24 November 2020

News Flash

सुशेगात..!

गोवा हे ठिकाण फिरण्यासाठी निश्चित झालं की प्रत्येक जण स्वप्नं रंगवू लागतात.

समुद्रकिनारा, थंडगार वारा, निवांत आयुष्य या संपूर्ण अनुभवाशिवाय गोवा आणखीही काही देऊ पाहतंय. गोव्याचं सौंदर्य तिथल्या संस्कृती, परंपरा, खाद्यपदार्थ, राहणीमान, इतिहास यातही दडलंय.

गोवा हे ठिकाण फिरण्यासाठी निश्चित झालं की प्रत्येक जण स्वप्नं रंगवू लागतात. समुद्र, समुद्रकिनारा, थंडगार वारा, निवांत जागा आणि शांत आयुष्य हे सगळं एकाच ठिकाणी एकाच वेळी हवं असेल तर गोवा हा पर्याय उत्तमच! गोवा आणि समुद्रकिनारा हे समीकरण आता सगळ्यांच्याच ओळखीचं झालंय आणि हेच समीकरण कसं बरोबर आहे याचा प्रसारही केला जातोय. अर्थात यात काहीच गैर नाही. गोव्याचं सौंदर्य तिथल्या समुद्रकिनाऱ्यांमध्ये आहेच. तिथले समुद्रकिनारे शांत, निवांत क्षण पर्यटकांना देतातही. पण या संपूर्ण अनुभवाशिवाय गोवा आणखीही काही देऊ पाहतंय. गोव्याचं सौंदर्य तिथल्या संस्कृती, परंपरा, खाद्यपदार्थ, राहणीमान, इतिहास यातही दडलंय. गोवा पर्यटन महामंडळाने तिथल्या आदिवासी महोत्सवाचं निमित्त साधून गोव्याच्या या सौंदर्याचा अनुभव घेण्याची संधी दिली.

या आगळ्यावेगळ्या प्रवासाची सुरुवात झाली फोन्तेनस हेरिटेज कॉम्प्लेक्स या भागापासून. गोवा राज्याला पोर्तुगीजांची मोठी पाश्र्वभूमी आहे. काही वर्षांपूर्वी काही पोर्तुगीज गोवा सोडून इतरत्र काही ठिकाणी स्थलांतरित झाले. त्या वेळी त्यापैकी काहींनी त्यांची गोव्यामधली घरं विकली तर काहींनी ती तशीच ठेवून त्याची देखभाल करण्यासाठी काही माणसांची नेमणूक केली. अशा या काही पोर्तुगीज घरांचे गेस्ट हाऊस झाले तर काहींनी त्यांची घरं तशीच जपून ठेवली. या घरांचे गेस्ट हाऊस झाले असले तरी त्यांचा तोच पोर्तुगीज लुक कुठेही हरवलेला नाही. गोव्याला फिरायला आलेले पर्यटक साधारणपणे एखाद्या समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या हॉटेलमध्ये राहण्याचं ठरवतात. ‘सी फेसिंग रूम हवी’ असंही हॉटेलमध्ये आवर्जून सांगतात. हा अनुभव आनंद देणारा आहेच. पण, गोव्यात सात दिवस असाल तर किमान तीन दिवस तरी या हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये राहून बघायला हवं. हा अनुभवही घेण्यासारखा आहे. जुन्या पोर्तुगीज घरांमध्ये राहण्याचा अनुभव विलक्षण असू शकतो. रुस्टर म्हणजे कोंबडा हे पोर्तुगीजांचं चिन्ह आहे. त्यामुळे फोन्तेनस या विभागातील पोर्तुगीज घरांवर हे चिन्ह आवर्जून दिसतं. पोर्तुगीज घर ओळखण्याची ती खूण आहे. गोव्यातील वसाहत असणारी ठिकाणंसुद्धा शांतच वाटतात. त्यामुळे पोर्तुगीज घरांमध्ये राहूनच अशी शांतता अनुभवणं म्हणजे मेजवानीच!

