निसर्गाची मुक्तहस्ते उधळण, इतिहासाचा स्पर्श झालेल्या प्राचीन वास्तू आणि समुद्राचे सान्निध्य असल्यामुळे खाण्यात माशांचे विविध प्रकार यामुळे क्रोएशियाची सफर अविस्मरणीय होऊन जाते.

एड्रीएटिक समुद्रात क्रोएशिआच्या हद्दीत हजारांपेक्षा जास्त लहानमोठी बेटे आहेत. त्यापैकी फार थोडय़ा बेटांवर मानवी वस्ती आहे. त्यातली वीस-बावीस बेटे पर्यटकांची आवडती आहेत. आम्ही स्प्लिट येथून क्रूझ बोटीने निघून ब्राच, व्हार कोर्चुला ही बेटे आणि दुब्रावनीक हे पर्यटकांचे समुद्र किनाऱ्यावरील आवडते शहर पाहिली. ही बेटं व्हार खाडीमुळे दालमेशिअन भागापासून अलग झालेले, समुद्रातून ये-जा करण्यासाठी इटलीच्या जवळपास असल्याने अगदी पूर्वापारपासून महत्त्वाचे. इलेरिअन जमातीची पहिली वस्ती इथे होती. त्यामुळे बहुसंख्य जनता स्वत:ला व्हार्टेशिअन म्हणवते. रोमन कारकिर्दीत येथील डोलामाइट व कॅलशिअम डोंगरांच्या जवळ पठारी भागात वाइन, ऑलीव्ह, लव्हेंडर, रोझमेरीसारख्या सुवासिक फुलांची लागवड झाली.

व्हार सिटीमध्ये आपल्याला सिटी वॉलचा भाग, पाण्याची व्यवस्था, कमानी, चर्च असे रोमन अवशेष पाहायला मिळतात. असे म्हणतात की रोमन काळात सुरू झालेले वाइन व ऑलीव्हचे उत्पादन आजही सुरू आहे. नंतरच्या राजवटींमधे क्रोएशिआत फार नासधूस झाली. ऑस्ट्रो-हंगेरिअन राजवटीत मात्र येथे बरीच सुधारणा होऊन वाइन, परफ्यूम इंडस्ट्री, ऑलीव्हचे जोरात उत्पादन सुरू झाले. त्याच वेळी व्हार येथे मोठे आरमार केंद्र झाले. आरमारी नौका, दारूगोळा, युद्ध साहित्य बनवले जाऊ लागले. त्यांनी या भागाला स्टारी ग्राड असे नाव दिले.

ब्राच चॅनेलने अलग झालेले ब्राच हे बेट व्हारनंतरचे मोठे बेट. स्प्लिट व्हार येथून निघालेल्या बोटी झ्ॉतनी रॅट या धक्क्यावर येतात. तेथून बोल किनाऱ्यावर जाण्यासाठी दुतर्फा पाइन वृक्ष असलेला प्रॉमिनाड फारच छान आहे. फिरताना जाणवणारा उन्हाचा मारा वृक्षराजीमुळे सुसह्य़ होतो. वाऱ्याच्या मंद झुळकी प्रॉमिनाडवर चालायला प्रोत्साहित करतात. बोलचा गोल्ड हॉर्न किनारा वेळोवेळी आपला आकार बदलत असतो. ओहोटीच्या वेळेस तो अक्षरश: काना नसलेल्या अ अक्षरासारखा होतो. भरतीच्या वेळेस कधी अर्धचंद्राकृती तर कधी सरळ असतो. इथले पाणी अतिशय स्वच्छ आहे. पण इथला किनारा वाळूचा नाही, तर चपटय़ा, गोलगोल पेबल्सचा आहे. सूर्यप्रकाशात किनारा खरोखर चकाकत असतो. झ्ॉतनी रॅट येथे मोठय़ा बोटी तर बोल येथे कयाकर्स आहेत इथे समुद्रात डुंबणाऱ्यांची, सन बेदिंग करणाऱ्यांची खूप गर्दी असते.

