25 November 2020

News Flash

विरळ वस्तीचा देश!

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांमध्ये फिरताना विकसित समाजाचा वेगळेपणा जाणवत राहतो.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांमध्ये फिरताना विकसित समाजाचा वेगळेपणा जाणवत राहतो. अप्रतिम निसर्ग सौंदर्य, प्रचंड वृक्षसंपदा, कमी लोकवस्तीची शांत गांवं, उत्तम रस्ते, कायद्याचे काटेकोर पालन करणारे सुसंस्कृत लोक या सगळ्या घटकांमुळे ही सफर अविस्मरणीय झाली.

सर्वास इंटरनॅशनलची (बिगरसरकारी संघटना) न्यूझीलंडमध्ये, ऑकलंडजवळ मातामाता येथे असलेली त्रवार्षिक साधारण सभा आटोपल्यावर मी आणि माझ्या मित्राने ऑस्ट्रेलियात जायचं ठरवलं होतं. यावेळी ऑस्ट्रेलियात एकदम वेगळा अनुभव घ्यायचा, असं आमचं ठरलं होतं. त्यासाठी ऑस्ट्रेलियन लोकांसोबत त्यांच्या घरी पाहुणे म्हणून राहायचं. त्यांची संस्कृती जाणून घ्यायची, असं डोक्यात होतं. आमच्या ‘सर्वास इंटरनॅशनल’ या संस्थेचे सभासद बहुतेक सर्व देशांत आहेत. यासाठी लागणारे ओळखपत्र (LOI-Letter Of Introduction)  संस्थेकडून  घेतले.

वेिलग्टनहून आम्ही मेलबोर्नला आलो. अचानक आमची रवानगी ‘ग्रीन चॅनेल’मध्ये झाली. आमचे सामान तपासले गेले नाही की आम्हाला कुठलेही प्रश्न विचारण्यात आले नाहीत. कदाचित न्यूझीलंडला हे सारे सोपस्कार झाल्यामुळे असेल. आम्ही ज्या यजमानांकडे जाणार होतो, त्यांनी सांगितलं, ‘विमानतळाहून बाहेर आल्यावर स्कायबसने सदर्न क्रॉस सेंटरला या. बसेस दर दहा-पंधरा मिनिटांनी आहेत. तिकिटे विमानतळावर मिळतील किंवा ऑनलाइनसुद्धा उपलब्ध आहेत. क्रॉस स्टेशनसमोर ट्रामचा थांबा आहे. तेथून ८६ नंबरच्या, बुन्डोराला (Bundoora) जाणाऱ्या ट्राममध्ये बसा. तत्पूर्वी MYKI कार्ड खरेदी करा. (एक प्रकारचे तिकीट) जे स्टेशनवर किंवा कुठल्याही सेव्हन टू इलेव्हन स्टोरमध्ये मिळेल. ट्राममध्ये ते मिळणार नाही. १४ नंबरच्या थांब्यावर उतरा. ट्रामच्या दिशेने चालत सुमारे पाच मिनिटे या. हा गेत्रूड रस्ता (Gertrud Street) आहे. फíनचरचे मोठे दुकान दिसेल, त्यावर माझा फ्लॅट आहे. कॉलबेलचे चार नंबरचे बटण दाबा. मी तुम्हाला घ्यायला खाली येईन. चुकून १५ नंबर थांब्यावर उतरलात तर त्याच रस्त्याने मागे या.’

