कॅनडातील एडमंटन शहरात माझ्या सुनेची शेजारीन सुझॅन संध्याकाळी आमच्याकडे आली.

‘राधिका, उद्या मी माराला घेऊन एल्क आयलँड पार्कला जातेय. तुला यायचंय का बरोबर..? आर्यनला घेऊन चल .. छान पिकनिक होईल..’

नाही म्हणायचं काहीच कारण नव्हतं..! तिची अडीच वर्षांची मुलगी मारा आणि माझा साडेतीन वर्षांचा नातू या दोघांची घट्ट मत्री असल्यामुळे त्या दोघांनाही भरपूर एन्जॉय करता येईल हे ठाऊक होतं..! मी एडमंटनला जाऊन बरेच दिवस झाले होते. पण सुपर शॉपी वगळता दुसरीकडे कुठे फारसं जाता आलं नव्हतं. त्यामुळे मला हे एल्क पार्क बघायला घेऊन जायची सुझ्ॉनची इच्छा होती. एडमंटनमधील मिचनर पार्क हा तिथल्या अल्बर्टा विद्यापीठाने, परदेशातून तिकडे शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी बांधलेल्या एकसारख्या घरांचा प्रशस्त परिसर.. विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबीयांसोबत राहून शिकता यावे म्हणून कमी भाडय़ात राहायला घर दिलं जातं. सुझ्ॉन आणि सॅबॅस्टियन हे जर्मन जोडपं आमचे तिथले शेजारी. दोघंही माझ्या मुलाच्या वयाचेच.. त्यामुळे त्यांच्याशी बऱ्यापकी गट्टी जमली होती. त्यामुळेच सुझ्ॉनसह तासाभराच्या अंतरावर असलेल्या एल्क आयलँड पार्कमध्ये जायला मी आनंदाने तयार झाले.

सुझ्ॉन स्वत: ड्रायव्हिंग करणार होती. दोन्ही मुलांना कारमधील पाठीमागच्या सीटवर चाईल्ड सीटमध्ये बांधून ठेवलं. तेवढय़ासाठी आमच्या कारमधील चाईल्ड सीट सुझ्ॉनच्या कारमध्ये बसवून टाकली होती..! हो.. कारण कॅनडामध्ये लहान मुलांना चाईल्ड सीटशिवाय कारमध्ये बसवले तर दीडशे डॉलर्स दंड केला जातो. गाडीत बसल्यानंतर त्या दोघांचा एवढा चिवचिवाट चालू होता की त्यांना कसं शांत करायचं तेच आम्हाला कळेना. मुलांसाठी खाण्यापिण्याचे साहित्य बरोबर घेऊन आम्ही दोघी निघालो. कॅनडातील एडमंटन हे शहर ऑइल इंडस्ट्रीसाठी प्रसिद्ध आहे. शहराबाहेर पडताच या औद्योगिक वसाहतींचं दर्शन व्हायला लागलं. त्या देशातील प्रचंड आकाराचे आठपदरी रस्ते आणि शिस्तीनं वाहाणारी वाहनं पाहून नेहमीच दिपून गेल्यासारखं व्हायचं. सुझ्ॉन तिची मोठी गाडी इतकी लीलया चालवत होती की हेवाच वाटत होता. बाकी पाश्चात्त्य देशांमध्ये ‘वीकएंड’ची संकल्पना इतकी महत्त्वाची आहे की लोक त्या दिवशी घरी राहात नाहीतच. पाच दिवस काम केल्यानंतर मिळालेली हक्काची सुट्टी आपल्या कुटुंबीयांसमवेत घालवण्याचा आनंद सोहळा ही मंडळी शनिवार, रविवार उत्साहाने साजरी करत असतात. तासाभरातच सुझ्ॉनने आपली गाडी हायवेवरून एल्क पार्कसाठीच्या एक्झिटमधून बाहेर काढली. दहा मिनिटांच्या सुरेख ड्राइव्हनंतर आम्ही एल्क आयलँड पार्कच्या व्हिजिटर सेंटरजवळ पोहोचलो. सेंटरच्या प्रवेशद्वाराजवळच येथील जंगलात राहाणाऱ्या वूड बायसनची ट्रॉफी ठेवलेली होती. त्याला पाहून आर्यन आणि मारा दोघेही क्षणभर जागीच थबकले. हा बायसन दिसायला आपल्याकडील बायसनपेक्षा खूप वेगळा आहे. थोडा क्रूर आणि भयानक वाटणारा.. पण प्रत्यक्षात अतिशय निरुपद्रवी प्राणी असणारा.. याच्या अंगावर भरपूर केस असतात. कारण वर्षांतील सहा महिने त्याला बर्फात आणि उणे वीस ते उणे पस्तीस या तापमानात काढावे लागतात. त्यामुळे निसर्गानेच त्याला हे नसर्गिक कवच दिलेले आहे.

