News Flash

आपल्या घडण्याचा प्रश्न

दीक्षितांनी तत्त्वज्ञानाबाबत जे म्हटलं आहे ते मला वैचारिक साहित्याविषयी म्हणावंसं वाटतं.

प्रतिनिधिक छायाचित्र

उत्पल व. बा.

वैचारिक साहित्याला सर्जनाचा चिंतनात्मक आविष्कार म्हणण्याचं कारण हे की, एखाद्या तत्त्ववेत्त्याच्या, विचारवंताच्या मनात सृष्टीविषयी, माणसाविषयी, संकल्पनांविषयी जे विचारमंथन सुरू असतं त्याला तो त्याच्या सर्जनशीलतेच्या बळावर आकार देतो, नवी मांडणी करतो. त्यातून जे समोर येतं ते काल्पनिक नसून चिंतनात्मक असतं.दुसऱ्या बाजूला कथात्म साहित्य हा काल्पनिक आविष्कार असला तरी तो कसदार होण्यासाठी मुळात लेखक हा ‘विचारवंत’ असावा लागतो.

मागील लेखात मे. पुं. रेगे यांच्या एका अवतरणाच्या आधारे आपण थोडा संकल्पनात्मक ऊहापोह केला होता. ‘परंपरा आणि नवता’ हे मध्यवर्ती सूत्र धरून आपण जी चर्चा करत आहोत त्यात मला रेगे यांच्या पुस्तकाची (विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा) वारंवार आठवण होते.

‘हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’, ‘विवेक आणि न्याय’, ‘स्वातंत्र्य, समता आणि न्याय’, ‘इहवाद आणि सर्वधर्मसमभाव’ ही त्यांची इतर काही पुस्तके. बटरड्र रसेलच्या ‘प्रॉब्लेम्स ऑफ फिलॉसॉफी’ या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे रेगे मराठीतील वैचारिक साहित्यातील एक अग्रणी होते. त्यांच्याबरोबरीने नरहर कुरुंदकर, वसंत पळशीकर, राम बापट, दि. के. बेडेकर, शरद पाटील, दि. य. देशपांडे, भा. ल. भोळे ही नावेही अधोरेखित करावी अशी आहेत. मी स्वत: साहित्य आणि चित्रपटांकडे ओढला जाणारा मनुष्य असलो तरी माझ्यासाठी वैचारिक साहित्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. भवतालात घडणाऱ्या घटनांचा अन्वयार्थ लावण्याचं, मूलभूत स्वरूपाचे प्रश्न उपस्थित करण्याचं, माणसाच्या आंतरिक विश्वाचा वेध घेण्याचं महत्त्वाचं काम वैचारिक साहित्य करत असतं. ढोबळमानाने बोलायचं झालं तर सकस कथात्म साहित्य, नाटक, चित्रपट याला माणसाच्या चिंतनाचा सर्जनशील आविष्कार म्हणता येईल, तर वैचारिक साहित्य हा माणसाच्या सर्जनाचा चिंतनशील आविष्कार आहे, असं म्हणता येईल. दोन्ही प्रकार अगदी कप्पेबंद आहेत. इकडून तिकडे जाताच येत नाही असं नाही; पण साधारण फरकाची रेषा काढायची ठरवली तर वरील विधान मान्य होऊ शकेल. वैचारिक साहित्याला सर्जनाचा चिंतनात्मक आविष्कार म्हणण्याचं कारण हे की, एखाद्या तत्त्ववेत्त्याच्या, विचारवंताच्या मनात सृष्टीविषयी, माणसाविषयी, संकल्पनांविषयी जे विचारमंथन सुरू असतं त्याला तो त्याच्या सर्जनशीलतेच्या बळावर आकार देतो, नवी मांडणी करतो. त्यातून जे समोर येतं ते काल्पनिक नसून चिंतनात्मक असतं. दुसऱ्या बाजूला कथात्म साहित्य हा काल्पनिक आविष्कार असला तरी तो कसदार होण्यासाठी मुळात लेखक हा ‘विचारवंत’ असावा लागतो. जी.ए. कुलकर्णीच्या कथा, विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार यांची नाटके, दिबाकर बॅनर्जी, अनुराग कश्यप, रजत कपूर, विशाल भारद्वाज, आनंद गांधी यांच्यासारखे हिंदी चित्रपटाला नवं वळण देणारे दिग्दर्शक ही काही उदाहरणे देता येतील.