घरी पोहोचलो तर भारतीय पद्धतीचे जेवण तयार होते. आमच्या आवडी-निवडीची चौकशी आधीच झाली होती. या देशात लोक संध्याकाळी जरा लवकरच जेवतात. जेवणानंतर गप्पा झाल्या. सगळ्यांनी मिळून स्वयंपाकघर आवरले. उद्या काय बघायचे यावर चर्चा झाली. शहरातून एक चक्राकार ट्राम जाते, त्यात संपूर्ण प्रवास मोफत असतो. कुठेही बसा आणि कुठेही उतरा. त्यात मार्गदर्शनासाठी गाइड/ सेवक वर्ग उपलब्ध असतो. इतर ट्राममध्येसुद्धा काही भागांसाठी तिकीट लागत नाही. बसेसचीसुद्धा उत्तम सोय आहे. होप ऑन- होप ऑफ बसेस दर ३० मिनिटांनी ठरावीक रस्त्यांवरून धावतात. दोन्ही बसेस, सिटी टूर आणि किल्डा टूर, फेडरेशन चौकातून सुटतात. सिटी टूर बसने मेलबॉर्न अ‍ॅक्व्ॉरियम, युरेका टॉवर, इतिहाद स्टेडियम, व्हिक्टोरिया मार्केट, मेलबोर्न झु/ म्युझियम, कॉमेडी थिएटर वगैरे ठिकाणी तर किल्डा बसने साऊथ मेलबोर्न, किल्डा मरिना, साऊथ मेलबोर्न बीच, क्राऊन कॅसिनो वगैरे ठिकाणी जाता येते. इयर फोनची सोय असते. त्या त्या ठिकाणाची माहिती, चार भाषांमध्ये उपलब्ध असते. दोन्ही मिळून सुमारे ३० प्रेक्षणीय स्थळांना भेट देता येते. हवे तिथे उतरावे. ते ठिकाण पाहावे, अर्धा तासाच्या अंतराने बसेस मिळतात, त्यात बसून पुढे जावे. सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत त्या उपलब्ध असतात. दीड दिवसाच्या भाडय़ात दोन दिवस फिरता येते.

माझा मित्र आंतरराष्ट्रीय सायकलपटू आहे. म्हणून यजमानांनी आमच्यासाठी दोन सायकलींची खास व्यवस्था केली होती. दुसऱ्या दिवशी आम्ही घराजवळील मेलबॉर्न म्युझियमला सायकलने गेलो. नंतर घरी येऊन सायकली ठेवल्या व चालतच निघालो. व्हिक्टोरिया पार्लमेंट, आजूबाजूचा भाग, प्रिन्सेस थिएटर, वगैरे फिरत फेडरेशन चौकापर्यंत गेलो. तिथे एका पंजाबी ढाब्यावर जेवण केले आणि हॉप ऑन बसेसनी दिवसभर फिरलो. संध्याकाळी सात वाजता एका भारतीय हॉटलमध्ये जेवायला जायचे होते. आम्हाला छत्र्या घ्यावयास सांगण्यात आले, कारण नऊच्या सुमारास पाऊस येणार होता. आणि खरेच नऊ वाजता पाऊस आला.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सदर्न क्रॉस स्टेशनला गेलो. तिथे कॅनबेरा व पुढे सिडनी अशी दोन तिकिटे बुक केली. तिकिटावर सीट नंबरचा उल्लेख नव्हता. विचारले तेव्हा कळले फ्री सीट. कुठेही बसा. संध्याकाळी एका हॉटेलमध्ये गेलो. तिथे मेलबॉर्न शहरातील आमचे काही सभासद आले होते. सर्वाशी गप्पा झाल्या. तिथून आम्हाला दुसऱ्या सभासदाकडे राहायला जायचे होते. जाण्यापूर्वी यजमानांनी आमच्यापुढे एक गेस्ट बुक ठेवले, आमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. ते पुस्तक पाहिल्यावर आम्हाला खूप आश्चर्य वाटले. कारण गेस्टचा राबता त्यांच्या घरी १९९० पासून म्हणजे गेली २५ वर्षे होता.

दुसऱ्या सभासदाचे घर मेलबॉर्नपासून ३० कि.मी. अंतरावर वारनदायते (Warrandyte) नावाच्या एका खेडेगावाजवळच्या एका जंगलात होते. ४० एकराचे त्यांचे जंगल होते व त्यात हे घर होते. त्यांच्याकडे टास्मानियाहून आलेला एक सभासद महिनाभर राहत होता. तो कॅराव्हॅन घेऊन आला होता. झाडांच्या सालींवर तो संशोधन करीत होता. तो त्याच्या गाडीतच राहत/झोपत असे. फक्त यांची वॉश रूम वापरायचा. यांच्या घरातील वार्डरोबच्या दाराची खुंटी बळकट करणे, बुकशेफमध्ये जास्तीचा कप्पा करून देणे, इलेक्ट्रिकचा पॉइन्ट करून देणे अशी कामे तो सहजतेने करीत असे. त्याला भारतीय जेवण हवं होतं. त्यानुसार विचारून त्याने साहित्य आणून दिले. आम्ही तिघांनी मस्त भारतीय जेवण बनविले आणि जेवलो. तत्पूर्वी गावात फिरून आलो. येरा नामक नदीचे उगमस्थान पाहिले. सर्वप्रथम सोन्याची खाण येथे सापडली असे सांगण्यात आले. जवळच्या म्युझियममध्ये सोनेमिश्रित दगड पाहिले.