पार्कबद्दल समग्र माहिती देणारी माहितीपत्रके या सेंटरच्या ठिकाणी उपलब्ध होती. लहानसहान सुरेख वस्तूंचे गिफ्ट शॉपही होते. बाहेरील आवारात भरपूर गाडय़ा उभ्या होत्या. भरपूर लोक आलेले होते.. आम्ही थोडा वेळ दुकानात टाइमपास केला आणि एॅस्टोटीन तलावाकडे जाण्यासाठी निघालो.. कॅनडामधील एल्क आयलँड नॅशनल पार्क हे एडमंटन शहरापासून साधारण पस्तीस कि.मी अंतरावर असलेले एक महत्त्वाचे नॅशनल पार्क आहे. घनदाट झाडीने व्यापलेल्या १९४ चौरस कि.मी परिसरात पसरलेल्या, या विशाल पार्कात लहान मोठे चार-पाच तलाव असल्यामुळे या पार्काची शोभा अधिकच वृिद्धगत होताना दिसते. यापकी अ‍ॅस्टोटिन लेक सर्वात मोठा आहे आणि त्याच्या किनाऱ्यावर पर्यटकांची अधिक गर्दी होते.. तवाईक लेक, लिटल तवाईक लेक, ऑस्टर लेक, फ्लाईंग शॉट लेक या इतर तलावांच्या आजूबाजूलासुद्धा कँिपगसाठी राखीव जागा आहेत. कॅनडामध्ये अनेक पार्क आहेत पण एल्क आयलँड पार्क हे एकमेव असे पार्क आहे ज्याला चोहोबाजूंनी कुंपण घातलेले आहे. एडमंटन शहराकडून जाणारा यलोहेड हायवे एल्क आयलँड पार्काच्या मधून जात असल्यामुळे या नॅशनल पार्कचे दोन भाग झालेले आहेत. १९०७ सालापासून हे जंगल नॅशनल पार्क म्हणून संरक्षित करण्यात आले. सध्या ‘वूड बायसन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवाढव्य प्राण्याचा हक्काचा निवारा अशी एल्क आयलँड नॅशनल पार्काची खरी ओळख आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.. कारण या घटकेला पाचशेहून अधिक साधे बायसन आणि चारशे वूड बायसन आपल्या लाल रंगाच्या केसाळ बछडय़ांना घेऊन  या पार्कात मजेत फिरताना पाहायला मिळतात. हा कॅनेडीयन-अमेरिकन वूड बायसन दिसायला भयानक आणि ओंगळवाणा वाटतो.. पण तसा गरीब आणि निरुपद्रवी असतो. कधीकाळी संपूर्ण जगभरात फक्त तीनशे वूड बायसन शिल्लक राहिले होते. पण आता प्रयत्नांती त्यांची संख्या वाढीला लागली आहे. एल्क पार्कामध्ये जेव्हा वूड बायसनची संख्या वाढते तेव्हा त्यांना अमेरिका, रशिया या देशातील पार्कस्कडे संवर्धनाच्या दृष्टिकोनातून पाठवले जाते. या प्राण्यांच्या जोडीला धिप्पाड आकाराचे मूस आणि एल्क या जातीची हरणे या पार्कमध्ये आहेत. व्हाइट टेल्ड डिअर, म्युल डिअर, लांडगे (वूल्फ), कोल्हे (कोयोट), काळे अस्वल आणि बिव्हर असे इतर प्राणीसुद्धा मोठय़ा संख्येने आहेत. त्यांच्या जोडीला विविध प्रकारचे पक्षीसुद्धा मोठय़ा संख्येने आहेत.