कम्पाल एरियामध्ये एटीन्थ जून रोडवर (१८ जून) अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन हे चर्च आहे. गोव्यातील अनेक रस्त्यांची नावं विशिष्ट तारखा म्हणून आहेत. यामागे ऐतिहासिक, राजकीय घटनांची पाश्र्वभूमी आहे. एटीन्थ जून हा पणजीमधला रहदारीचा रस्ता आहे. ‘मोस्ट बिझी प्लेस’ असं काहीसं म्हणता येईल. अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च हे इथलं प्रसिद्ध चर्च आहे. हे चर्च पूर्वी अनेक हिंदी सिनेमांमध्ये बघितलं आहे. पण प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव काही वेगळंच सांगून जातो.

गोवा फिरून येणाऱ्याला सगळे जण एक प्रश्न जरूर विचारतात. ‘मासे खाल्ले का?’ आता या प्रश्नाला ‘नाही’ असं उत्तर दिलंत तर झालं. समोरच्याचा एक डायलॉग तयारच असतो. ‘गोवा में जा के फिश नहीं खाया तो क्या किया’.. पण असो.. मुद्दा काय तर गोव्यात जाऊन तुम्ही मासे खाल्लेच पाहिजेत असा नियम नसला तरी तुम्ही खाणाऱ्यातले असाल तर नक्कीच तिथले वेगवेगळे मासे खायला हवेत. विशेषत: तेथील स्थानिक मासे खाऊन बघावेत. कदाचित त्या सगळ्यांची नावं तुमच्या लक्षात येणार नाहीत पण, त्याचा आनंद तुम्ही नक्कीच घेऊ शकता. गोवन फिश करी तर मस्टच आहे!  मिठायांमध्ये बिबिन्का हा पदार्थ तिथे लोकप्रिय आहे.

33-lp-paryatan-travel

आधुनिक गोव्याचं चित्र अनेकांनी बघितलं असेल. आवडलंही असेल. पण, एकदा गोव्याच्या आदिवासी जीवनात डोकावलंत तर आणखी वेगळं चित्र बघायला मिळेल. गोव्याच्या क्वेपेम या भागातील आदिवासी संघटनेने आदिवासी महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या महोत्सवाचं यंदाचं सहावं वर्ष आहे. या वर्षी हा महोत्सव व्हिलेज पंचायत मैदान, शेल्डम, क्वेपेम या ठिकाणी भरवण्यात आला होता. या महोत्सवाच्या निमित्ताने आदिवासींची परंपरा, खाद्यसंस्कृती, पारंपरिक खेळ, नृत्यप्रकार या सगळ्याचा अनुभव घेता आला. आदिवासी लहान मुलांसाठी चित्रकला, नृत्य, गायन अशा विविध स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवाय सांस्कृतिक कार्यक्रमही होते. खरं तर आदिवासी म्हटलं की एक वेगळंच चित्र समोर उभं राहतं. पण प्रत्यक्ष त्यांचा अनुभव बरंच काही सांगणारा होता. शाळेतली मुलं ‘बेबी को बेस पसंद है’, ‘सैयाजीसे आज मैंने ब्रेक अप कर लिया’ अशी अनेक हिंदी गाणी आणि ‘लिन ऑन’सारख्या काही इंग्लिश गाण्यांवर नृत्य करत होती. ‘मला लागली कुणाची हिचकी’ या गाण्यावर नाचणाऱ्या त्या मुली कॅमेरासमोर उभ्या राहून बिनधास्त पोझ देत होत्या. नृत्य आणि गाण्यांसह चेटणी, गिल्ली-दंडा, लगोरी हे पारंपरिक खेळही बघणं उत्सुकतेचं ठरलं. तर मोला, सान्ना (झाडू), निवोनी, फुला फाटी (फुलांचे हेड बॅण्ड) या वस्तू तयार करण्याची कला बघायला मिळाली. आदिवासी स्त्रिया प्रचंड सफाईने आणि झटपट या वस्तू तयार करत होत्या. फोव (पोहे), अंबिल, पिट्टा, गुलिओ, सान्ना, पातोळे,  शितोळ्या, शेवयो, सोजी या पारंपरिक पदार्थाचा आस्वादही घेता आला. या कार्यक्रमांमध्ये त्यांच्याच पद्धतीच्या जेवणाचा आनंदही घेता आला. परंपरा जपत आधुनिकतेलाही जवळ करत ही आदिवासी मंडळी त्यांचं सुशेगाद आयुष्य जगत आहेत.

