उत्पल व. बा.

मला जाणवलेलं एक सत्य असं आहे की, आपण सगळे वेगवेगळ्या पायऱ्यांवर उभे असतो आणि त्यावरून आपल्यात संघर्ष सुरू असतो. म्हणजे मी ज्या पायरीवर उभा आहे तिथून मला समोरचं सुंदर दृश्य दिसतंय. ते इतरांना दिसत नाही म्हणून मी त्रागा करून घेतो. पण माझ्या हे लक्षात येत नाही की मी जिथे उभा आहे तिथे यायला इतरांना अजून वेळ लागणार आहे..

माझ्या काही आवडीच्या इंग्लिश मालिकांपैकी एक म्हणजे ‘मॉडर्न फॅमिली’. एक वयस्कर अमेरिकी व्यावसायिक गृहस्थ, त्याच्याहून तरुण असलेली त्याची मूळची कोलंबियाची बायको, तिचा पहिल्या नवऱ्यापासूनचा मुलगा – असं एक कुटुंब. या गृहस्थाला त्याच्या पहिल्या घटस्फोटित बायकोपासून दोन मुलं आहेत. त्यातली मुलगी, तिचा नवरा, त्यांची तीन मुलं असं दुसरं कुटुंब. तिसरं कुटुंब या गृहस्थाच्या मुलाचं आहे. हा मुलगा गे आहे. तो, त्याचा साथीदार (हा शब्द अधिक योग्य वाटतो! ‘नवरा’ आणि ‘बायको’ म्हटल्यावर ज्या स्वाभाविक पण तरी कधी कधी नकोशा वाटणाऱ्या छटा जाणवतात त्या एकदम पुसून निघतात. अर्थात मालिकेत हे दोघेही लग्न करतातच.) आणि त्यांनी दत्तक घेतलेली मुलगी असं तिसरं कुटुंब. ही तीन कुटुंबं आणि या मंडळींचे परस्परसंबंध, त्यांच्यातलं प्रेम आणि मारामाऱ्या, इतर उपकथानकं अशी एकूण मनोरंजक मालिका आहे. यातल्या गे जोडप्याच्या चित्रणाबाबत मी थोडा विशेष उत्सुक होतो, कारण हे चित्रण प्रथमच बघायला मिळत होतं. अमेरिकेतील किंवा अन्य ठिकाणच्या गे लोकांचं या चित्रणाबाबत काय म्हणणं आहे याचा शोध अद्याप तरी मी घेतलेला नाही, पण मला हे चित्रण आवडलं.

मालिकेतील एका भागात या दोन्ही पुरुषांच्या चुंबनाचा एक प्रसंग आहे. जेव्हा तो सीन सुरू होत होता तेव्हा मी मला स्वत:ला मुद्दाम आतमध्ये निरखत होतो. दोन पुरुषांचं चुंबनदृश्य तोवर मी पाहिलं नव्हतं. (एके काळी हिंदी चित्रपटांतून समलिंगी संबंधांची फक्त टवाळीच केली जायची. नंतर त्याकडे गांभीर्याने पाहिलं जाऊ लागलं. ‘दोस्ताना’ या चित्रपटात जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांचं एक चुंबनदृश्य होतं. ते स्पष्टपणे चित्रित केलं गेलं नव्हतं. अलीकडे हिंदी चित्रपटाला शंभर र्वष पूर्ण झाल्याबद्दल ‘बॉम्बे टॉकीज’ हा चार स्वतंत्र लघुकथांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या कथेत दोन पुरुषांचं चुंबनदृश्य स्पष्टपणे चित्रित केलं गेलं होतं.) त्या दोघांनी एकमेकांचं चुंबन घेतलं तेव्हा माझ्या मनात नक्की काय काय उमटलं याची मी नोंद ठेवली होती. मला ते दृश्य सहजपणे बघता आलं असलं तरी स्त्री-पुरुषाचं चुंबन पाहतानाची सहजता त्यात होती, असं मी खात्रीशीरपणे सांगू शकत नव्हतो. यातला एक भाग असा की त्यात मला चुकीचं काहीच वाटत नव्हतं हे पूर्णपणे खरं, पण मला त्याची ‘सवय’ नव्हती. त्यामुळे अगदी एक क्षण मला जो ‘वेगळेपणा’ जाणवला तो त्या सवयीच्या अभावी जाणवला होता. पण तो अगदी एक क्षणच होता. त्यातून बाहेर येऊन मी पुढे बघू लागलो.

एखाद्या नवीन गोष्टीचा स्वीकार/ अस्वीकार करणं याला दोन-तीन बाजू आहेत. एक म्हणजे ती गोष्ट अयोग्य वाटून अजिबातच स्वीकारता न येणं. दुसरी म्हणजे ती गोष्ट तत्त्वत: मान्य असणं, पण स्वीकारायला जड जाणं आणि तिसरी म्हणजे ती थोडय़ाच प्रयत्नांनी किंवा अगदी सहजदेखील स्वीकारून पुढे जाणं. आपण स्वीकृत केलेल्या गोष्टींचा नकळत आपल्या मनात एक ‘साचा’ तयार होतो आणि हा साचाच फक्त योग्य आहे असं आपल्याला वाटू लागतं. त्याच्याबाहेरचं काही दिसलं की आपल्याला ते योग्य वाटत नाही किंवा स्वीकारता येत नाही.