37-lp-elk

गंमत म्हणजे एकदा पार्कमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण कुठेही जाऊ शकतो..! पायी चालण्याचा आनंद घेण्यासाठी जंगलाच्या अंतर्भागात अनेक ट्रेल्स म्हणजेच पायवाटा तयार केलेल्या आहेत. आपल्याकडील जंगलांमध्ये पायी फिरण्यास बंदी असते तशी इकडील जंगलांमध्ये अजिबात नसते. कारण वाघ, बिबटा असे हल्ला करणारे प्राणी इकडे नाहीतच. शिवाय इकडचे नागरिक नियम अगदी काटेकोरपणे पाळताना दिसतात.

एल्क आयलँड नॅशनल पार्कमध्ये कँिपग करण्यासाठी भरपूर जागा आहेत. टॉयलेट, शॉवरच्या सोयी आहेत. लहान मुलांसाठी खेळण्याचे पार्क आहेत. तसेही पाश्चात्त्यांच्या वीकएंडच्या कल्पना फारच सुरस असतात. सुटीच्या दिवशी शक्यतो घराबाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात मुलाबाळांच्या संगतीत रमण्याचा या लोकांचा आग्रह असतो आणि हा आनंद लुटण्यासाठी ही मंडळी अगदी जय्यत तयारीनिशी बाहेर पडतात. आपापल्या भल्या मोठय़ा गाडय़ा घेऊन ही मंडळी बाहेर पडतात तेव्हा गाडीच्या टपावर किंवा गाडीच्या पाठीमागे ट्रेलरमध्ये छोटी मोटरबेट किंवा कयाक असते. गाडीच्या समोर किंवा पाठीमागे सायकली उभ्या करण्यासाठी स्टँड असतो. त्यावर सर्वाच्या सायकली घेतलेल्या असतात.. गाडीच्या डिकीमध्ये फोिल्डग चेअर्स, फोिल्डग टेबल्स या गोष्टींचा जामानिमा असतो. कँप करायचे असल्यास अर्थातच टेन्ट असतातच..! नवरा-बायको, दोन मुलं आणि भला दांडगा कुत्रा असं अवघं कुटुंब सर्व तयारीनिशी बाहेर पडलेलं असतं.. मुलांना बरोबर घेऊन सहसा आई-वडील दोघेही बोटिंग, फििशग, सायकिलग या गोष्टींचा मनमुराद आनंद घेताना दिसतात.. कँिपगसाठी आल्यानंतर बाब्रेक्यूचा आनंद घेणंही अगदी अपरिहार्य असतं. प्रत्येकजण त्यासाठी तयारीनीशी येतात. एक गोष्ट आपल्याला मान्य करावीच लागते, ती म्हणजे पाश्चात्त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार प्रगल्भ असतो आणि ही मंडळी जीवन अगदी समरसतेने, आसुसून जगतात..! जीवनाचा मनापासून आनंद घेताना दिसतात.

