News Flash

प्रश्न विचारायलाच हवेत

माणसाला दु:ख होतं ते का हा प्रश्न तात्त्विक अंगाने चर्चिला जाऊ शकतो

‘तत्त्वज्ञान म्हणजे काय?’ हा प्रश्न म्हणजे तत्त्वज्ञान स्वत: प्रत्येक गोष्टीबाबत जो प्रश्न विचारतं त्याच प्रकारचा प्रश्न आहे. त्याची विविध अंगांनी उत्तरेही दिली गेली आहेत. मला स्वत:ला तत्त्वज्ञान म्हणजे संकल्पनांची चर्चा, संकल्पनांचे विश्लेषण आहे असं वाटतं. विश्वाच्या उत्पत्तीपासून ते या विश्वाचा घटक असलेल्या माणसाच्या मनापर्यंतचे अनेक विषय तत्त्वज्ञानाच्या कक्षेत येतात. गेल्या काही शतकांतील वैज्ञानिक संशोधनाने तत्त्वज्ञानाच्या कक्षेतील काही प्रश्न विज्ञानाच्या कक्षेत आणले.

माणसाला दु:ख होतं ते का हा प्रश्न तात्त्विक अंगाने चर्चिला जाऊ शकतो, पण दु:खनामक जाणीव जेव्हा होते तेव्हा मानवी मेंदूत नक्की काय घडतं, कोणती रसायने स्रवतात हे विज्ञान शोधू शकतं. दु:खाप्रमाणेच इतर भाव-भावनांनाही हे लागू होईल. मानवी जाणिवेचा संपूर्ण खुलासा, जाणिवेचं संपूर्ण आकलन अजून झालेलं नसलं तरी जाणीव ही गूढ अशी बाब नसून ती मुळात भौतिक गोष्ट आहे, रासायनिक क्रियांची जाणीव हा परिणाम आहे इथपर्यंत विज्ञान आलं आहे. विज्ञान सततच्या प्रयत्नांतून अनेक गुंते सोडवू शकतं. त्यामुळे आपल्या सर्व समस्यांवरचा मार्ग विज्ञानच दाखवू शकेल याविषयी शंका नसली तरी तत्त्वज्ञान संकल्पनात्मक, मूल्यात्मक झगडय़ात कळीची भूमिका बजावत असल्याने आपण तत्त्वज्ञानाला टाळू शकत नाही. तत्त्वज्ञान हा शब्द आणि हा विषय रुक्ष किंवा अवघड वाटला तरी प्रत्येक व्यक्ती जगताना तिचं म्हणून एक तत्त्वज्ञान घेऊनच जगत असते. व्यक्ती जे लहान-मोठे निर्णय घेते त्याला तिच्या तत्त्वज्ञानाचाच आधार असतो.

लेखाच्या सुरुवातीलाच तत्त्वज्ञानाचा आधार घ्यावासा वाटला याला कारणही तसंच आहे. मी एक चांगला संशयात्मा आहे. त्यामुळे ‘आपल्याला आता जे वाटतंय ते बरोबर आहे का?’ हा प्रश्न माझ्या मनात वरचेवर येत असतो. आपण काहीएक मत-निरीक्षण-विचार मांडतो. यात समता व स्वांतत्र्यासारख्या मूलभूत मूल्यांना उचलून धरणारे जे विचार आहेत त्यांच्याबाबत मला शंका नसते, पण इतर बाबतीत मनामध्ये संघर्ष होत असतो. खरं तर समता व स्वांतत्र्य या संकल्पनांबाबतही प्रत्यक्षातील मानवी जगण्याच्या संदर्भात, या संकल्पनांच्या नेमक्या अर्थाच्या संदर्भात चर्चा होऊ  शकते. पण या मूल्यांचे जे साधारण स्वरूप आहे त्याबाबत मूलभूत तात्त्विक मतभेद नाहीत हे खरं. इतर बऱ्याच बाबतीत (म्हणजे सामाजिक विश्लेषणासंदर्भात) होतं असं की सामाजिक, आर्थिक, राजकीय बले इतकी जोरदार असतात की आपण नक्की कुठल्या स्थानावरून बोलायचं असा प्रश्न पडतो.