11-lp-croatian-island-300

कोर्चुला खाडीमुळे अलग झालेले, पूर्व पश्चिम पसरलेले कोर्चुला बेट बाकी बेटांपेक्षा तुलनेत जरा लहानच आहे. या समुद्र किनाऱ्याला लागूनच जुनी सिटी वॉल आहे. त्याच्या आत दाटीवाटीने घरं आहेत. सेंट मार्क चर्चचा उंच बेल टॉवर जणू काही त्या घरांच्या गर्दीतून सर्व गावावर नजर ठेवत डोकावतो. सिटी वॉलच्या आत जाताना चौकात दगडावर ग्रीक भाषेत काही मजकूर लिहिलेला आहे. इलीरिअन वसाहतींचे काही अवशेष आहेत. बेटावर पाइन वृक्षराजीबरोबरच रोमन काळापासूनच्या द्राक्षांच्या बागा आहेत.

इथले माकरे पोलो म्युझियम प्रसिद्ध आहे. माकरे पोलोची प्रवास वर्णने प्रसिध्द आहेत. त्यात आपले वडील तसंच काका यांच्या बरोबर समुद्रमार्गे आशिया खंडाची सफर करून कुबलाईखानला भेटून तो २४ वर्षांनी कसा परतला, याची वर्णने आहेत. त्याच्या प्रवासाची नकाशासहित माहिती म्युझियममध्ये आहे. इथे पूर्व पश्चिम भागांना जोडणारा सरळ रस्ता आहे. फारशी गर्दी नसल्याने गावातून निवांत फिरता येते. शांतपणे बसून सूर्यास्त पाहता येतो. किनाऱ्यावर असलेल्या बऱ्याचशा रोमन व्हिलाज्चे आता हॉटेलात रुपांतर झाले आहे.

दुब्रावनीक हे या बेटांतील सर्वात मोठे व गजबजाटाचे बेट. ते फार पूर्वीपासूनच एड्रीएटिक समुद्रातले मोक्याचे ठिकाण आहे. त्याचे मूळ नाव आहे रागूसा. क्रोएटस्नी हाकलून  रोमन या बेटावर आले. दगड, खडकांचे वर्चस्व असलेल्या या बेटाला त्यांनी त्यांच्या भाषेत रागूसा हे नाव दिले. पण पुढे ते बदलून त्याचे दुब्रावनीक झाले. युरोपात सर्वच देशात जुना व नवा भाग असतोच. तसाच इथेही आहे जुना भाग दोन किमी लांब व सहा मी. रुंद अशा दगडी सिटी वॉलमधे बंदिस्त आहे. नेपोलिअन भेटीच्या वेळी इथे त्याच्या स्वागतासाठी येथे तीन दरवाजे होते. त्यापैकीच पिला गेट हे एक. बसमधून उतरल्यावर लाकडी पूल पार करून आपण पिला गेटवर येतो. पूर्वी सूर्यास्तानंतर बंद झालेले गावाचे प्रवेशद्वार सूर्योदयानंतरच उघडत असे. उघडताना ते भरभक्कम लोखंडी साखळीने ओढले जाई.

