महात्मा गांधीजींबाबतची विविध मते लक्षात घेतली तर असं दिसतं की त्यांचा अंतिम उद्देश एका नव्या वास्तवाची निर्मिती करण्याचा होता. ते वस्तुगत, व्यवहार्य प्रश्नांशीच झुंजत होते. त्यांच्या कल्पनेत एक माणूस होता आणि त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावी लागेल अशी बाब म्हणजे ते स्वत: त्या माणसाचं प्रतिबिंब होते. गांधीजींना नैतिक उंची प्राप्त झाली कारण बऱ्याच अव्यवहार्य गोष्टी त्यांनी स्वत: करून दाखवल्या. कमीत कमी गरजा ठेवून जगता येतं हे त्यांनी स्वत:च्या जगण्यातून दाखवून दिलं आणि जगासमोर एक उदाहरण ठेवलं.-  ‘गांधीजी, आधुनिकता आणि दुविधा’ या लेखाचा हा उर्वरित भाग.

माझे वडील सर्वोदयी कार्यकर्ते होते. त्यांच्याशी माझ्या वरचेवर वाद-चर्चा व्हायच्या. गांधी-विनोबांच्या प्रभावाखाली असलेले वडील आणि गांधी-विनोबांचा प्रभाव असला तरी ‘मायक्रोसॉफ्ट-गूगलोत्तर’ काळातला, आंबेडकर-डार्विन-स्त्रीवाद याही रसायनांकडे आकर्षित झालेला मी अशा दोन व्यक्तींमधली ती टक्कर असायची. मात्र त्यांचं एक म्हणणं माझ्या लक्षात राहिलं. ते म्हणाले की आम्ही सगळे गांधींच्या खांद्यावर बसून जग बघतोय. त्यामुळे आम्हांला थोडं दूरवरचं दिसू शकतं. तू आमच्या खांद्यावर बसला आहेस. त्यामुळे आम्हांला जे दिसत नाही ते तुला दिसत असणार हे मला मान्य आहे!

