत्पल व. बा.

utpalvb@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2018 4:50 am

Web Title: articles in marathi on creativity skills in human brain
Just Now!
X