|| उत्पल व. बा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नातेसंबंधांतील प्रगल्भतेसंदर्भात पाश्चिमात्त्य-पौर्वात्त्य मानसिकता याबाबत बोलताना आपण ‘व्यक्तिस्वांतत्र्य’ या संकल्पनेपाशी आलो होतो. मुळात मानसिकतेबाबत एखादे विधान करताना ते विधान एका ‘ट्रेंड’कडे निर्देश करते, विश्लेषण करताना ‘सामान्यीकरण’ केले गेले तरी या सामान्यीकरणातून दिसणारा समाजाचा चेहरा हा त्या समाजाचा एकच एक चेहरा असतो, असे नाही हेही आपण बोललो.

आपण हे लक्षात घेऊ या की भौतिक विज्ञानात पदार्थाचे वर्तन नियमबद्ध असल्याने त्याविषयी निश्चित स्वरूपाचे बोलता येणे शक्य असते, पण मानवी वर्तनाबाबत ते शक्य नसते. मात्र इथे एक मेख आहे. मानवी वर्तनाचा संबंध मानवी विचारप्रक्रियेशी, मानवी जाणिवेशी आहे. ही विचारप्रक्रिया, जाणीव हे सगळे काहीसे गूढ वाटले तरी हे सगळे म्हणजे मानवी मेंदूतील भौतिक घडामोडींचा परिपाक आहे. हे लक्षात आले की आपण ‘जाणिवेचे विज्ञान’ समजून घ्यायच्या जवळ जातो. माणसाच्या मनाशी संबंधित गोष्टींचा पाया मुळात भौतिक आहे हे ज्ञान आपल्याला मानवी वर्तनाच्या खुलाशाकडे, उत्तरांकडे नेणारे आहे.

या संदर्भात ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’ या मे. पुं.रेगे यांच्या पुस्तकातील एक उतारा उद्धृत करण्याचा मोह मला टाळता येत नाही. ‘विवेकवाद’ या प्रकरणात रेगे लिहितात – जे जे विश्वात घडते आहे त्याची यादी करायची झाली तर तिच्यात मानसिक घटनांचा अंतर्भाव करावा लागेल हे उघड आहे. एखाद्या हरणाच्या शरीराला जर दर्भाकुर टोचला तर ती भौतिक घटना असते आणि त्या हरणाला जी वेदना होते ती मानसिक घटना असते. आपण केवळ भौतिक घटना घेतल्या तर त्या कोणत्या नियमांना अनुसरून घडतात, हे जसे वैज्ञानिक पद्धती शोधून काढू शकते त्याप्रमाणे भौतिक घटना आणि मानसिक घटना यांच्या साहचर्याने नियमही ती शोधून काढू शकते. स्विच दाबला की विजेचा दिवा का लागतो या, बहुसंख्य भारतीय विवेकवाद्यांना माहीत नसलेल्या गोष्टीचा उलगडा वैज्ञानिक पद्धती करू शकते. त्याप्रमाणे गुप्तधनाचा शोध लागावा म्हणून एखादा माणूस नरबळी का देतो याचे स्पष्टीकरणही ती करू शकते.

माणूस, त्याचे अनुभव, विचार आणि कृत्ये हाही विश्वाचा भाग आहे आणि वैज्ञानिक पद्धतीने विश्वाच्या इतर घटकांचे स्वरूप आणि त्यांच्यामधील परस्परसंबंध यांचे जसे स्पष्टीकरण करता येते तसेच मानवी घटनांचेही करता येते आणि ते केले पाहिजे, माणसाचे विज्ञान रचले पाहिजे, भौतिक विज्ञानाइतकेच दृढपणे आणि पद्धतशीरपणे रचले पाहिजे, हा प्रबोधनकालीन विवेकवादाचा संकल्प आणि आकांक्षा होती. माणसाची प्रकृती गुंतागुंतीची असल्यामुळे विज्ञानाच्या या भागाचा आशय आणि अंतर्गत रचना, उदाहरणार्थ, वनस्पतिशास्त्राचा आशय व रचना यांच्यापेक्षा अधिक गुंतागुंतीची असेल व माणसाचे विज्ञान रचणे अधिक कठीण ठरेल हे या विवेकवाद्यांना मान्य होते. पण हे विज्ञान रचणे तत्त्वत: शक्य आहे याविषयी त्यांना शंका नव्हती.