हा मुद्दा मला नोंद घेण्याजोगा वाटला कारण तो एका गांधीवादी कार्यकर्त्यांकडून आला होता. चिकित्सेची ‘स्पेस’ खुली ठेवणारा होता. मुळात एक गोष्ट मान्य करायला हवी ती म्हणजे आपण भारतीय वृत्तीने ‘पूजक’ आहोत. आपल्याला एखाद्या अधिष्ठानाची सतत गरज असते. (आपल्या कामासाठी प्रेरणा म्हणून, आपल्यावर विवेकाचा अंकुश राहावा म्हणूनही ते होतं, परंतु याचे इतरही काही पैलू आहेत. सध्या एवढंच नोंदवून पुढे जाऊ.) ‘वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) वास्तवा’ला महत्त्व न देता किंवा तिकडे दुर्लक्ष करून ‘आपल्या मनात वसत असलेल्या’ (पर्सीव्हड, आपल्याला समजलेल्या) वास्तवाला महत्त्व देण्याच्या आपल्या मनोवृत्तीत आपल्या पूजक वृत्तीची मुळं दडलेली आहेत. आपली ही ‘पूजक’ वृत्ती एक ऐतिहासिक परिपाक आहेच, पण त्याबरोबर जातीय, आर्थिक विभागणीने आणि सरंजामी वृत्तीच्या अवशेषांनी शतभंग झालेलं आपलं समाजमानस आपल्या या वृत्तीला खतपाणी घालत असतं. मुद्दा असा की आपण जेव्हा ऐतिहासिक महत्त्वाच्या व्यक्तींचा विचार करतो तेव्हा आपल्या नैसर्गिक किंवा वैचारिक घडणीमुळे त्या व्यक्तीच्या प्रेमात असण्याची शक्यता गृहीत धरूनही त्या व्यक्तीच्या विचारांवर, त्यातल्या ‘इसेन्स’वर लक्ष केंद्रित करण्याची गरज आपल्याला लक्षात घ्यावी लागते. त्यांचे विचार स्थलकालसापेक्ष असू शकतात हे मान्य करायची तयारी असावी लागते. (रावसाहेब कसबे यांच्या ‘आंबेडकरवाद – तत्त्व आणि व्यवहार’ या पुस्तकातील पहिलं प्रकरण ‘महापुरुष’ यादृष्टीने वाचण्यासारखं आहे. ‘महापुरुषांचा विचार फार सावधगिरीने करावा लागतो’ हे त्यांचं म्हणणं तर अगदीच पटतं.) हे सगळं लक्षात घेऊन गांधीजींबाबत वस्तुनिष्ठपणे, ‘इसेन्स’चा मुद्दा डोळ्यापुढे ठेवून विचार केला तरी मला ते ‘गायडिंग लाइट’सारखे वाटतात. परंतु त्यांची मांडणी स्वप्नवत, आदर्शवादी आहे आणि तिला प्रत्यक्षाच्या मर्यादा आहेत, मानवी आकांक्षा, मानवी व्यवहार यांचा विचार करता ती पुरी पडत नाही, असं अनेकांचं मत असतं. मागच्या लेखाच्या शेवटी ज्या तीन लेखांचा उल्लेख केला आहे त्यातील विश्राम गुप्ते यांच्या मांडणीत हा मुद्दा येतो. गांधीवाद आणि आधुनिकतावाद या दोन परस्परविरोधी विचारधारा आहेत, असं त्यांच्या लेखाचं गृहीतक असल्याचं त्यांनी लेखात नमूद केलं आहे. त्यांचं विश्लेषण ‘प्रत्यक्षातील अडचणींच्या’ पाश्र्वभूमीवर आदर्शाची चिकित्सा करणारं आहे तर चैत्रा रेडकर यांनी ‘हिंद स्वराज’चं विश्लेषण करताना या पुस्तकातून पर्यायी जीवनशैलीच्या विकासाची गुणसूत्रे सापडतात असं म्हटलं आहे. ‘हिंद स्वराज’च्या लेखनामागचे राजकीय संदर्भही त्यांनी तपासले आहेत. त्यांचा एक मुद्दा मला विशेष महत्त्वाचा वाटला – ‘औद्योगिक भांडवलशाहीमुळे खेडय़ांच्या वाटय़ाला आलेली विपन्नावस्था, ग्रामीण भागांचे शहरांकडून होणारे शोषण, शहरांवरील ग्रामीण भागांचे परावलंबित्व या सर्व बाबींचे भान गांधी आणि मार्क्‍स दोघांनाही होते. यावरील इलाज म्हणून मार्क्‍सने उत्पादन साधनांवरील मालकीचा प्रस्ताव मांडला तर गांधींनी यंत्रविवेक सुचवला. बाजारी अर्थव्यवस्थेतून मुक्तीसाठी उत्पादन साधनांवर सामूहिक मालकी प्रस्थापित करण्याचा मार्क्‍सचा मार्ग आपल्याला क्रांतिकारी वाटतो, मात्र गांधींनी सुचवलेला मार्ग स्वप्नाळू, अवास्तव आणि अशक्य वाटतो याचा अर्थ काय लावायचा?’

वरील मुद्दय़ाचा रोख अर्थातच परिवर्तनाच्या सामाजिक-राजकीय चळवळीत असणाऱ्या कार्यकर्त्यां-विचारवंतांकडे आहे. सर्वसामान्य लोकांसाठी कदाचित मार्क्‍स आणि गांधी दोघांचीही मांडणी अवघड, स्वप्नाळूच असेल. मात्र इथे आपण एक लक्षात घेऊ की सर्वच क्रांतदर्शी विचारवंतांचा रोख सहअस्तित्व सुकर व्हावं, समाजात शांती-समृद्धी-न्याय असावा याकडे असतो. त्यासाठीचा त्यांचा असा एक दृष्टीकोन असतो. त्याचा विस्तार आपल्याला करावा लागतो. मला असं दिसतं की गांधीवाद, मार्क्‍सवाद किंवा इतर कुठल्याही विचारधारेचा ‘गाइडलाइन’ म्हणून विचार न करता त्यातील शब्दांविषयी, काही निर्णयांविषयी वाद घालत ‘ते चुकले की नाही’ याचा खल करण्यात आपला पुष्कळ वेळ जातो. इतिहासाचा अभ्यास म्हणून ते करायला हरकत नाहीच, पण तो आजचा आपला जीवन-मरणाचा प्रश्न करण्यात काही हशील नाही.