त्यांचे घर जंगलात असल्यामुळे तेथे सारख्या आगी लागतात. त्यांनी घराच्या बाजूला ३० फूट खोलावर एक तळघर बनवून घेतले आहे, ज्यात आगीच्या वेळेस सुमारे ३० जण सुखरूप राहतील अशी व्यवस्था आहे. प्राथमिक शिक्षक असलेले ८७ वर्षांचे आमचे यजमान, सकाळी आम्हाला सोडायला स्वत: गाडी चालवत बस स्टॉपवर आले होते. तत्पूर्वी पहाटे पाच वाजता उठून त्यांनी आमच्यासाठी नाश्ता व चहा बनविला होता. त्यांचा निरोप घेऊन आम्ही सदर्न क्रॉस बस स्टेशन गाठले. तेथून आम्हाला कॅनबेराची बस मिळाली.

कॅनबेरा संध्याकाळी पाच वाजता येणार होते. आम्ही ज्यांच्याकडे राहणार होतो. त्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांनी ईमेलवरून ‘मी साडेसहा वाजेपर्यंत व्यस्त आहे. घरच्या या पत्त्यावर शक्य असल्यास टॅक्सीने या, पाय पुसण्याखाली ठेवलेली घराची किल्ली घेऊन घरात जा. टेबलावर खाद्यपदार्थ आहेत. खा- चहा, कॉफी करून घ्या,’ असे कळवले. आम्ही टॅक्सीने घरी आलो. दार उघडून आत आलो, तर हॉलमध्ये एक मोठी काळी मांजर होती. स्वयंपाकघरातही एक मोठी मांजर होती. तिकडे मांजरांसाठी विशेष अन्नाची सोय केली असते.

पावणेसातला आमची यजमानीण आली. तिला दोन मुली व एक मुलगा होता. पकी एक मुलगी सिडनीला फॅशन डिझाइनमध्ये पदवीचे शिक्षण घेत होती. मुलगा व दुसरी मुलगी इथेच कॉलेजमध्ये शिकतात. आम्ही आमच्या खोलीत गेलो. तासाभराने बाहेर आलो, तेव्हा हॉलमधील दिवा सुरू होता. ती काही तरी वाचत होती, काय करते आहेस, असे विचारले, तर म्हणे, उद्या तुमच्यासाठी भारतीय जेवण काय करावे म्हणून रेसिपीचे पुस्तक वाचत आहे. तिला सांगितले की तू काहीही वाचू नको. उद्या भारतीय जेवण आम्ही बनवू, हवे तर तू आम्हाला मदत कर. तिला खूप आनंद झाला. तिचा नवरा प्रसिद्ध क्रिकेटपटू होता. उद्यापासून तेथे क्रिकेटचे सामने सुरू होणार होते. उद्घाटनाला त्यांचे प्रेसिडेंट येणार होते. त्यामुळे तो रात्री केव्हा येणार याचा अंदाज नव्हता. शिवाय त्याला सकाळी लवकर जायचेही होते.

सकाळी उठून दिवाणखान्यात आलो तर मुलगा, ‘कॅनबेरा टाइम्स’ वाचत होता. आई सायकलिंगला  गेली होती. तिच्या मुलीने सगळ्यांसाठी कॉफी बनवून आणली. तिने विचारले की, तुम्ही रात्री भारतीय जेवण केव्हा बनवणार आहात? कारण त्या वेळी मीही मदत करणार आहे.

सकाळी दहा वाजता त्यांच्या कारने कॅनबेरा बघायला निघालो. तत्पूर्वी त्यांनी आम्हाला मागील परसदारी असलेली बाग दाखविली. तिथे पोहण्यासाठी तलाव होता. त्याच्या थोडे पुढे कोंबडय़ांसाठी एक मोठे खुराडे होते. बाहेर पडल्यावर आधी हिलवर गेलो, तेथून पूर्ण शहर दिसत होते. कॅनबेरा शहर मोठे टुमदार आहे. मेलबॉर्न व सिडनी यांच्या वादात कॅनबेराला देशाच्या राजधानीचा दर्जा मिळाला. वॉर मेमोरिअल, जुने पार्लमेंट, नॅशनल म्युझियम, नवे पार्लमेंट, बोटानिक गार्डन, बोन्साय कलेक्शन वगैरे बघून घरी परतलो. दरम्यान, नवीन पार्लमेंटच्या कॅन्टीनमध्ये पोटाची शांती केली.