भौतिक, रासायनिक, जैविक, मानसिक प्रक्रियांचे विज्ञान जसे रचले पाहिजे तसे माणसांच्या अनुभवांचे आणि कृत्यांचे विज्ञानही रचले पाहिजे. ही विज्ञाने, किंवा एका र्सवकष विज्ञानाचे हे वेगवेगळे भाग, अर्थात माणसांनी रचायचे आहेत आणि ते माणसासाठी रचायचे आहेत. म्हणजे माणसाचे सुख किंवा कल्याण साधण्यासाठी रचायचे आहेत. माणसाचे सुख कशात असते? विवेकाला अनुसरून जगण्यात माणसाचे सुख असते. पण विवेकाला अनुसरून जगणे म्हणजे कसे जगणे?

विवेकाला अनुसरून जगणे म्हणजे कसे जगणे हा कळीचा प्रश्न आहे. रेगे पुढे लिहितात की, माणसाने विवेकाला अनुसरून जगणे योग्य असते या विवेकवादी सिद्धांताचा अर्थ काहीही असो, हा सिद्धांत हे विवेकवादाचे एक वेगळे परिमाण आहे. माणसाने कसे जगावे हे विवेकवाद सांगतो. त्याचबरोबर विश्वात खरोखर काय आहे याचा निर्णय करण्याची विवेकवादी रीत तो सांगतो. विवेकवादाच्या या दोन अंगांमध्ये काय परस्परसंबंध असू शकेल? अस्तित्वाचे स्वरूप काय आहे याचा शोध घेणारी वैज्ञानिक पद्धती माणसाने कसे जगावे याचे नियमन करणाऱ्या तत्त्वाला जन्म देऊ  शकते का? वैज्ञानिक नीती, विज्ञानप्रणीत मूल्ये असे काही असू शकते का?

रेग्यांनी उपस्थित केलेले हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. या लेखमालेत आपण श्रद्धा-अंधश्रद्धा, कार्यकारणभाव शोधण्याची मानसिकता, मानवी नातेसंबंधांचे नवीन प्रारूप अशा विषयांना स्पर्श केला आहे. त्यावर पुढेही बोलणार आहोत. या सगळ्याचा आटापिटा कशासाठी? तर आपल्या जगण्यातील काही बाजूंना घासून-पुसून बघणे, काही बदल करणे आवश्यक वाटते म्हणून. रेगे म्हणतात तसं ‘माणसाने कसे जगावे याचे नियमन करणाऱ्या तत्त्वा’ला यातून जन्म मिळेल का? ‘वैज्ञानिक नीती आणि मूल्ये’ सांगता येतील का?

हे प्रश्न नेमके आहेत आणि म्हणूनच अवघडही आहेत. व्यक्तीच्या इच्छा आणि समूहजीवनाची बंधनं या दोन्हीची प्रस्तुतता मान्य करत एक ‘आदर्श समाज’ आणि एक ‘आदर्श जगणं’ निर्माण करण्याचा किंवा किमान तशी कल्पना करण्याचा प्रयत्न अनेक विचारवंतांनी सातत्याने केला आहे. यातील मुख्य आव्हान व्यक्ती आणि समाज यांच्यातील ताण कमी करणे हेच आहे. परंतु विवेकवादाच्या संदर्भात ‘वैज्ञानिक नीती’ म्हणजे काय?’ यावर तपशिलात जाऊन मांडणी करणे आवश्यक आहे असे वाटते.