गोव्यातील लोकांचं राहणीमान कसं होतं हे जाणून घ्यायचं असेल तर लोटलिममधल्या अ‍ॅन्सेस्ट्रल गोवा (Ancestral Goa) या संग्रहालयाला भेट द्यायलाच हवी. गोव्यातील घरमालकाचं घर, गरिबाचं घर, फेणी तयार करण्याची प्रक्रिया, न्हावी, नारळ जमा करणारे, मीठ गोळा करणारे, फूलविक्रेता, भाजीविक्रेता, मिठाईविक्रेता अशा अनेकांचे पुतळे या म्युझिअममध्ये आहेत. हे पुतळे अतिशय बोलके आहेत. गोव्याचं राहणीमान, जगणं, परंपरा या सगळ्याची माहिती विविध देखाव्यांच्या माध्यमातून दाखवली आहे. संत मीराबाई यांची शिल्पकृती या संग्रहालयाचं मोठं आकर्षण आहे. जमिनीवर असलेली ही शिल्पकृती मइंद्रा जोसेलिनो अराऊजो अलवारेस (Maendra Jocelino Araujo Alvares) यांनी एका महिन्यात पूर्ण केली. लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये भारतातील सर्वाधिक लांबीची शिल्पकृती अशी या शिल्पाकृतीची नोंद केली गेली आहे. संग्रहालयामध्ये बिग फुट या ठिकाणाविषयीही माहिती दिली आहे. त्या जागेला बिग फुट हे नाव का देण्यात आले, त्याची कथा या सांगण्यात येते. महादर या श्रीमंत माणसाची ही गोष्ट. महादर अतिशय दयाळू आणि प्रेमळ. त्याच्याकडे मदत मागायला येणाऱ्या प्रत्येकाला तो मदत करायचा. त्याच्या या स्वभावाचा फायदा काही गावकरी घ्यायचे. खोटी कारणं सांगून त्याच्याकडून पैसे उकळायचे. असं करत एके दिवशी महादरकडे त्याचं घर विकण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. इतरांना मदत करून तो मात्र रस्त्यावर आला होता. त्याच्या या अस्थिर आयुष्याचा ताण सहन न झाल्यामुळे त्याची बायको दगावली. असं होऊनही त्याला झेपेल तेवढी मदत तो लोकांना करतच राहिला. एकदा देवाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला विचारलं की तुला तुझी संपत्ती परत हवीये का. तर त्याने त्यासाठी नकार देऊन प्रार्थना करण्यासाठी एक छोटीशी जागा मागितली. महादरची परीक्षा घेण्यासाठी देवाने त्याला एका उष्ण दगडावरची जागा दिली. त्या जागेवर महादर त्याच्या एकाच पायावर अनेक र्वष उभा राहिला. महादरच्या या कृत्यामुळे देव प्रसन्न झाला. त्याने महादरच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आणि त्याच्या एका पायाची खूण तशीच ठेवून त्याला स्वर्गात घेऊन गेला. या पायाच्या खुणेवरून जी व्यक्ती जाईल त्याच्या इच्छा पूर्ण होतात, असा तिथला समज मानला जातो. ही संपूर्ण कथा संग्रहालयात ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून ऐकवली जाते. मइंद्रा जोसेलिनो अराऊजो अलवारेस यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे संग्रहालय अतिशय अभ्यासपूर्ण आणि मनोरंजकही आहे. गोव्याची परंपरा, जगणं, लोक, संस्कृती यांची माहिती आजच्या पिढीलाही माहिती असावी, यासाठी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न तिथे नक्कीच दिसतो.