मागच्या लेखात मिलिंद बोकिलांच्या लेखाचा उल्लेख केला आहे. हा दीर्घ लेख फक्त ‘हिंद स्वराज’विषयी नाही. गांधीजी हे ‘एकूण प्रकरण’ समजून घ्यायच्या दृष्टीने तो अतिशय उपयुक्त आहे. विज्ञानासंदर्भातील गांधीजींची मते ही एक प्रकारे त्यांच्या विचारदर्शनाला पडलेली मर्यादा आहे असं बोकील नोंदवतात. परंतु त्यांच्या सर्व विचारांतून अंतिमत: दिसणारा गांधी कोणता याचं उत्तर बोकिलांनी ‘नीतीसाठी तळमळणारा गांधी’ असं दिलं आहे. याशिवाय गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाबाबत लोकांचा जो गोंधळ होतो तो दूर होईल असं विवेचन त्यांनी केलं आहे. आपण गांधीजींची दृष्टी स्वीकारली नाही पण आपली स्वत:ची अशी किंवा आपल्याला उपयोगी अशी विकासाची दृष्टी आपण विकसित केली नाही हे त्यांचं निरीक्षणही योग्य आहे. आजचे आपल्यासमोरचे विकासाचे आणि विकासामुळे निर्माण झालेले पेच त्याची साक्ष देतात.

गांधीजींबाबतची विविध मते लक्षात घेतली तर असं दिसतं की त्यांचा अंतिम उद्देश एका नव्या वास्तवाची निर्मिती करण्याचा होता. ते वस्तुगत, व्यवहार्य प्रश्नांशीच झुंजत होते. त्यांच्या कल्पनेत एक माणूस होता आणि त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावी लागेल अशी बाब म्हणजे ते स्वत: त्या माणसाचं प्रतिबिंब होते. गांधीजींना नैतिक उंची प्राप्त झाली कारण बऱ्याच अव्यवहार्य गोष्टी त्यांनी स्वत: करून दाखवल्या. कमीतकमी गरजा ठेवून जगता येतं हे त्यांनी स्वत:च्या जगण्यातून दाखवून दिलं आणि जगासमोर एक उदाहरण ठेवलं.

एक गोष्ट खरी की गांधीजींचे समकालीन बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यांनी गांधीजींच्या आदर्शाना संविधानात्मक आणि संस्थात्मक जोड दिली. गांधी आणि आंबेडकर यांच्यात काही मतभेद होते हे सर्वश्रुत आहे. आंबेडकरांची धर्मविषयक आणि जातीनिर्मूलनविषयक भूमिका अधिक स्पष्ट आणि प्रखर होती आणि त्यामुळे अधिक आधुनिक होती, असं म्हणता येईलच. तो स्वतंत्र विषय आहे. मात्र या सर्वच मंडळींनी नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाच्या पायाभरणीत- जी अतिशय आव्हानात्मक गोष्ट होती – अतुलनीय योगदान दिलं यात शंकाच नाही. (स्वातंत्र्यानंतर उभारल्या गेलेल्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या नामांकित संस्थेच्या मुंबई शाखेत कालांतराने ‘सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह्ज फॉर रुरल एरियाज’ या स्वतंत्र शाखेची निर्मिती करण्यात आली हे नोंद घेण्याजोगं आहे.) गांधीजी, त्यांचा प्रभाव, देशाची ‘डेव्हलपमेंट पॉलिसी’, त्यातील कच्चे दुवे, त्यातूनच उभं राहिलेलं नर्मदा बचाओ आंदोलनासारखं जनआंदोलन, त्याच्या मागेपुढे उभी राहिलेली इतर अनेक जनआंदोलनं, शासकीय दमन, भांडवलशाहीचे हितसंबंध, लोकसंख्येचा प्रश्न आणि पर्यायी विकासाच्या वाटा हा एक मोठा अभ्यासविषय आहे. गांधीजींच्या मूळ मांडणीची परिणती पुढे ‘सामाजिक न्याया’चे प्रश्न उभे करण्यात झालेली दिसते आणि ती अतिशय आश्वासक बाब आहे. तंत्रज्ञानातील प्रगती, भौतिक विकासाची ऊर्मी जोवर सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला बरोबर घेऊन चालते तोवरच तिचा चेहरा मानवी राहतो, अन्यथा ती भेसूर होऊ लागते हे पुन:पुन्हा दिसून आलं आहे.

संबंधित विषयाबाबत शोध घेण्यासारखं बरंच आहे. यापुढील एकदोन लेखांमधून आपण तसा प्रयत्न करू. मात्र सध्या ही चर्चा थांबवून पुढच्या लेखात आपण वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत.

utpalvb@gmail.com