दुपारी साडेचारला पुन्हा बाहेर पडलो. येथे दोन विद्यापीठं व इतरही बऱ्याच नावाजलेल्या शैक्षणिक संस्था आहेत. शैक्षणिकदृष्टय़ा कॅनबेरा एक परिपूर्ण गाव आहे. भाजी बाजारात गेलो. तेथून भाजी व इतर बरीच खरेदी करून घरी परतलो. चौघांनी मिळून  भारतीय जेवण बनविलं. ते सर्वाना फार आवडलं. रात्री या कुटुंबासोबत गप्पागोष्टी झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला सिडनीला जायचं होतं. त्यासाठी बस स्टेशनवर सोडावयास दोघी मायलेकी आल्या होत्या.

सिडनी स्टेशनला दुपारी बारा वाजता पोहोचलो. गाडीतूनच यजमानांना फोन केला. ते म्हणाले, जिथे तुम्ही उतरलात, तेथून थोडे पुढे येऊन चौकात थांबा. दहा मिनिटांत येतो. कुठे दुसरीकडे जाऊ नका, कारण तेथे पाìकग नाही. त्यांना आज रविवार असल्यामुळे वेळ होता. संध्याकाळी मॅनली व शेली बीच पाहिले. कारण ही ठिकाणं टुरिस्ट बसेस दाखवीत नाहीत. इथेही होप ऑन होप ऑफ बसेसची सोय होती.

सिडनीमधील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे सिडनी हार्बर ब्रिज. हार्बर म्हणजे समुद्राचा मोठा पट्टा जमिनीत घुसलेला असून, त्याच्या दोन्ही बाजूला टेकडय़ा आहेत. या टेकडय़ांना जोडणारा हा पूल असून, हार्बरमध्ये शिरणाऱ्या बोटी त्याच्या खालून जातात. पुलावर चांगला चार-पाच पदरी गाडय़ा जाणारा रुंद रस्ता आहे. आगगाडीचा पण मार्ग आहे. सायकलस्वारांसाठी वेगळा रस्ता आहे. पुलाची कमान या सगळ्याच्या वर समुद्रापासून २५० फुटांवर आहे.

सिडनीला जाणाऱ्या प्रत्येकाने  तिथले मत्स्यालय आणि ऑपेरा हाऊस पाहिलेच पाहिजे. हे प्रचंड आकाराच्या शिंपल्यांनी बनवल्यासारखं दिसतं. त्याच्या सुरुवातीच्या एका भागात मोठं हॉटेल आहे. अर्थातच सुरेख व महागडं. ऑपेरा हाऊसमध्ये जाण्यासाठी अनेक लोक एका वेळेस चढू शकतील अशा खूप रुंद पायऱ्या आहेत. खरं तर तो जिनाच, पण खूप रुंद असल्यामुळे जिना म्हणवत नाही. बाजूने मोठ्ठय़ा गच्ची. इथे येऊन लोक सूर्यास्त बघतात. ऑपेरा हाऊस आतूनही अत्यंत आधुनिक, भव्य व प्रेक्षणीय आहे. कुठंही बसलं तरी स्टेजवरील दृश्य चांगलं दिसतं आणि आवाज स्पष्ट ऐकू येतो.

येथील माशांचं वैविध्य असलेलं मत्स्यालय बघायला जवळजवळ तीन तास लागतात. पाण्यात विहार करणारा ‘प्लॅटीपस’ नावाचा प्राणी हे ऑस्ट्रेलियाचं वैशिष्टय़ं आहे. तो साधारण फूटभर लांब असून ‘ऑटर’सारखा दिसतो. मासे खाण्यासाठी त्याला रुंद चोच असते. तो उडत नाही. देवमाशाप्रमाणे पाण्यात छान पोहतो. काही वेळाने हवेत श्वास घेण्यासाठी वर येतो. तो अर्धा तासही पाण्याखाली राहू शकतो. इथल्या आदिवासी लोकांमध्ये त्याच्याबद्दलची एक कथा सांगितली जाते. पक्षी आणि प्राणी यांची सतत स्पर्धा असते. ‘प्लॅटीपस’ला चोच आहे, अंडी घालतो म्हणून पक्षी त्याला आपल्या सभेला बोलावतात. तो उडत नाही, चिखलात सरपटतो म्हणून प्राणीही त्याला बोलावतात. पण हा चतुर ‘प्लॅटीपस’ दोघांशीही मत्री करतो. देवाचा तो लाडका आहे, असं आदिवासी मानतात. तो या मत्स्यालयात पहायला मिळाला.