‘व्यक्तिस्वातंत्र्य’ हे माणसाच्या विज्ञानाच्या संदर्भाने एक वैज्ञानिक मूल्य आहे असे आपल्याला म्हणता येईल. या मूल्याचा उच्चार करताना आणि त्याचा आग्रह धरत असतानाच त्याची नीट उकल करणेही आवश्यक आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हे आधुनिक काळातील मूल्य आहे. अगदी शुद्ध रूपात त्याचे स्वरूप ‘व्यक्तीला तिच्या इच्छेनुसार वागण्याचे स्वातंत्र्य’ असेच असणार आहे. म्हणजे आपण जर सूक्ष्म विचार केला तर एखाद्याला घराबाहेरही नग्नावस्थेत राहावेसे वाटले तर व्यक्तिस्वातंत्र्याच्या संकल्पनेनुसार त्याला तसे राहता आले पाहिजे. हेच पुढे नेऊन असेही म्हणता येईल की, योग्य वाटले म्हणून एखाद्याला मारून टाकण्याचे स्वातंत्र्यही व्यक्तीला असले पाहिजे. पण आपण अशा व्यक्तिस्वातंत्र्याला मान्यता देणार नाही. पहिल्या उदाहरणात चुकीचे असे खरे तर काही नाही, परंतु समाज उभा राहताना काही धारणा घेऊन उभा राहतो. त्या धारणांशी खटका उडाला की, समाजात अस्वस्थता पसरते. त्यामुळे इथे धारणांचा संघर्ष होतो आहे. दुसऱ्या उदाहरणात मात्र मी सोडून इतरांच्या जगण्याच्या स्वातंत्र्यावरच घाला घातला जातो आहे. ही गंभीर बाब आहे.

त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा संदर्भ कोणता, व्यक्तिस्वातंत्र्य कशासाठी हे पाहणे आवश्यक ठरते. आता आपण आणखी एक उदाहरण घेऊ. व्यक्तिस्वातंत्र्य – म्हणजेच इच्छेचे स्वातंत्र्य – आहे म्हणून माणूस आहे त्याहून अधिक सुखी, आरामदायक जीवन जगू पाहतो. हे करत असताना तो इतरांच्या स्वातंत्र्यावर घाला घालत नाही का? शहरांना पाणी मिळावे म्हणून शहरांपासून दूरच्या गावातले लोक विस्थापित होतात. मग शहरी लोकांच्या स्वातंत्र्याला काय म्हणणार? एखादा खेडय़ातला मुलगा आहे. त्याने मुंबईत आल्यावर त्याच्या दृष्टीने अत्यंत अपुऱ्या कपडय़ातील एखादी मुलगी पाहिली आणि तो लैंगिकदृष्टय़ा उद्दीपित झाला तर तो त्याचा दोष की त्या मुलाच्या मनात स्त्री-शरीराविषयीची सहजता, सकारात्मतता रुजू देण्यात अपयशी ठरलेल्या त्याच्या पर्यावरणाचा दोष?  ‘स्वातंत्र्यातील संघर्ष’ दर्शवणारी अशी इतरही उदाहरणे देता येतील. म्हणजे मग थोडक्यात आपल्या स्वातंत्र्याच्या प्रत्येक कृतीबाबत प्रश्नचिन्ह लावता येईल का?

विचार करताना असे लक्षात येते की, आपण सामाजिक संकल्पना समजून घेताना सर्व काही नेमकेपणाने चिमटीत पकडू शकत नाही. परंतु हेच खरे आव्हान आहे. रेगे यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा आपण प्रयत्न केला तर मला जे दिसते ते असे- जगणे कसे असावे हे सांगणारी वैज्ञानिक नीती म्हणजे जी नीती आपल्याला समग्रतेतून सूक्ष्माकडे आणि सूक्ष्मातून समग्रतेकडे असा दुहेरी प्रवास घडवू शकते, जी नीती आपल्याला भौतिक-सांस्कृतिक विकासाच्या विविध टप्प्यांवरचे प्रश्न, संघर्ष सोडवायला – किमान त्यातील ताण कमी करायला वैचारिक मदत करू शकते ती नीती होय.

utpalvb@gmail.com

मराठीतील सर्व परंपरा आणि नवता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Individual freedom
First published on: 23-06-2018 at 00:06 IST