शत्रूपासून संरक्षण म्हणून पूर्वी खंदक होता, आता तो बुजवून तेथे लोकांसाठी पार्क बनले आहे. गावात प्रवेश केल्यावर आपण पांढऱ्या रंगाच्या, ३०० मी. लांब पेव्हर ब्लॉक्सच्या हमरस्त्यावर, स्ट्राडन्, येथे येतो. त्याच्या दोन्ही बाजूंना डॉमिनीकन चर्च, तसंच त्याकाळच्या वैशिष्टय़पूर्ण ऐतिहासिक लाकडी इमारती आहेत. आत आल्याबरोबर चर्च व बाजूला ओनोफ्रीओ फाऊंटन आहे. तिथे बाहेरून आलेल्या पाहुण्यांसाठी पाण्याची सोय आहे. डॉमिनीकन मोनेस्ट्री ही सेंट ब्लेस या धर्मगुरुच्या नावे बांधलेली आहे. आतमधे नेहमीचेच चर्चचे दृश्य आहे. चर्चच्या दर्शनी भागावर युद्धातील तोफगोळा लागलेली जागा आहे. त्यावेळच्या भूकंपात त्यावरील सेंट ब्लेसच्या पुतळयाला अजिबात इजा झालेली नाही. चर्चमधे एका बाजूला १६व्या शतकातली फार्मसी आहे. प्रत्येक औषधासाठी वेगवेगळ्या रंगाच्या बाटल्या, बरण्या, औषधी पावडर मापण्याचे तराजू, औषधी कुटण्यासाठीचे खलबत्ते, त्यांचे फाम्र्युले, रुग्णांची यादी असलेल्या चोपडय़ा असा सगळा तेव्हाचा जामानिमा काचेच्या कपाटात बंद आहे. मुख्य म्हणजे ही फार्मसी आजही व्यवस्थित सुरू आहे.

चर्चपुढे ऐतिहासिक इमारती आहेत. युरोपमध्ये अगदी आतल्या भागात पूर्वी लाकडाच्या दुमजली इमारती असत. एकेका कुटुंबाची एकेक इमारत असे. तळाला रस्त्यालगत प्रवेशद्वार, सामान ठेवण्यासाठी गोदाम, वरच्या मजल्यावर मालकाचे कुटुंब, तर दुसऱ्या मजल्यावर पाहुण्यांची सोय अशी व्यवस्था असे. सर्वात वर चिमणी असलेले स्वयंपाकघर असे. त्यामुळे चुकून आग लागलीच तर ती वरच्या वर विझवली जात असे. अशा एक-दोन इमारती अजूनही त्यांनी टिकवून ठेवल्या आहेत. बाकीच्या इमारतीत अद्ययावत हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, ब्रॅण्डेड स्टोअर्स आहेत.

मेन स्ट्रीटच्या शेवटचे आजचे स्पाँझा पॅलेस हे १६व्या शतकात हे कस्टम हाऊस होते. तिथे राजकीयदृष्टय़ा मौल्यवान वस्तू ठेवल्या जात असत. समोरील रेक्टर हाऊस हे ख्रिश्चन धर्मगुरूंचे राहण्याचे ठिकाण होते. त्याच्या आतमध्ये चित्रांचे संग्रहालय आहे. पूर्वी तिथे टांकसाळ होती. त्याच्या समोरच्या चौकाला लुझा स्क्वेअर असे नाव आहे. चर्च ऑफ सेव्हिअरचे दोन वेळा झालेल्या भूकंपात मोठे नुकसान झाले होते. दोन्ही वेळा त्याची पुन:र्बाधणी झाली. सध्या तिथे चाललेल्या उत्खननात पूर्वीचे काही अवशेष मिळाले आहेत.

12-lp-croatian-island

समोरील लुझा स्क्वेअरमध्ये ओरलँडो कॉलम आहे. पूर्वी कधी काळी झालेल्या परकीय आक्रमणात राजाने गावाचे रक्षण केले होते, त्याप्रीत्यर्थ हा स्तंभ आहे. येथूनच राजकीय घोषणा होत, कुणाला शिक्षा करायची असेल तर त्यासाठी हीच जागा वापरली जात असे. दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या सेव्हिअरची मिरवणूक इथूनच सुरू होई. आजही ही मिरवणूक तिथूनच सुरू होते. बेल टॉवरमध्ये पूर्वी दर तासाला दोन कामगार येऊन घडय़ाळाचे टोले देऊन जात असत. आता दोन धातूंनी बनवलेले सैनिकांचे पुतळे टोले मारतात.

