माझी एक फार जुनी इच्छा आहे. गमतीशीर वाटेल, पण आहे. रस्त्यात किरकोळ अपघात बरेचदा घडतात. एखादी गाडी दुसरीला ठोकते. कधी वेगामुळे, कधी ‘ब्लाइंड टर्न’वर दोन वाहनांची टक्कर होते. आमच्या घरासमोर एक छोटा चौक आहे. तिथे असं बरेचदा घडतं. गंभीर स्वरूपाचं कधी काही घडलेलं नाही; पण किरकोळ धक्का आणि परिणामी शाब्दिक बुक्की असा एक कार्यक्रम होतो. या कार्यक्रमात दोघेही जण ‘मी कसा बरोबर होतो’ हे प्रामुख्याने सांगत एक ‘प्रेमळ’ संवाद सुरू करतात. पुलंची ‘म्हैस’ आठवायची झाली तर ‘बा’चा ‘बा’ची सुरू होते! तर माझी इच्छा ही की, कधी तरी आपल्याला असं दृश्य बघायला मिळेल ज्यात ज्यांचा अपघात झाला आहे ते दोघे शांतपणे ‘हा अपघात नक्की का आणि कसा घडला’ याची चर्चा करतील, एका निष्कर्षांवर येतील आणि तोडगा काढून आपल्या वाटेने निघून जातील. आजही लोक तोडगा काढतातच, पण ती प्रक्रिया काही सुखावह नसते.

‘प्रश्न विचारण्याने आपण असा काय तीर मारणार आहोत?’ असा प्रश्न, प्रश्न विचारायच्या वृत्तीवर केला जाऊ शकतो, असं मागच्या लेखाच्या शेवटी आपण म्हटलं होतं. त्याचं एक उत्तर म्हणून वर दिलेल्या उदाहरणाकडे आपल्याला बघता येईल. अपघात तर झाला आहे, कुणाची तरी किंवा दोघांचीही चूक तर आहेच, नुकसान तर झालंच आहे – तर आता ‘हे का झालं?’ हा प्रश्नच विचारला नाही तर घटनेचा उलगडा कसा होणार? पण प्रश्न न विचारल्याने ‘मी बरोबर होतो. चूक त्याची आहे’ या गृहीतकानेच वाद सुरू होतो; किंबहुना ‘माझं बरोबरच आहे’ हे गृहीत धरून जे काही बोललं जातं ती चर्चा किंवा विश्लेषण नसून ‘वाद’ असतो. (विचारधारांचे ‘वाद’ होण्याच्या मुळाशी हाच धागा असतो हे लक्षात येईल.) त्यामुळे ‘अपघात कसा झाला?’ हा प्रश्न विचारणं अत्यावश्यक आहे. ‘मी बरोबरच होतो’ हे विधान करणं अनावश्यक आहे. कारण मग विश्लेषण होऊच शकत नाही, उत्तर मिळू शकत नाही.

‘प्रश्न विचारणं’ या गोष्टीचं महत्त्व अतिव्यापक आहे. मी ज्या पेनाने हा लेख लिहिला आणि नंतर ज्या कीबोर्डवर मी तो टाइप केला ते पेन, कीबोर्ड, संगणक या वस्तू निर्माण कशा झाल्या हे मला माहीत नाही. म्हणजे या वस्तू कारखान्यात तयार होतात एवढंच मला माहीत आहे. मला निर्मिती प्रक्रिया माहीत नाही. माझ्या मनात विविध विचार येतात, विकारही येतात, मी माझ्या परीने विश्लेषण करतो – हे कसं होतं, मी ते का करतो याचं निश्चित उत्तर माझ्याकडे नाही. थोडक्यात, माझ्या आसपास मी पाहिलं तर मला शेकडो प्रश्नांची मालिका दिसते आणि आपण अज्ञानी आहोत ही माझी जाणीव तीव्र होत जाते; पण या प्रश्नमालिकेमुळे आणि आपण अज्ञानी आहोत या जाणिवेमुळे मी एकाच वेळी अस्वस्थ होतो आणि शांतही होतो..

अस्वस्थ वाटतं, कारण आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव होते; पण त्याचबरोबर शांत वाटतं कारण ‘आपल्याला जाणीव झाली आहे’ याची जाणीव होते आणि आपला रस्ता योग्य आहे, या रस्त्याने गेलो तरच आपल्याला थोडं काही कळू शकेल हेही जाणवतं. जगात ‘कारणांचा पसारा’ इतका आहे की तो आवरणं जवळजवळ अशक्य आहे; पण जर माझ्या मनात प्रश्न असतील तर माझ्या कुठल्याही कृतीची प्रस्तुतता, योग्यायोग्यता ठरवायला मला मदत होते. दुसरं म्हणजे एखाद्या जरी प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं तेव्हा होणारा आनंद अवर्णनीय असतो. ‘आध्यात्मिक’ या शब्दाला आज फार वेगवेगळे अर्थ आणि संदर्भ येऊन चिकटले आहेत. मी या शब्दाकडे ‘एखादी प्रखर अनुभूती’, ‘मी आणि सृष्टी यांच्यातील एकत्व जाणवण्याचा क्षण’, ‘ज्ञानजाणीव’ अशा अर्थानी बघतो. उत्तर सापडण्याचा आनंद हा अशाच स्वरूपाचा असतो. जगातील अनेक संशोधकांना, शास्त्रज्ञांना याचा अनुभव असतो. आर्किमिडीज ‘युरेका’ असं ओरडत आंघोळ अर्धवट सोडून बाहेर आला ही गोष्ट आपण वाचलेली असते; पण त्या क्षणाचा आनंद फक्त आर्किमिडीजलाच माहीत असतो. हा आनंद महत्त्वाचा आहे, कारण असा आनंद जेव्हा जेव्हा कुणाला झाला आहे तेव्हा माणसाने इतिहासात एक पाऊल पुढे टाकलं आहे. आर्किमिडीज किंवा इतर मोठय़ा संशोधकांइतकी बौद्धिक चिकाटी आपल्याकडे नसेल, पण तरीही आपल्या ज्ञानाच्या मर्यादित परिघातदेखील हा आनंद आपल्याला मिळवता येऊ शकतो. म्हणून प्रश्न विचारण्याचं महत्त्व आहे.