गेल्या दोन लेखांमध्ये श्रद्धा, अंधश्रद्धा याबाबत लिहिल्यानंतर असं जाणवलं की या विशिष्ट विषयाचा संबंध माणसाच्या मानसिक घडणीशी, त्याच्या सामाजिक स्थानाशी आहे हे खरं; पण या सगळ्याची नोंद घेऊन, आपल्या मनातील विचारकलहाला लक्षात घेऊन आपल्याला एका ‘किमान साधारण भूमिके’वर यावं लागतं. असं नाही केलं तर परिवर्तनाचा मार्गच आखला न जाण्याची भीती असते.

ही ‘किमान साधारण भूमिका’ कोणती? तर ‘प्रश्न विचारणं’ ही ती भूमिका आहे. मला वाटतं की दिवसाच्या शेवटी आपल्याला एखाद-दोन तरी प्रश्न पडले असतील तर तो दिवस कारणी लागला असं म्हणायला हरकत नाही! आणि ते प्रश्न फार अवघड असावेत असंही नाही. जग निर्माण कसं झालं किंवा सजीव निर्माण कसे झाले हे मोठे प्रश्न आहेत. पण रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्नदेखील पडावेत. प्रश्नांची ही रेंज कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध इथपासून ते समाजव्यवस्थेपर्यंत असू शकते, असावी. सॉक्रेटिस या ग्रीक तत्त्वज्ञाची प्रश्न विचारून गोष्टी समजून घ्यायची पद्धत होती. ‘सॉक्रेटिक डिबेट’ या नावाने ती ओळखली जाते. एखाद्या विधानाची, मताची, दृष्टिकोनाची वेगवेगळ्या बाजूंनी, तर्कशास्त्राचे निकष लावून उलटतपासणी करणे हे यातलं मुख्य सूत्र आहे. पद्धतीच्या तपशिलात जायची आवश्यकता नाही, पण यातला गाभा लक्षात घ्यायला हवा. प्रश्न विचारणे आणि त्यातून ‘क्रिटिकल थिंकिंग’ (विश्लेषणात्मक विचारपद्धती) विकसित करणे हा तो गाभा आहे. माणसाच्या उत्क्रान्तीच्या प्रवासात त्याने दोन प्रवृत्ती जपलेल्या आहेत. एक म्हणजे ‘फाईट’ आणि दुसरी म्हणजे ‘फ्लाईट’. पहिली प्रवृत्ती त्याला आव्हानांशी लढायला लावते आणि दुसरी त्याला आव्हानांपासून पळून जायला लावते. आदिम संदर्भात या दोन्हीमध्ये चूक-बरोबर ठरवणं अप्रस्तुत होईल. कारण जगण्याच्या स्पर्धेत टिकून राहण्याकरिता या दोघातलं जमेल ते करणं भाग होतं. या प्रवृतीचे अंश माणसात आजही दिसतात. आपल्या इतरही भाव-भावना आदिम स्वरूपात आजही टिकून आहेत. परंतु या आदिम भाव-भावनांबरोबरच माणसाने प्रश्न विचारायची वृत्ती जागी ठेवली म्हणून तो पुढे येऊ  शकला. आता त्याने केलेली प्रगती नेत्रदीपक असली तरी त्यातून नवीन आव्हाने उभी राहतात हा मुद्दा आहे, पण ही प्रगती साध्य करणं हे निश्चितच उल्लेखनीय आहे, गौरवास्पद आहे. या प्रगतीचे लाभार्थी पुष्कळजण आहेत. तुम्ही-मी सगळेच. मात्र गंमत ही आहे की आपण या लाभाचे धनी होण्यातच धन्यता मानतो आहोत. आपण स्वत: कदाचित तांत्रिक प्रगतीत योगदान देऊ  शकणार नाही, कारण त्या विषयातलं ज्ञान आपल्याकडे नाही. परंतु आपला दृष्टिकोन तरी चिकित्सक असू शकतो? ज्याला आपण ‘शिक्षण’ म्हणतो ते केवळ विषयांचं ज्ञान देणारं नसून ‘विश्लेषक बुद्धी’ विकसित करणारं असावं अशी अपेक्षा तर आपण ठेवू शकतो?