पूर्वेकडील प्रवेशाबाहेर दवाखाना असे. बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांना तिथेच काही दिवस राहण्याची सक्ती असे. जेणेकरून त्यांना काही रोग असतील तर आत गावात त्याची लागण होऊ नये. रोमन काळी दूरवरून पाणी आणण्यासाठी अ‍ॅक्विडक्ट असे. उंचावरून येणारे पाणी गावात ठिकठिकाणी तोटीमधून, ओनाफ्रीओ फाऊंटनमार्फत लोकांना पुरवले जात असे. आजही काही ठिकाणी ती व्यवस्था पाहायला मिळते.

जुन्या शहरातले वातावरण झगमगाटाचे, अत्यंत जिवंत आहे. नवा भाग झाला तेव्हा इथून बरेचसे लोक तिथे राहायला गेले. पण त्यांना स्ट्राडनला दिवसातून एक वेळा तरी चक्कर मारल्याशिवाय चैन पडत नाही, असे सांगितले जाते. जुन्या शहराच्या बाहेरील बाजूला असलेल्या किल्ल्यात हल्ली ‘गेम ऑफ थ्रोन’ या गेमची पूर्ण दिवसाची टुर असते. तिथे टीनेजर्सची भरपूर गर्दी असते.

ही सर्व बेटे असल्याने समुद्री खजिन्याची काही कमी नाही. नुसत्या वाइनमध्ये वाफवलेले खुबे, लांबट आकाराच्या निळ्या रंगाच्या तिसऱ्या मटकवायला मज्जा येते.

झाग्रबला भेट

क्रोएशिआ हा सेंट्रल युरोपातील  देश. ऐतिहासिक काळात तुर्की, ऑटोमन व ऑस्ट्रो-हंगेरिअन इत्यादी राजवटी तिथे होऊन गेल्या. १९१८ मध्ये पहिल्या महायुद्धानंतर सर्बिया, क्रोशिया, स्लोव्हेनिया मिळून त्याचे किंगडम ऑफ सर्बिया झाले. त्याचे पुढे अनुक्रमे किंगडम ऑफ युगास्लाव्हिया, तसंच पुढे फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हिया झाले. त्यापुढे कम्युनिस्ट राजवट येऊन दुसऱ्या महायुद्धानंतर एकेक पद चढत मार्शल टिटो राष्ट्राध्यक्ष झाले. त्यानंतर १९५३ ते १९८० या काळात त्यांच्या अध्यक्षतेखाली सोशालिस्ट फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लव्हिया झाले. त्यांना नंतर हर्जेगावेनिया, माँटेनेग्रा हे लहान स्लविक देश मिळून युगोस्लाविया हा एकच देश तयार झाला.

मार्शल टिटोंच्या निधनानंतर म्हणजे १९८० पासून इथे राजकीय कुरबुरी सुरू झाल्या व प्रत्येक प्रांताला स्वतंत्र होण्याचे वेध लागले. माँटेनेग्रा व सर्बिया मिळून त्यांची युगास्लाव आर्मी झाली. १९९१ मध्ये त्यांनी सर्वाबरोबर युद्ध पुकारले. स्लोवेनियाबरोबरची लढाई फक्त दहा दिवसच चालली, पण क्रोएशियाबरोबर मात्र १९९५ पर्यंत चालली. त्यात क्रोएशियाचे बरेच नुकसान झाले. त्याचे नमुने आम्हाला स्लोवेनिया येथून क्रोएशियातील स्प्लिट आयलंड येथे जाताना पाहायला मिळाले. आता कुठे ते स्थिरस्थावर व्हायला लागले आहेत; आता सर्व प्रांतांचे स्वतंत्र देश झाले आहेत. आता लोक एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकतात, पण एकमेकांबद्दल असूया आहेच. असो.