पण यात एक मेख आहे. आणि त्यावर नीट विचार केला पाहिजे. या सदरातील अगदी पहिल्या लेखात आपण म्हटलं होतं की परंपरा म्हणजे ‘क्ष’ नावाची एक गोष्ट आहे आणि नवता म्हणजे ‘य’ नावाची एक गोष्ट आहे, अशा साचेबद्ध पद्धतीने आपण या संकल्पनांकडे पाहायला नको. हे पुन्हा एकदा इथे नोंदवू. यात म्हणायचं असं आहे की, एकाची परंपरा दुसऱ्याची नवता असू शकते. हे उलटही असू शकतं. आता या पाश्र्वभूमीवर अमुक इतक्या अंतरावर पोचलेला मनुष्य आधुनिक आणि त्याच्या मागे असलेला मनुष्य पारंपरिक असं म्हणता येईल का? वर दिलेलं उदाहरण घेऊ. दोन पुरुषांचं चुंबन बघणं एखाद्याला फारसं जड गेलं नाही. हेच दुसऱ्या एखाद्याला फारच अवघड गेलं. तिसरा एक असा आहे की त्याला चुंबनदृश्य दाखवणंच गैर वाटतं. चौथा एक असा आहे की ज्याला समलिंगी संबंधच मान्य नाहीत. आता या सगळ्यांमध्ये आधुनिक कोण आणि पारंपरिक कोण असं विचारलं तर पहिला मनुष्य आधुनिक आहे असं आपण म्हणू. पण त्याला दोन पुरुषांचं नातं मान्य आहे. तीन पुरुषांचे परस्पर प्रेमसंबंध आहेत हे त्याला मान्य होत नाही. मग तो आधुनिक होतो का?

मला जाणवलेलं एक सत्य असं आहे की, आपण सगळे वेगवेगळ्या पायऱ्यांवर उभे असतो आणि त्यावरून आपल्यात संघर्ष सुरू असतो. म्हणजे मी ज्या पायरीवर उभा आहे तिथून मला समोरचं सुंदर दृश्य दिसतंय. ते इतरांना दिसत नाही म्हणून मी त्रागा करून घेतो. पण माझ्या हे लक्षात येत नाही की मी जिथे उभा आहे तिथे यायला इतरांना अजून वेळ लागणार आहे. माझ्यापुढे निघून गेलेल्या काहींना माझ्याबद्दल हेच वाटत असेल. इथे आपण तात्त्विक संघर्षांपाशी येतो. आधुनिकता म्हणजे नक्की काय आणि परंपरा म्हणजे नक्की काय, हे प्रश्न आपल्याला पडतात.

‘एव्हरी वॉर इन द वर्ल्ड इज द वॉर ऑफ डेफिनेशन्स’ असं म्हटलं जातं. आधुनिकता आणि परंपरेच्या बाबतीत हे ‘वॉर’ सुरू असतं याचंही कारण हेच आहे. पण मग हा तिढा सुटणार कसा? मला याचं उत्तर असं दिसतं की विशिष्ट क्षणी, विशिष्ट ठिकाणी जे बल प्रभावी असेल ते जिंकेल. एखाद्या समाजात विशिष्ट कालखंडात विशिष्ट धारणा का प्रभावी असतात याची कारणं संमिश्र आहेत. त्या बदलतात कशा याचंही उत्तर संमिश्र आहे. वैचारिक प्रबोधन, तांत्रिक प्रगती,

त्या त्या समाजाची विशिष्ट ‘वीण’ आणि त्यातून घडलेली विशिष्ट मानसिकता असे विविध घटक त्याला कारणीभूत असतात.

यातला तिसरा घटक मला विशेष प्रभावशाली वाटतो. ‘मेंढा-लेखा’ या गावाचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल. गडचिरोली जिल्ह्य़ातील या लहानशा गावाने आपल्या परिसरातील वनावर सामूहिक हक्काचा दावा २००९ मध्ये मान्य करून घेतला. असं करणारं हे देशातील पहिलं गाव आहे. या गावाचं वैशिष्टय़ असं की, इथल्या ग्रामसभेत सर्वसहमतीने निर्णय घेतले जातात (‘गोष्ट मेंढा लेखाची’ या मिलिंद बोकील लिखित पुस्तकात या गावाची प्रेरणादायक कथा वाचता येईल.). तिथे गेलो असताना तिथले ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल मला म्हणाले की, ‘सर्वसहमतीचं तत्त्व, सामूहिक वनहक्क या गोष्टी इथे यशस्वी झाल्या, कारण मुळात या गावातील लोकांमध्ये एक वेगळेपण आहे.’ त्यांचं हे म्हणणं माझ्या लक्षात राहिलं होतं. ही मानसिकता कशी घडवायची, हाच

एक प्रश्न असतो.

परंपरा आणि आधुनिकतेसंदर्भात चर्चा करताना त्यातील तात्त्विक स्पष्टतेचा मुद्दा लक्षात घेऊन आपण पुढे गेलो तर आपला मार्ग सुकर होतो. पण माणसाच्या मुक्ततेची नवी दिशा दाखवणाऱ्या विशिष्ट आधुनिकतेचा आग्रह धरणं हेही अपरिहार्य असतं. मानवी नातेसंबंध या आधुनिकतेच्या कक्षेत येतात. आपण सहसा नातेसंबंधांबाबत प्रयोग करायला कचरतो. ते केले पाहिजेत. विज्ञान जसं प्रयोगाशिवाय पुढे जाऊ शकत नाही तसंच कौटुंबिक-सामाजिक रचनासुद्धा नातेसंबंधातील प्रयोगाशिवाय सुदृढ राहू शकत नाही. यापुढील काही लेखांमध्ये नातेसंबंधांच्या नव्या रचनेबाबत आपण चर्चा करू.

utpalvb@gmail.com

chaturang@expressindia.com