स्त्री-पुरुष संबंध, या दोघांची जीवशास्त्रीय आणि सामाजिक घडण, त्यांच्या लैंगिक संबंधांचं विश्व हा माझ्या आस्थेचा विषय आहे. पौगंडावस्थेपासून आत्तापर्यंत पुरुष म्हणून आणि माणूस म्हणून मी वेगवेगळ्या अनुभवांतून, जाणिवांतून गेलो. पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीवर अन्याय होतो, तिचं शोषण होतं. हे थांबलं पाहिजे. त्यासाठी पुरुषांनी पुढे यायला पाहिजे हे तर कधीच उमगलं होतं; पण ‘पुरुष विशिष्ट प्रकारे वागतो ते का?’ हा विचार सुरू झाला. पुरुषाच्या (आणि स्त्रीच्याही) लैंगिक मनोविश्वाचा मानवी उत्क्रांतीच्या आधारे थोडा अभ्यास केला तेव्हा काही गोष्टी नव्याने समजल्या. ‘पुरुष बलात्कार करतो’ या विधानानंतर अर्थातच ‘हे वाईट आहे, भयंकर आहे. पुरुषांमध्ये सुधारणा व्हायला हवी आहे’ ही विधाने येतात; पण ‘पुरुष बलात्कार का करतो?’ हा प्रश्न विचारला की संशोधनाची सुरुवात होते. ‘संवेदना’ आणि ‘संशोधन’ या दोन्ही परस्परपूरक गोष्टी आहेत. केवळ संवेदना असेल तर उत्तर सापडणार नाही. केवळ संशोधन असेल तर संशोधनाचा उचित उपयोग कसा करायचा, संशोधन ‘राबवायचं’ कसं हे कळणार नाही. संवेदनेतून कार्यकारणभाव कळत नाही. तो संशोधनातूनच कळू शकतो. ‘पुरुष असा का वागतो?’ हा प्रश्न आणि पुढचा अभ्यास हा माझ्यासाठी ‘युरेका’ क्षण होता. हेच लग्नसंस्थेबाबतही झालं. ‘नवरा’ ही समस्या नाही आहे आणि ‘बायको’ हीही समस्या नाही आहे – समस्या ‘लग्न’ ही आहे याची जाणीव झाली तेव्हा लग्नसंस्थेमध्ये लवचीकता कशी आणता येईल, असा विचार सुरू झाला. स्त्री-पुरुष संबंधांचं ‘गतिशास्त्र’ (डायनॅमिक्स) पाहताना प्रत्येक ठिकाणी ‘का?’ हा प्रश्न विचारला तरच आपण उत्तरांकडे जाऊ, अन्यथा संवेदनेमध्ये अडकून राहू हे जाणवणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं.

प्रख्यात इतिहास संशोधक ई. एच. कार यांचं इतिहासाच्या अभ्यासाबाबतचं एक अवतरण आहे. ‘व्हॉट इज हिस्टरी?’ या त्यांच्या पुस्तकात एके ठिकाणी ते म्हणतात की, इतिहासाचा अभ्यास म्हणजे केवळ घटनांचा अभ्यास नव्हे, तर घटनेमागच्या कारणांचा अभ्यास. खरा इतिहासकार आणि अधिक व्यापकपणे – खरा विचारवंत, म्हणजे ‘का?’ हा प्रश्न सतत विचारणारा मनुष्य. त्यांचं हे म्हणणं इतिहासच नव्हे तर सर्वच क्षेत्रांतील संशोधनाबाबतचं सार्वकालिक सत्य सांगतं.

संशोधन ही फक्त प्रयोगशाळेतच करायची गोष्ट आहे असं नाही. आपण ‘का?’ हा प्रश्न आपल्या दैनंदिन जगण्याशी संबंधित गोष्टींबाबत दैनंदिन जगण्याच्या ठिकाणीच विचारू शकतो. तसा तो विचारला तर आपल्याला नव्या वाटा सापडतात. आपल्यापैकी प्रत्येकाची काही बलस्थाने आहेत, काही मर्यादा आहेत. व्यक्तिश: आपण जगात किती सकारात्मक बदल घडवू शकतो हे सांगता येणार नाही; पण प्रश्न विचारायची, विविध बाजूंनी विश्लेषण करण्याची वृत्ती जरी आपण अंगीकारली तरी याचा एकत्रित परिणाम म्हणूनसुद्धा अनेक गोष्टी सुकर होतील.

– उत्पल व. बा.

utpalvb@gmail.com

chaturang@expressindia.com