येथील पहिली वसाहत ईलीरिअन. सेंट्रल युरोपमध्ये सातव्या आठव्या शतकात ग्रीक, रोमन्स होते. पुढे व्हेनिसचे व्हेनिशिअन, टर्क, मंगोल, बर्बर आले. त्यांनी रोमनांना तेथून हाकलून दिले. त्यांनी दक्षिणेला कार्पेशिअम माऊंटनमध्ये वस्ती केली. तेथील हिरवी कुरणे बकऱ्या-मेंढय़ांसाठी उपयुक्त ठरली. त्यांच्या भाषेत दालमिटी म्हणजे मेंढी, म्हणून या भागाला दालमेशिआ संबोधले गेले. १७ व्या शतकापासून ऑस्ट्रो- हंगेरिअन राजवटीने मात्र एका शतकाहून अधिक काळ राज्य केले. येथे त्या काळात कॅथलिक धर्माचे वर्चस्व होते. त्यामुळे लोक, इमारती, राहणीमान या सगळ्यावर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव आहे. इथले हवामान सदैव आल्हाददायक  असते. इंग्लंड विमानाने दोन तासांच्या अंतरावर  असल्याने युरोपातील हिवाळ्यात इंग्रजांबरोबरच फ्रान्स, इटली येथूनही लोकांची इथे बरीच ये-जा असते. त्यामुळे लोक स्थानिक स्लाविक भाषांशिवाय इंग्लिश, फ्रेंच भाषा उत्तम पद्धतीने बोलू शकतात. त्यामुळे पर्यटकांना भाषेची अडचण येत नाही.

क्रोएशियाची राजधानी असलेले झाग्रब हे देशातील सर्वात मोठे शहर आहे. ते सेंट्रल युरोपात सावा नदीकाठी मेद्वेनिका डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. हे शहर अगदी रोमन काळापासून ते १८-१९ व्या शतकातल्या ऑस्ट्रो-हंगेरिअन राजवटीपर्यंत ऐतिहासिक पातळीवर, तर पुढे २० व्या शतकात शास्त्रीय संशोधन, औद्योगिक, शैक्षणिक, दळणवळण या बाबत आघाडीवर होते. सातव्या- आठव्या शतकात झाग्रब दोन विभागात होते. सेंट मार्क चर्च व धर्मगुरूंचे वास्तव्य असलेला पूर्वेकडील कॅपिटॉल भाग तर पश्चिमेला गड्रेक हा औद्योगिक व कारागिरांचा भाग. १९ व्या शतकात ऑस्ट्रो-हंगेरिअन राजवटीत राज्यपाल बान जोसेफ येलासिक याने हे दोनही विभाग एकत्र करून झाग्रब असे नाव दिले.

झाग्रबची सिटी टुर करताना नव्या भागात बसमधून फिरता येते, पण जुन्या भागात पायीच फिरायचे असते. गाईडसह तशा टुर्स असतात जुन्या भागात सेंट मार्क चर्च व झाग्रब कॅथ्रिडलपासून पर्यटनाला सुरुवात होते. हे शहर सर्वच बाबतीत अग्रेसर असल्यामुळे इथला सर्वच कारभार भव्यदिव्य आहे. युरोपात जनतेने एकत्र येण्याची जागा म्हणजे सिटी स्क्वेअर. तसाच जुन्या झाग्रबमधील बान येलासिस चौक. येथील मोठी निशाणी म्हणजे येलासिसचा पुतळा. आता त्या चौकात विविध दुकाने, रेस्टॉरंटस् आहेत. त्यामुळे कुणाला इथे भेटायचे असेल तर ‘इन द् इव्हिनिंग अंडर द हॉर्स’ असे सांगितले जाते. या चौकाचे वेगवेगळ्या कारकीर्दीत वेगवेगळे नामकरण झाले होते. रशियन चळवळीच्या काळात हा रिपब्लिकन स्क्वेअर होता. त्या वेळी येलासिसचा पुतळा तेथून हलवला गेला होता. पण युगास्लाव्हिया विभाजनानंतर पुतळा परत त्याच्या जागी स्थानापन्न केला गेला.