परंपरा आणि परंपरेनुसार वर्तन माणसाला एक ‘जमीन’ मिळवून देतं हे मान्यच आहे, परंतु अधिकाधिक लोकांनी जर नवीन विचार केला, परंपरेला प्रश्न विचारले तर नवीन जमीन तयार होईल. ही मशागत झाली नाही तर नवीन काही पिकणार कसं? हे लिहिताना मला एक प्रसंग आठवला. शाळेतल्या एका जुन्या मित्राकडे गेलो होतो. त्याची बायको (तीही आमची वर्गमैत्रीण) त्यांच्या लहान मुलीचं डोकं देवापुढे टेकवायचा प्रयत्न करत होती. फार गमतीदार दृश्य होतं. ती मुलगी बिचारी काही केल्या डोकं टेकवायला तयार नव्हती. (कारण तिला मुळात काही कळतच नव्हतं). आणि माझी मैत्रीण मात्र तिला मूर्तीपुढे नतमस्तक करून सोडायच्या हट्टाला पेटली होती. माझ्या मनात विचार आला की हा आग्रह कशासाठी? माणसामध्ये नम्रता असायला हवी हे योग्यच आहे, पण ती अशाच पद्धतीने येऊ शकते का? मला स्वत:ला मूल नसल्याने मला काही प्रश्नांचा सामना करावा लागलेला नाही. पण जर कुणा लहानग्याने मला प्रश्न केला की ‘देव असतो का?’ तर मी ‘माहीत नाही’ म्हणेन. देव, धर्म, जन्म, मृत्यू, सामाजिक विषमता या व इतर विषयांबाबत आपण मुलांशी स्पष्टपणे बोलायला हवं. मला असं वाटतं की आपण काही गोष्टी आपल्या भीतीमुळे त्यांच्यापासून लपवून ठेवतो आणि काही गोष्टी आपल्या भीतीमुळे त्यांच्यावर लादतो. ‘जर मला शिक्षा करणारी देवनामक व्यक्ती किंवा शक्ती नाहीच आहे तर मी चांगलं का वागू?’ असा प्रश्न जर कुणी केला तर किंवा कुणाचं वर्तन अनिर्बंधतेच्या दिशेने जाताना दिसलं तर मी जे उत्तर देईन ते माणूस म्हणूनच्या माझ्या बौद्धिक उंचीचं मोजमाप करणारं असेल. माणूस म्हणून मी माझ्या स्वत:च्या आणि इतरांबरोबरच्या जगण्याचं नियमन करू शकलो, त्याला सकारात्मक वळण देऊ शकलो, तर्काचा आग्रह धरतानाच मानवी जगण्याला जो संवेदनेचा ओलावा लागतो तो टिकवून ठेवू शकलो तर माणूस म्हणूनच ते माझं श्रेय असेल. माझ्या प्रश्नांचं, माझ्या दु:खाचं, अडचणीचं उत्तर शोधायला – किमान त्यांचं नियमन करायला मला अदृश्य शक्तीवर विसंबून राहायला लागत नाही, माझ्या आसपासची माझ्यासारखी माणसंच ते काम करू शकतात. हे जर शक्य झालं तर आणखी काय हवं?

प्रश्न विचारणं हे ठीक, पण प्रश्न विचारून तरी आपण असा काय तीर मारणार आहोत असा एक प्रश्न येऊ शकेल. त्यावर पुढील लेखात बोलू या.

उत्पल व. बा.

utpalvb@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2018 12:52 am

Web Title: questions must be asked
Next Stories
1 श्रद्धेचं ‘वर्गी’करण
2 श्रद्धेची चुकलेली वाट
3 पेशन्स फॉर परिवर्तन
Just Now!
X