सिडनीमध्ये असलेल्या शंभरेक बीचपैकी बोंडी बीचला सर्व प्रवासी भेट देतात. हे सगळेच बीच अत्यंत स्वच्छ आहेत. आम्हाला वेस्टमेडला जायचं होतं. आमच्या यजमानांनी आम्हाला येताना वाटेत पारामाटाला मोठा मॉल आहे तो पाहून या, त्यासाठी पारामाटाचं परतीचं तिकीट काढा असा सल्ला दिला. त्यांना वाटलं की, आधी वेस्टमेड स्टेशन येईल व नंतर पारामाटा स्टेशन. आम्ही तिकीट काढून फलाटावर आलो. इंडिकेटरवर आधी पारामाटा व नंतर वेस्टमेड स्टेशन होतं. वेस्टमेड स्टेशनला ते आम्हाला घ्यायला येणार होते. त्यामुळे पारामाटाला उतरून टॅक्सीने पुढे जाणं शक्य नव्हतं. ते तिकडे वाट पाहून काळजी करणार, शिवाय वाय-फाय नसल्यामुळे फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधणं शक्य नव्हतं. शेवटी हिंमत करून वेस्टमेड स्टेशनला उतरलो. उतरल्यावर स्टेशनवरील अधिकाऱ्यांना भेटलो. आमचा गोंधळ सांगितला. किती दंड व तिकिटाचे पसे द्यायचे ते विचारलं. त्यांनी आम्हाला बाजूच्या गेटने बाहेर जाऊ दिलं. पुन्हा अशी चूक करू नका म्हणून बजावलं.

या प्रचंड खंडावर मनुष्यवस्ती थोडय़ाच भागात आहे. ब्रिटिश वसाहतवाद्यांचं राज्य येण्यापूर्वी या देशात जे मूळ रहिवासी होते, त्यांची संस्कृती साधी होती. अनेक र्वष गोऱ्या वसाहतवाद्यांनी त्यांची छळवणूक केली होती. त्यांच्या मुलांना सरकारी शाळेत प्रवेश मिळत नसे. त्यांना फार तुच्छतेने वागवत. शेतातील कष्टाची, कमी पगाराची कामंच त्यांना मिळत. मात्र अलीकडे या लोकांना प्रगत लोकांमध्ये सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अलीकडे काही र्वष त्यांना भरपूर सरकारी सुविधा दिल्या जातात. फुकट किंवा अगदी कमी खर्चात शिक्षण, सरकारी नोकऱ्या, घर घेण्यात सवलती वगैरे, वगैरे. पण शिक्षण घेणं किंवा सातत्याने काम करणं याची गोडी अजून त्या लोकांना लागलेली नाही. त्यांच्यापकी काही लोक रग्बीसारख्या खेळातून चमकतात. काही चित्रकार प्रसिद्ध आहेत. त्यांच्या खाण्याच्या, राहण्याच्या सवयी बदलल्या आहेत. पण त्यामुळे आता ते पूर्वीसारखे सडसडीत राहिलेले नाहीत.

ऑस्ट्रेलियात पौर्वात्य म्हणजे चिनी चेहरेपट्टीचे अनेक लोक दिसले. त्याशिवाय कोरियन, जपानी, थाई, सिंगापुरी हेही होते. त्यातही इंडोनेशियन, मलेशियन या लोकांची ठेवण तशीच, पण रंग जरा गडद असतो. आता सावकाश का होईना, पण या राष्ट्राचा चेहरा आशियाई होतो आहे.