पार्कमधील अ‍ॅस्टोटीन लेकच्या दिशेने जातानाच वाटेत असणाऱ्या बायसन लूपबद्दल सुझ्ॉनने मला कल्पना दिली.. पण आम्हाला आधी मुलांच्या खेळण्याच्या जागेकडे जायचे होते. कारण मुलांना आता गाडीतून खाली उतरून खेळायचे होते.. खरं तर उन्ह वाढले होते. पण त्यांचा उत्साह त्याक्षणी ओसंडून वाहात होता. मऊशार रेतीमध्ये मुलांना खेळण्याचे अनेक प्रकार तिथं उपलब्ध होते. माझ्या तीन वर्षांच्या नातवाबरोबर त्याला कंटाळा येईपर्यंत मी त्या प्ले पार्कमध्ये सोबत करीत उभी होते.. भूक लागल्यानंतरच त्यांचा उत्साह ओसरला. जेवणासाठी सर्वत्र लाकडी बेंच असल्यामुळे सावलीत बसून मस्त खाणंपिणं झालं..मग बरोबर आणलेल्या स्ट्रोलरमध्ये सामान टाकून मुलांना घेऊन आम्ही तलावाच्या दिशेने गेलो.. तलावाच्या काठावर बऱ्यापकी मोठा सोनेरी रेतीचा बीच होता.. गोऱ्या रंगाची बरीच मंडळी टॉवेल पसरून सन बाथ घेत होती.. माझा जीव मात्र उन्हामुळं कासावीस झाला होता.. माराचे, सुझ्ॉनच्या मुलीचे गाल अक्षरश: सफरचंदासारखे लालबुंद झाले होते..माझी सून युक्रेनियन असल्यामुळे नातू आर्यनही गोरा आहे.. तोही लालेलाल झाला होता.. पण दोन्ही मुलांचा उत्साह अजूनही कमी झालेला नव्हता. त्यांना अजिबात कंटाळा आला नव्हता.. शेवटी दोघांनाही स्ट्रोलरमध्ये बसवून आम्ही तलावाच्या काठाकाठाने तयार केलेल्या वाटेवरून चक्कर मारायला निघालो.. अ‍ॅस्टोटिन लेक आकाराने बऱ्यापकी विस्तीर्ण असल्यामुळे, बरेच लोक बोटिंगचा आनंदही घेताना दिसत होते. काहीजण कयाकिंगही करताना दिसत होते. मुलं कंटाळल्याचं जाणवलं तसं थोडय़ाच वेळात आम्ही आमचं पिकनिक आटोपती घेण्याचं ठरवलं आणि कारकडे निघालो.. परतीची तयारी झाली आणि कार चालू करताच काही मिनिटांच्या आतच दोन्ही मुलं गाढ झोपून गेली..

