News Flash

मध्यंतरातील संवाद

‘सेक्रेड गेम्स’सारखी मालिका भारतीय प्रेक्षकाला नवी वळणं घ्यायला लावत आहेत

उत्पल व. बा.

परंपरेचं एक मोठं बलस्थान असं असतं की, ती माणसाला सुरक्षितता देते. तंत्रज्ञानाने माणसाचं जगणं मोठय़ा प्रमाणात बदलून टाकलं असलं तरी माणसाच्या मनातील आदिम जाणिवा तंत्रज्ञानाला अद्याप तरी बदलता आलेल्या नाहीत. माणसाच्या कृत्यांमागे, वर्तनामागे कारण म्हणून कार्यरत असणाऱ्या भावना कुठल्या याचं उत्तर आपण देऊ शकू; पण सूक्ष्म विचार केला तर असं दिसेल की, ‘भीती’ ही भावना सर्वात प्रबळ असते..

एखादी नवीन मांडणी करण्याआधी वास्तवातील बारकावे, सूक्ष्म भेद(न्यूअन्सेस) लक्षात घेऊन नवीन विचारासाठी समतल क्षेत्र निर्माण करणे गरजेचे असते. आपण आजवर जी चर्चा केली आहे त्यात हा विचार जागा होता, किंबहुना आजवरच्या चच्रेचं स्वरूपच तसं होतं. आता यापुढील लेखांमधून विश्लेषणात्मक विचार करण्याबरोबरच काही विशिष्ट मुद्दय़ांवर थेट चर्चा करू या.

नातेसंबंधांचे नवीन प्रारूप याविषयी आपण बोलायला सुरुवात केली आहेच. स्त्री-पुरुष सहजीवन, प्रेम, लैंगिक संबंध या अंगांनी तो धागा पुढे न्यायचा प्रयत्न करू. याशिवाय जीवन कौशल्ये (लाइफ स्किल्स) आणि सामाजिक शिष्टाचारांच्या संदर्भातही काही नवीन सापडतंय का ते पाहू. राष्ट्रवाद, पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता, धर्माची प्रस्तुतता आणि निधर्मी जगणं हे मुद्दे आज सतत चच्रेत आहेत. त्यावर आपल्याला काही मांडता येतंय का ते पाहू. हे विषय राजकीयदृष्टय़ा संवेदनशील झाले असले तरी ते मुळात संकल्पनात्मक आणि सामाजिकदृष्टय़ा महत्त्वाचे आहेत आणि दुसरं म्हणजे राजकीय क्षेत्र आपण आपल्या चर्चेत अस्पर्शित ठेवावं असंही अजिबात नाही.

परंपरा आणि नवता, श्रद्धा आणि तर्क, धर्म आणि विज्ञान या गोष्टी परस्परविरोधी वाटल्या तरी त्या ‘इनहेरंटली’ तशा असतात का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मुळात हे लक्षात घ्यायला हवं, की विचारांचं, कृतीचं नामकरण करणं ही आपली मानसिक (आणि मानसिक आहे म्हणून सामाजिकही) गरज असते. लेखमालेच्या अगदी पहिल्या लेखात आपण म्हटलं होतं की, परंपरा म्हणजे ‘क्ष’ नावाची एक गोष्ट आहे आणि नवता म्हणजे ‘य’ नावाची एक गोष्ट आहे, अशा साचेबद्ध पद्धतीने आपण या संकल्पनांकडे बघायला नको. यानंतर आपण असंही म्हणालो आहोत की, सामान्यीकरण करणं बरेचदा आवश्यक असलं तरी वास्तवाचे अनेकविध पलू असतात आणि यातील एखादा किंवा अनेक पलू आपण सोयीसाठी जे नामकरण करतो त्याच्या विरोधीही असू शकतात. ‘बर्डमॅन’ हा माझा एक अतिशय आवडता चित्रपट आहे. या चित्रपटातील एका गहन अवतरणाची इथे आठवण होते – ‘अ थिंग इज अ थिंग, नॉट व्हॉट इज सेड ऑफ दॅट थिंग!’ भाषा ही आपली ‘फ्रेंड, फिलॉसॉफर, गाइड’ असली तरी भाषा वापरून ज्या वास्तवाचं वर्णन करायचं ते वास्तव इतकं व्यामिश्र असतं की, तिथे तीही कधीकधी कमी पडते. (‘बर्डमॅन’मधील ‘कोट’ला समांतर जाणारी ‘रॉकस्टार’ या हिंदी चित्रपटातील इर्शाद कामिल यांनी लिहिलेल्या गाण्याची ओळ आहे – ‘जो भी मं कहना चाहूँ, बरबाद करे अल्फाज मेरे..!’