न्यूझीलंडची धावती सफर

सर्वास इंटरनॅशनलच्या (बिगरसरकारी संघटना) त्रवार्षिक साधारण सभेसाठी न्यूझीलंडमध्ये, ऑकलंडजवळ मातामाता येथे जायचं होतं. न्यूझीलंडला सहसा सिंगापूर किंवा हाँगकाँगमार्गे जातात. आम्ही सिंगापूरमार्गे गेलो. तेथे कस्टमसंबंधीचे नियम खूप कडक व वेगळे आहेत. त्यासंबंधी माहिती असल्यामुळे आम्ही आधीच काळजी घेतली होती. त्यामुळे आमची लगेच सुटका झाली. आमच्या एका मित्राने प्रतिबंधित वस्तूंपैकी आपल्याजवळ काहीही नाही असे जाहीर केले होते. विमानतळावर उतरल्यावर एक प्रशिक्षित कुत्रा त्याची बॅग हुंगायला लागला. कस्टम अधिकाऱ्याने त्याची बॅग तपासली तर एक लिंबू निघाले. मित्राने बरेच युक्तिवाद केले. पण कसलाही उपयोग झाला नाही. शेवटी एका लिंबासाठी त्याला अठरा हजार रुपये दंड मोजावा लागला व शेवटी अधिकाऱ्याने त्याला ते लिंबू कचऱ्याच्या पेटीत टाकायला सांगितले.

टॅक्सीने युथ होस्टेलला गेलो. तेथील व्यवस्था स्वस्त आणि मस्त होती. तेथील किचन वापरून नंतर भांडी घासणे, टेबल स्वच्छ करणे, वगैरे कामे आपल्याआपण करायची असतात. त्यामुळे किचन एकदम स्वच्छ होते. लोकांना बाहेरून बाजारातून आणलेले पदार्थ ठेवण्यासाठी किचनमध्ये रँक, फ्रीज होते. आपले सामान/वस्तू ठेवल्या जागेवरून हलणार नाहीत, याची पूर्ण खात्री होती.

संध्याकाळी बाहेर फिरायला गेलो. बाजारात, रस्त्यावर भारतीय माणसे बऱ्याच प्रमाणात होती. स्काय टॉवर दिसला. तेथील ३६० अंशातून फिरणारे रेस्तराँ प्रसिद्ध आहे. लहान दुकानदार, रेस्तराँ चालवणारे, शाळा कॉलेजचे विद्यार्थी यांच्यात भारतीय उपखंडातील लोक तसंच चिनी, जपानी, कोरियन व मलेशियन दिसत होते.

येथील मूळ लोक मावरी. त्यांच्यावर एके काळी अन्याय झाला. आता त्यांना काही खास सवलती दिल्या जातात. त्यांच्या राणीला सभारंभात खास स्थान दिले जाते. आताचे मावरी लोक पाश्चात्त्य पद्धतीने राहतात. कमी श्रमाची सुखासीन राहणी आणि आहार यामुळे त्यांची पूर्वीची काटक शरीरयष्टी जाऊन, आता त्यांच्यात स्थूलपणाचे प्रमाण जास्त दिसते.

दुसऱ्या दिवशी सकाळी फेरीने जाऊन ‘वायहेके’ हे अप्रतिम आयलंड पाहिले. तिथे मूळच्या पुणेकर आणि आता ऑकलंडला स्थायिक झालेल्या एका बँक अधिकाऱ्यांच्या घरी जेवण झालं.

सभेच्या पूर्वसंध्येला एका हॉटेलला गेट टू गेदर होते. तिथे बसने जाण्याचे ठरविले. इथे बसमध्ये सर्व कामे चालकच करतो. आम्ही सामानासह बसमध्ये चढलो. तिकीट काढण्यासाठी चालकाकडे गेलो. तो म्हणाला, आधी सीटवर बसा, दम खा, मग तिकीट काढा. त्याने प्यायला पाणी आणि खायला कूकीज दिल्या. गप्पा सुरू झाल्यावर कळलं, तो मुळचा मुंबईचा होता. स्टॉप येण्यापूर्वी एका चौकात त्याने गाडी थांबविली, म्हणाला, या रस्त्याने आठ मिनिटे चालल्यावर तुमचे ठिकाण येईल. त्याने दाखविलेल्या दिशेला दोन रस्ते जात होते, म्हणून एका दुकानात पत्ता विचारला तर दुकानदाराने, त्याच्या मुलाला सांगितले की, यांना त्यांच्या हॉटेल वर सोडून ये. त्या मुलाने त्याच्या कारने आम्हाला हॉटेलपर्यंत सोडले, रिसेप्शनपर्यंत सामान आणण्यास मदत केली. वर म्हणाला, घाबरू नका, मी याचे पैसे घेणार नाहीये. तोही पूर्वी मुंबईत राहत होता.