‘भारतीय तत्त्वज्ञान’ या शीर्षकाचं श्रीनिवास दीक्षित यांचं एक पुस्तक आहे. भारतीय तत्त्वज्ञानाची तोंडओळख करून घ्यायच्या दृष्टीने हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. या पुस्तकातील ‘तत्त्वज्ञान म्हणजे काय?’ या पहिल्या प्रकरणात तत्त्वज्ञान मुळात पाहिजे कशाला? त्याचा उपयोग काय? या प्रश्नांची दीक्षितांनी तीन उत्तरे दिली आहेत. पहिल्या उत्तरात ते लिहितात – ‘जीवनाचे अथवा सत्याचे जे दर्शन आपण प्रमाण मानतो त्यावर आपल्या वृत्ती आधारित असतात. वास्तवाचे स्वरूप अमुक एक आहे असे आपण विचारपूर्वक ठरवत नाही. परंपरेने आणि परिस्थितीमुळेही काही मते अंगी मुरतात आणि वृत्ती निर्धारित होतात; पण वास्तवाच्या स्वरूपाविषयी आपली मते विचारपूर्वक बनवणे, म्हणजेच तत्त्वचिंतन करणे आणि वृत्तींना विचारपूर्वक वळण देणे केव्हाही श्रेयस्कर होय. असे करण्याने आपण खरेखुरे, अस्सल जीवन जगू शकतो.’ त्यांचं दुसरं उत्तर असं की, तत्त्वज्ञानाशी परिचय असेल तर माणसाच्या विचाराचे सर्वच संदर्भ व्यापक होतात. स्वत:च्या दु:खाकडे तो विश्वाच्या संदर्भात पाहतो. त्यामुळे दु:खाचे आघात सहन करण्याची त्याची क्षमता जास्त असते. (दीक्षितांनी इथे फार अर्थपूर्ण आणि सुंदर शब्द योजले आहेत – चिरंतनाच्या चिंतनाने आणि अखंडाच्या अभ्यासामुळे वृत्ती उदार होतात आणि जीवन गंभीर बनते.) तिसरं उत्तर असं की, तत्त्वज्ञानातील युक्तिवाद सूक्ष्म असतात आणि काटेकोरही असतात. त्यामुळे तत्त्वज्ञानाचा अभ्यास केलेल्या व्यक्तीच्या विचारात आपोआपच एक शिस्त येते आणि ही शिस्त इतर कोणत्याही विषयाच्या अभ्यासास उपयोगी पडते.

दीक्षितांनी तत्त्वज्ञानाबाबत जे म्हटलं आहे ते मला वैचारिक साहित्याविषयी म्हणावंसं वाटतं. विशेषत: ‘आपली मते विचारपूर्वक बनवणे, खरेखुरे – अस्सल जीवन जगणे’ हे आजच्या काळाच्या संदर्भाने तर मला फारच महत्त्वाचं वाटतं. आमच्या घरातला टीव्ही बंद केल्याला आता सात-आठ र्वष झाली. केव्हा तरी कुणाकडे टीव्ही पाहिला गेला तर आपला निर्णय योग्य होता याची खात्रीच पटते. टीव्हीमुळे आपल्याला वास्तवाचं यथायोग्य आकलन होतं, असं कुणी म्हणत असेल तर त्याच्याशी बोलायला मला आवडेल. काही सन्माननीय अपवाद वगळता टीव्हीचं एकूण रूप – बातम्या आणि मनोरंजन दोन्ही अंगांनी – भयावह झालं आहे आणि टीव्ही बघणारा ‘टीव्ही कन्झ्युम करणारा’ झाला आहे. एखादा विषय किंवा एखादा प्रश्न समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी दोन पर्याय असतात. एक म्हणजे स्वत: घराबाहेर पडून माहिती घेणे, संशोधन करणे किंवा मग ज्यांनी संशोधन केलं आहे त्यांची मांडणी वाचणे, बारकावे समजून घेणे. पहिला पर्याय सर्वाना सर्व बाबतीत शक्य होणार नाही हे उघड आहे; पण मग अशा वेळी दुसरा पर्याय निवडणं बहुतांश लोकांनी बंदच केलंय की काय, अशी कधी कधी शंका येते. अल्बर्ट आइन्स्टाइनचं एक प्रसिद्ध विधान आहे – एव्हरीथिंग शुड बी मेड अ‍ॅज सिम्पल अ‍ॅज पॉसिबल, बट नॉट सिम्पलर; पण वास्तवातील गुंतागुंत मोकळी करून समोर ठेवण्याऐवजी वास्तवाचं सुलभीकरण करून एक बाजू घेऊन मोकळं होण्याचं प्रमाण वाढताना दिसतं आणि ते धोकादायक आहे.