38-lp-elk

वाटेत ‘बायसन लुप ‘ येताच सुझ्ॉनने गाडी त्या रस्त्यावर वळवली. पाच-सहा किलोमीटर्सच्या त्या रस्त्यावर बायसन पाहायला मिळतात. पण ऊन्हामुळे आम्हाला एकही बायसन पाहायला मिळाला नाही.. वाटेत हरणांचा एक कळप मात्र मिळाला. एल्क आयलँड नॅशनल पार्कच्या या भेटीत मला कॅनेडीयन बायसन बघायला मिळाला नाही. पण सुझ्ॉनने अरोरा म्हणजेच नॉर्दन लाइओटस् बघायला पुन्हा तिकडे नेले होते तेव्हा मात्र संध्याकाळच्या शांत वेळी, धुसर प्रकाशात मी वूड बायसनचं प्रचंड आकाराचं धुड रस्त्यात मधोमध उभं राहिलेलं पाहिलं. या पार्कमध्ये फिरताना वाहनांच्या वेगावर वेगमर्यादेचे बंधन असते आणि विशेष म्हणजे येथील सुजाण नागरिक त्याचे काटेकोरपणे पालन करताना दिसतात. एल्क पार्क बारा महिने, दिवसाचे चोवीस तास सर्वासाठी खुले असते. तुम्ही कँप करून राहता तेव्हा रात्रीसुद्धा जंगलातून भ्रमंती करू शकता.. तेथे आलेल्या अनेक कुटुंबांनी तंबू ठोकून कँिपगची तयारी केलेली दिसत होती.. झाडांच्या सावलीत टेबलं लाऊन ज्या उत्साहानं खाणंपिणं चालू होतं ते पाहून मला या लोकांच्या वीकएंड साजरा करण्याच्या एकूणच सुंदर संकल्पनेचं अप्रूप वाटत राहिलं.. हल्ली आपल्याकडेही हे सोहळे चालू झालेत. पण संपूर्ण पार्कातील स्वच्छता, नियम काटेकोरपणे पाळण्याची प्रत्येकाची असोशी आणि दुसऱ्याला आपल्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी केलेले प्रयत्न यामुळे पार्कात आलेल्या प्रत्येकालाच निसर्गाचा आणि अतिशय सुंदर अशा भवतालाचा आनंद घेता येत होता हे पाहून अधिक समाधान वाटले. आपल्याकडे अशा निसर्गरम्य ठिकाणी हल्ली तरुणाई वीकएंडसाठी गर्दी करते.. पण त्यांच्या एन्जॉयमेंटच्या खाणाखुणा मागे ठेऊन, त्या निसर्गरम्य परिसराचा उकिरडा करूनच ही मंडळी परत फिरतात हे ठाऊक असल्यामुळे मनात आले, आपल्याकडे हे सारं कधी येणार..? ही स्वच्छता, हा काटेकोरपणा आपण कधी शिकणार..?

ऑक्टोबर महिन्याचे दिवस होते ते.. एल्क पार्कमधील उंचच उंच वृक्षराजी चतन्याने सळसळत होती.. वसंत ऋतूची सुरुवात झाली होती.. झाडांची पाने पिवळी धम्मक होऊन अवघ्या पार्काला सोनेरी कळा प्राप्त झाली हेती. काही झाडांवरील पानोरा लाल रंगात रंगला होता.. लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगात रंगलेलं एल्क आयलँड पार्कचं जंगल मावळतीच्या तिरप्या सोनेरी किरणांमुळे अधिकच सुंदर आणि अनोखं वाटत होतं.. थोडय़ाच दिवसात पानगळ सुरू होऊन कॅनडातील कडक हिवाळा सुरू होणार होता.. खरं तर ऑक्टोबरमध्येही बर्फ पडतं असं मला सांगण्यात आलं होतं.. पण मी तिथं असेपर्यंत हिमवृष्टी काही सुरू झाली नव्हती. हिवाळ्यात पांढऱ्या शुभ्र रंगाची चादर ओढून रंग बदलणारं एल्क पार्क बर्फाच्या खेळासाठीसुद्धा लोकांमध्ये तेवढेच प्रिय आहे. स्किईंग आणि स्केटिंगसाठी हिवाळ्याच्या दिवसातही पार्कमध्ये विकएंडसाठी येणाऱ्या लोकांची सतत वर्दळ चालू राहाते.

त्या शनिवारी एल्क आयलँड नॅशनल पार्कला भेट दिल्यानंतर एक सुंदर अनुभव मनात साठवत मी सुझ्ॉनच्या शेजारी बसून एडमंटनच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. माझी सून मरिना अभ्यासात गुंतलेली असल्यामुळे मला वेळ देऊ शकत नव्हती. त्यामुळे आमच्या शेजारी राहाणाऱ्या सुझ्ॉनने मला ज्या आपुलकीने एल्क पार्क बघायला नेलं ते पाहून वाटलं जगाच्या पाठीवर कुठेही राहा, शेजारधर्म पाळणारे शेजारी मिळावेत हेच परमेश्वर चरणी मागणे..! मग भारतात राहा नाहीतर कॅनडात..!
राधिका टिपरे – response.lokprabha@expressindia.com