त्या काळी हा घोडागाडीचा मार्ग होता. २० व्या शतकात त्याची जागा ट्रामने घेतली. दुसऱ्या महायुद्धानंतर गड्रेक येथील वस्ती वाढली. त्याबरोबरच रहदारीही वाढली. आज या परिसरात वाहनांच्या वाहतुकीला पायबंद आहे. स्क्वेअरच्या परिसरात प्राचीन इमारती, म्युझियम्स, ओपन बार आहेत. इथे खाण्यापिण्याची चंगळ असल्याने हा परिसर सदैव गजबजलेला असतो.

डावीकडे झाग्रबचे मिश्र धातूंनी बनवलेले मॉडेल आहे. मॉडेलपासून अगदी जवळ झाग्रब कॉथ्रिडल आहे. त्याची बांधणी नजीकच्या डोंगरावरील कॅल्शिअमच्या दगडांचा वापर करून करण्यात आली आहे. पण या दगडांवर हवामानाचा परिणाम होऊन त्यावर वरचेवर काम करावे लागते. झाग्रबचा राजा असताना झाग्रबभोवती भक्कम दगडी वेस होती. मंगोल स्वाऱ्यांत या वेशीची तसंच चर्चची बरीच तोडफोड झाली. त्याची परत बांधणी सुरू झाली त्या काळात तुर्की लोकांचे आक्रमण झाले. पण त्यांनी  चर्चला इजा केली नाही. पण त्यानंतर काही वर्षांनी झालेल्या भूकंपात अर्धी अधिक वेस कोसळली. आता आपल्याला त्यापैकी काही भागच पाहायला मिळतो. त्यानंतरच्या  पुनर्बाधणीत चर्चच्या प्रवेशावर ३५० फूट उंचीचे दोन मनोरे उभारण्यात आले. या मनोऱ्यांच्या दर्शनी भागावरील कोरीव काम अतिशय नाजूक आहे. त्यावरील बारीकसारीक गोष्टींचा तपशीलही उठावदार आहे.

झाग्रब हे जुने शहर असल्याने येथील रस्ते अरुंदच आहेत. पूर्वी शहराभोवती असलेल्या दगडी वेशीत प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे, स्टोन गेटस् होती. पण त्यापैकी आता फक्त एकच अस्तित्वात आहे. बहुतांश इमारती त्या काळी लाकडीच असत. त्यांच्यापैकी काही आगीत भस्मसात झाल्या. पण या स्टोन गेटमध्ये एक बेसिलिका, प्रार्थना स्थळ आहे. तिथे १६ व्या शतकातली हातात येशू असलेली मदर मेरीची मूर्ती आहे. आम्ही गेलो त्या काळात शाळांच्या परीक्षेचा मोसम असल्याने तिथे विद्यार्थ्यांची गर्दी होती.

उठून दिसणाऱ्या लाल रंगाच्या टाइल्सचे उतरते छप्पर असलेले सेंट मार्क चर्च हे व्हेनिस पद्धतीने बांधलेले आहे. प्रवेशद्वारावर मेरी व येशूच्या अर्धवट मूर्तीबरोबर जोसेफ, सेंट मार्क व चर्चभोवती कोनाडय़ात १२ धर्मगुरू, ऑस्ट्रो-हंगेरिअन राजवटी पूर्वीचा  सिंह व पांढरा किल्ला असलेले निशाण असे सगळे दगडावर कोरलेले आहे. इथले छप्पर अगदी वेगळ्याच पद्धतीचे आहे. उजवीकडे लाल पांढऱ्या टाइल्सचा सारीपाटाच्या पटाप्रमाणे असलेला क्रोएशिआचा झेंडा आहे. त्यावर मानचिन्ह, डावीकडे तीन सिंहांचे चेहरे आहेत त्यावर खाली पांढरा पट्टा सावा नदी दर्शवतो. त्याखाली कुना हा मुंगसासारखा दिसणारा प्राणी आहे. तर सर्वात खालचा पांढरा पट्टा क्रोएशियाचा किनारा दाखवतो. चर्चप्रमाणेच हिरव्या, सोनेरी रंगाच्या टाइल्सचा बेल टॉवर १९ व्या शतकात झालेल्या भूकंपातही जशाच्या तसाच होता.