हे सुलभीकरण समाजमाध्यमे, टीव्ही अशा प्रमुख व्यासपीठांवर वरेचवर होताना दिसतं. अभिव्यक्तीला अवकाश मिळणं ही नि:संशयपणे स्वागतार्ह गोष्ट आहे. अभिव्यक्तीचं लोकशाहीकरण होणं हेदेखील स्वागतार्हच आहे; पण अभिव्यक्तीमुळे होणारं रंजन, प्रबोधन जेव्हा प्रचाराकडे झुकू लागतं, अभिव्यक्ती जेव्हा मानवी जाणिवांचा पट विस्तारू शकत

नाही आणि अभिव्यक्तीचं ‘उपद्रवमूल्य’ जेव्हा वाढू लागतं तेव्हा ती चिंतेची बाबही होते. अशी अभिव्यक्ती सुलभीकरण करणारी असते आणि सुलभीकरणाचा धोका असा की, त्यातून समाजाचं ध्रुवीकरण झपाटय़ाने होतं. रामचंद्र गुहा यांनी एका मुलाखतीत समाजमाध्यमांच्या बाबतीत म्हटलं होतं की, समाजमाध्यमांमुळे लोकांमध्ये काळा आणि पांढरा अशा दोन रंगांचा दृष्टिकोन आला आहे आणि वास्तवातील बारकावे टिपण्याची नजर हरवून गेली आहे. समाजमाध्यमे (फेसबुक, ट्विटर आणि इतर ऑनलाइन डिस्कशन प्लॅटफॉम्र्स) हा मुळात एक मानसशास्त्रीय दृष्टय़ा परिणामकारक आविष्कार आहे असं मला वाटतं. माणसामधील अंत:स्थ भावनांना, विशेषत: विकारांना हात घालायची ताकद या माध्यमांच्या स्वरूपात आहे. फेसबुक निर्माण करताना मार्क झुकेरबर्गच्या मनात ‘ऑफलाइन सोशल एक्सपीरियन्स ऑनलाइन आणणे’ ही कल्पना होती; परंतु या ‘ऑनलाइन एक्सपीरियन्स’मध्ये काही कळीचे फरक पडलेले दिसतात आणि त्याचा संबंध माणसं समोरासमोर बोलत नसल्याशी आणि विविध सामाजिक-आर्थिक-वैचारिक-भाषिक स्तरातील माणसं व्हच्र्युअली एकत्र येणं आणि आपल्या आजूबाजूला अशा विविध स्तरांतील माणसं आहेत हे भान न राहणं याच्याशी आहे. गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने आकारास आलेलं समाजमाध्यमांचं नवीन व्यासपीठ आणि टीव्हीचं बदललेलं रूप यामुळे आपल्या मानसिकतेवर आपल्या नकळत मोठा परिणाम झाला आहे. वर वृत्तीनिर्धारणाचा मुद्दा आला आहे. आपल्या आजच्या भवतालाचा – जिथे ‘इन्स्टंट डिसिजन’ प्रबळ होतो आहे – विचार करताना आपली वृत्ती कशी घडते आहे याचा विचार केला तर त्याचं फारसं आश्वासक उत्तर मिळत नाही.

वैचारिकतेचा पाया मजबूत असण्याचा एक अर्थ चिकित्सक वृत्ती, शोधक वृत्ती जागी असणं हा आहे. आपल्याला प्रत्येकालाच व्यवहारी आयुष्य जगायचं असतं. रोजच्या जगण्याच्या लढाईत तत्त्वचिंतन वगैरे कसं काय जमायचं, शोध-चिकित्सा यांना वेळ कसा द्यायचा, हे प्रश्न रास्त आहेत. त्यावर श्रीनिवास दीक्षितांनी दिलेली उत्तरे वर उद्धृत केली आहेतच; पण एक रूपकात्मक आणि म्हणून अधिक प्रभावी उत्तर एका चित्रपटातील प्रसंगात मिळतं. अमिताभ बच्चनची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘मैं आझाद हूँ’ हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारा ‘आझाद’ हा माणूस लोकांसमोर एक भाषण करतो. या भाषणात तो एक किस्सा सांगतो – ट्रेन चालली आहे. ट्रेनमध्ये प्रवासी आहेत. एका प्रवाशाने आपलं सामान आपल्या डोक्यावर घेतलं आहे. असं का बाबा? असं विचारल्यावर तो प्रवासी उत्तरतो की, माझ्या सामानाची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार? आझाद पुढे असं म्हणतो की, आपलं बहुधा या प्रवाशासारखं झालं आहे. आपल्या प्रत्येकाकडे आपलं ओझं आहेच; पण ते आपल्या डोक्यावर घेऊन बसण्यापेक्षा ट्रेन योग्य मार्गाने चालली आहे का, नीट चालली आहे का, हे तपासणं जास्त गरजेचं आहे. कारण ट्रेन जर नीट चालली असेल तरच आपण आपल्या सामानासह इच्छित स्थळी पोहोचणार आहोत..

utpalvb@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2018 1:01 am

Web Title: author view about ideological literature and philosophy
Next Stories
1 व्यक्तिस्वातंत्र्याचा विवेक
2 स्वतंत्र आणि  समग्र
3 शक्यतांचा विचार आणि स्वीकार
Just Now!
X