परंपरेचं एक मोठं बलस्थान असं असतं की, ती माणसाला सुरक्षितता देते. तंत्रज्ञानाने माणसाचं जगणं मोठय़ा प्रमाणात बदलून टाकलं असलं तरी माणसाच्या मनातील आदिम जाणिवा तंत्रज्ञानाला अद्याप तरी बदलता आलेल्या नाहीत. माणसाच्या कृत्यांमागे, वर्तनामागे कारण म्हणून कार्यरत असणाऱ्या भावना कुठल्या याचं उत्तर आपण देऊ शकू; पण सूक्ष्म विचार केला तर असं दिसेल की, ‘भीती’ ही भावना सर्वात प्रबळ असते. स्वार्थ – म्हणजेच स्वहित/ स्वसुख या भावनेच्या पोषणासाठीही भीतीच मदत करते. जीवशास्त्रीय व इतरही अभ्यासासंदर्भात प्रॉक्झिमेट कॉझेस (नजीकची कारणे) आणि अल्टिमेट कॉझेस (अंतिम कारणे) अशी कारणांची वर्गवारी केली जाते. एखाद्या घटनेमागचं लगेचचं कारण वेगळं आणि मुळाशी असलेलं अंतिम कारण वेगळं असतं. दैनंदिन जगण्यातील एखादं उदाहरण पाहू. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे गाडीला अपघात झाला हे झालं अपघाताचं नजीकचं कारण; पण चालकाचं नियंत्रण का सुटलं? त्याच्या मन:स्थितीत काही बदल झाले का, की ज्यांच्यामुळे नियंत्रण सुटलं? याचं उत्तर म्हणजे अंतिम कारण. आपल्या अनेक विचार-वर्तनामागे भीती हे अंतिम कारण असतं. निसर्गात चाललेल्या ‘टिकून राहण्याच्या’ लढाईत माणूस आज पुढे आला असला तरी त्या आदिम भीतीने त्याची पाठ सोडलेली नाही. मृत्यूच्या भयाबरोबर सामाजिक दडपण, प्रतिष्ठा टिकवणे, इतरांच्या नजरेतून उतरण्याचं भय या आणि अशा इतर भयांपोटी माणूस अनेक गोष्टी करतो. यात परंपरा जगण्याला एक समाजमान्य चौकट देते आणि बहुतांश माणसांना त्यात सुरक्षित वाटतं.

नवतेचा विचार अगदी व्यावहारिक संदर्भात केला तर माणूस सर्वसाधारणपणे नवं काही कधी स्वीकारतो याचं एक स्पष्ट उत्तर असंही आहे की, त्यात काही फायदा असेल तर! (या फायद्याचं मूळही अखेरीस भीतीत सापडतं. सुख, फायदा या गोष्टींमुळे अंतिमत: सुरक्षितताच मिळणार असते.) बँकेत मुदत ठेव ठेवण्यापेक्षा शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडात अधिक फायदा आहे म्हणून आपण तिथे पैसे गुंतवतो. एटीम, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आज मोठय़ा प्रमाणात वापरलं जातं कारण ते सोयीस्कर आहे, वेळ वाचवणारं आहे. मात्र जगण्याच्या व्यवहारी-आर्थिक बाजूंना जे लागू होतं ते सामाजिक रचनेच्या इतर अंगांना लागू होतंच असं नाही. त्यामुळे मोबाइलमधल्या नावीन्याचं स्वागत करायला आपण उत्सुक असतो, तिथे नैतिकतेच्या भानगडी नसतात; पण प्रेम, लग्न, लैंगिक संबंध याबाबत आपण नावीन्याचं स्वागत करायला बिचकतो. ‘प्रयोग कुठे करायचे’ याबाबत आपल्या धारणा घट्ट असतात. कारण आपल्या धारणा आपली ‘कम्फर्ट लेव्हल’ निश्चित करत असतात.