स्ट्रॉसमायेर प्रॉमिनाड हे शहराचा नजारा पाहण्याचे तेथील उंचीवरील ठिकाण. त्या उंचीवरून आपल्याला जुने कॅपिटॉल व नंतर फोफावलेल्या गड्रकेचे दर्शन होते. त्याकाळी बांधलेली फ्युनिक्युलर अजूनही पर्यटकांची वर-खाली ने-आण करते. वर म्हटल्याप्रमाणे झाग्रब येथे फार पूर्वीपासून शास्त्रीय संशोधन होत होते. पर्यायी विद्युत प्रवाह, गॅस लायटिंग, थर्मास अशा संशोधनात जगप्रसिद्ध असलेला निकोला टेसला हाही तिथलाच. त्याची प्रयोगशाळा, ऑफिस असलेली इमारत खालच्या आळीत फ्युनिक्युलर जवळ आहे.

मार्शल टीटो स्क्वेअर हा झाग्रबमधील सर्वात मोठा स्क्वेअर. नियोजनातून बांधलेल्या या शहरात रुंद रस्ते, मोठमोठे चौक पार्क, बरीच संग्रहालयं, विद्यापीठं, शैक्षणिक संस्था यांचे आलेखन झाले आहे. या सर्वाची रचना इंजिनीअर मिलान लुनिसी याने इंग्रजी यू अक्षराच्या आकाराची केली आहे. या भागाला लुनिसी हॉर्स शू म्हणतात. दोन्ही बाजूंना असलेले स्क्वेअर्स बोटॅनिकल पार्कने जोडले आहेत. या भागात सदैव प्रदर्शने, ऑर्केस्ट्रॉज, फार्मर्स मार्केट, विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल्स अशी लगबग चालूच असते.

टीटो स्क्वेअरमध्ये क्रोएशिअन नॅशनल थिएटर आहे. गड्रेकच्या जुन्या भागात असलेले हे थिएटर विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला इथे आले. याची रचना दोन युरोपिअन इंजिनीअर्सनी गॉथिक शैलीत केली आहे. रंगीत फुलझाडांच्या मध्यावरील या वास्तूच्या प्रवेशद्वारावर दोन संगीतकार हातात वाद्यं घेऊन उभे आहेत. आत प्रवेश केल्यावर जिने, खांब, पडदे, रंगमंच व आसन व्यवस्था अति कौशल्यपूर्ण आहे. येथे ऑर्केस्ट्रा, ड्रामा, कॉन्सर्टस् असे कार्यक्रम असतात. पण सुटीचा दिवस असल्याने आम्हाला आत जाता आले नाही.

थिएटरसमोरच एक हौद आहे. त्या हौदात पाणी वगैरे नाही. तिथे एकमेकांचे चुंबन घेण्यात मग्न असलेल्या तरुण मंडळींचे, गेले ते दिवस म्हणून खेद वयस्क वाटून घेणाऱ्या वयस्कांचे, तर जसे काही यांचे आपल्याला काहीच सुखदु:ख नाही असे ज्यांना वाटते अशा हॅपी गो लकी लोकांचे असे तऱ्हेतऱ्हेचे वेगवेगळे पुतळे आहेत. हा सगळा अगदी वेगळाच प्रकार वाटला. याशिवाय मोकळ्या जागेत स्केट बोर्डवर फिरत काहीजण मजा करत होते. तर कुटुंबवत्सल लोक आपल्या लहानग्यांना खेळवत होते. तिथून जवळच क्रोएशिअन म्युझिक अकॅडेमीची काचेची इमारत आहे. या सगळ्या भागाचा इतिहास सांगणारं संग्रहालय आहे.
गौरी बोरकर – response.lokprabha@expressindia.com