मातामाता येथे सहा दिवसांचा भरगच्च कार्यक्रम होता. दरम्यान एक दिवसाची सहल आयोजित करण्यात आली होती. त्यात रोटारुआ, टाउपो, तीराउ रोड वगैरे भागाला भेट दिली. रोटारुआला गरम पाण्याचे झरे आहेत. रेडवूड्स, कुराउ पार्क, पोहूटू गिझर, केरोसीन क्रीक, वाइकतोला पोहचलो. तेथे नदीवर इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन आहे. परतीच्या प्रवासात वैराकी येथील रिसोर्ट, आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्सला भेट दिली.

सभेचे सहा दिवस केव्हा संपले कळलेच नाही. पुन्हा ऑकलंडला आलो. ऑकलंडहून वेलिंग्टनला बसने जायचे ठरविले. अकरा तासांचा प्रवास मजेत झाला. गाडीत वायफाय होतं, टॉयलेटची सोय होती. एक सुंदर दृश्य आम्हाला कॅमेऱ्यात टिपायचं होतं. ड्रायव्हरने गाडी थांबवली. आम्ही फोटो घेत होतो. इतक्यात ड्रायवर एका प्रवाशावर जोरजोरात ओरडला. ‘ओन्ली फोटो, नो पॉटी’. तो प्रवासी नैसर्गिक विधींसाठी झुडुपात जात होता. ड्रायवरने त्याला बोलावून यथेच्छ शिव्या घातल्या. स्वच्छतेबद्दल केवढी ही जागरूकता! आणि हेही महाशय, बसमध्ये सोय असताना झुडुपात का जात होते कोणास ठाऊक!

वेलिंग्टनला पोहोचलो तर रात्र झाली होती. युथ होस्टेल जवळच होते. सामान बरेच असल्यामुळे टॅक्सी ठरवली. वाटेत ड्रायव्हरला विचारले की येथे जवळ चांगले भारतीय जेवण कुठे मिळेल? त्याने थोडी वाट वाकडी करून आधी हॉटेल दाखविले, पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात आले की इथे एकेरी वाहतूक आहे. त्यामुळे युथ होस्टेलला जायला फेरा पडेल. तेव्हा तो म्हणाला, आपल्याला उगीचच फेरा पडला, पण तुम्ही काळजी करू नका. मी वाढीव भाडे घेणार नाही.’ बऱ्याच वेळेपर्यंत आमचा विश्वासच बसत नव्हता.

वेलिंग्टन, राजधानी असली तरी, गाव लहान पण टुमदार आहे. थंडगार वारे जोराने वाहत असतात. अगदी या वाऱ्यात उडून जाऊ का, अशी भीती वाटते. रविवार असल्यामुळे भाजी-फळ बाजार फुलला होता. थोडे पुढे समुद्राकाठी फिरताना, एके ठिकाणी, पुलाच्या कठडय़ाला खूप सारी कुलुपे लावलेली दिसली. चौकशी केली तर कळले की, लोक मनातील इच्छा येथे व्यक्त करतात आणि कठडय़ाला कुलूप लावतात. त्यामुळे इच्छा पूर्ण होते असा समज आहे. इच्छा पूर्ण झाल्यावर शक्य झाल्यास आपले कुलूप काढून नेतात. अजून बऱ्याच जणांच्या इच्छा पूर्ण व्हायच्या आहेत, असे दिसले.

अप्रतिम निसर्ग सौंदर्य, प्रचंड वृक्षसंपदा, कमी लोकवस्तीची शांत गांव. उत्तम रस्ते, कायद्याचे काटेकोर पालन करणारे सुसंस्कृत लोक, असं या देशाचे थोडक्यात वर्णन करता येईल.
प्रदीप जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2016 1:04 am

Web Title: austrelia and new zealand
Next Stories
1 चला लाओसला…
2 तुर्कस्तानची देखणी राजधानी
3 उलान उडे आणि परत…
Just Now!
X