सामाजिक संदर्भात, विशिष्ट मुद्दय़ांबाबतही कम्फर्ट लेव्हल वाढवणे हा रचनात्मक नवतेचा एक प्रमुख प्रयत्न असायला हवा. वास्तवात हे होण्यासाठी ज्या माध्यमांचा हातभार लागू शकतो त्यात साहित्य, नाटक, चित्रपट, टेलिव्हिजन आणि आता इंटरनेट अशी विविध माध्यमे आहेत. यातील टीव्ही आणि इंटरनेट या दोन माध्यमांकडे बघणं मला विशेष मौजेचं वाटतं. कारण एकीकडे परंपरेचा अवकाश विस्तारताना दिसतो, तर दुसरीकडे नवतेचा. इंटरनेटवर व्यक्तिगत देवाणघेवाण मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने, व्यक्तींचं एकमेकांना ‘अति एक्स्पोजर’ मिळत असल्याने तिथले प्रश्नही बिकट आहेत हे खरं, पण विषयांची हाताळणी या अंगाने पाहिलं तर इंटरनेट हे अधिक मुक्त व्यासपीठ आहे. मागच्या लेखात उल्लेख केला होता त्याप्रमाणे उपद्रवमूल्य असणारी अभिव्यक्ती तिथे असली तरी त्याचबरोबर कलात्मक, परफॉर्मन्स-बेस्ड अभिव्यक्तीही तिथे आहे. इंटरनेटचं विश्व आज प्रचंड विस्तारलं आहे. ऑनलाइन स्ट्रीमिंगद्वारे चित्रपट आणि मालिकांबरोबरच अनेक विषयांवरील फिल्म्स, डॉक्युमेंटरीज पाहता येतात. विनोदाला – आणि बेधडक विनोदाला – भरपूर वाव मिळतो आहे. एआयबीसारख्या यूटय़ूब चॅनेलवर पारंपरिक भारतीय लग्नातील ढोंगीपणाची खिल्ली उडवणारे धमाल व्हिडीओज आहेत. मराठी यूटय़ूब चॅनल्सही आहेत. स्टॅन्ड-अप कॉमेडी हा प्रकार पुष्कळच लोकप्रिय आहे. या कॉमेडीच्या विषयात कुटुंबसंस्था, लग्नसंस्था, पालक-मुले, प्रेम आणि लैंगिकता, पोर्नोग्राफी यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा-टिप्पणी केली जात आहे. ती उपरोधिक, परंपरेतील दोषांवर बोट ठेवणारी, व्यक्तिस्वातंत्र्याचा – विशेषत: स्त्री-स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी आहे. बहुतांश कॉमेडियन्स पुरुष असले तरी अदिती मित्तलसारखी स्त्री कॉमेडियनदेखील तिच्या धडक सादरीकरणातून आपला प्रभाव टाकते आहे. अलीकडे ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेला ‘लस्ट स्टोरीज’ वा ‘सेक्रेड गेम्स’सारखी मालिका भारतीय प्रेक्षकाला नवी वळणं घ्यायला लावत आहेत. दुसरीकडे टीव्हीवर मात्र प्रयोगशीलतेची दारं बंद असल्यासारखी आहेत. रिअ‍ॅलिटी शोजमधून नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळालं असलं तरी टीव्ही मालिकांचं साधारण रंगरूप डोळे दिपवणारं आहे! टीव्ही घरातील सगळे एकत्र बघतात आणि इंटरनेट हे ‘व्यक्तिगत माध्यम’ आहे, त्यामुळे त्यात फरक असण्याबद्दल काही म्हणणं नाही, पण सगळे एकत्र बसून जे बघत आहेत त्याच्याहून पुष्कळ चांगलं असं काही बघू शकतील!

असो. पुढील लेखापासून आपण सुटय़ा विषयांवर बोलायला सुरुवात करू.

utpalvb@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2018 1:03 am

Web Title: internet and television role in human life
Next Stories
1 आपल्या घडण्याचा प्रश्न
2 व्यक्तिस्वातंत्र्याचा विवेक
3 स्वतंत्र आणि  समग्र
Just Now!
X