34-lp-paryatan-travel

गोव्याच्या सुशेगात आयुष्यात मनोरंजनासह ज्ञानात भर पडेल अशीही काही ठिकाणं आहेत. खरं तर प्रत्येक शहराला इतिहास असतो. त्या शहराची निर्मिती, प्रगती, विकास, बदल असं सारं काही एका शहराच्या मागे दडलेलं असतं. पण, काही शहरांची एक वेगळीच ओळख इतरत्र राहणाऱ्या लोकांना होत असते. मग काही लोकांचा संच दुसऱ्या संचाला तेच सांगतो. ही साखळी मोठी होत जाते. पण, त्या शहराच्या त्या ओळखीशिवायही आणखी काही आहे हे बघणारी खूप कमी मंडळी आहेत. खरं तर गोव्याचं सौंदर्य जितकं समुद्रकिनाऱ्यांमध्ये, खाद्यसंस्कृतीमध्ये आहे तितकंच त्याच्या ऐतिहासिक घटना, राहणीमान, संस्कृती, लोककला यांमध्ये आहे. गोव्याची ही बाजू बघणं सुखकारक आहे.

गोव्यात समुद्रकिनाऱ्यांची जशी मोठी यादी आहे तशीच यादी संग्रहालयांचीही आहे. गोवा चित्रसंग्रहालय हे आणखी बघण्यासारखं संग्रहालय आहे. व्हिक्टर ह्य़ुगो गोम्स (Victor Hugo Gomes) यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे संग्रहालय भव्य असं आहे. शिवाय या संग्रहित केलेल्या वस्तू अतिशय देखण्या आहेत. या वस्तूंमध्ये विविध राज्यांमधील बग्गी, टांगा, बैलगाडी, घोडागाडी, पालखी अशा विविध गोष्टींचा संग्रह केला आहे. यांचा संग्रह केलेल्या विभागाला चक्र असं नाव देण्यात आलंय. या प्रत्येक वस्तूचा चक्राशी संबंध आहे. स्पर्धेत धावणारी बैलगाडी आणि मालवाहतुकीची बैलगाडी यांच्या चाकांमध्ये फरक असतो. तसंच घोडागाडीचंही आहे. राज्यांनुसार तिथल्या बग्गी, टांग्यांची चाकं बदलली जातात. या वैविध्यपूर्ण चाकांचा संग्रह वेगवेगळ्या वाहनांच्या माध्यमातून ‘चक्र’ विभागात केला आहे. यामध्ये गुजरातमध्ये बर्फाचा गोळा मिळणारी हातगाडी वापरली जायची तिचाही संग्रह आहे. एकेका बग्गीचं रिस्टोरेशन करायला व्हिक्टर यांना लाखांमध्ये पैसा मोजावा लागतो. भारतातल्या ज्या राज्यात ते सापडेल तिथून गोव्यात आणणं, त्याविषयी  संशोधन करणं, त्याचा इतिहास वाचणं हे सगळं खूप खर्चिक आहे. व्हिक्टर करत असलेलं हे काम कौतुकास्पद म्हणावं लागेल.

जुनं ते सोनं असं म्हणतात. आणि सोन्याचं सौंदर्य आणखीच वेगळं! संग्रहित केलेल्या अनेक गोष्टींचं सौंदर्य लक्ष वेधून घेणारं आहे. तराजू, वजनकाटा, विळी, सुरी, स्वयंपाकघरातील इतर वस्तू, शेतीची अवजारे, अशा अनेक वस्तूंचा संग्रहही यात आहे. खोबऱ्याचं तेल काढण्याचं, साखर तयार करण्याचं यंत्र हेसुद्धा या म्युझिअमचं आकर्षण आहे. या सगळ्या प्राचीन वस्तूंचं जतन, संगोपन अतिशय उत्तमरीत्या केलेलं आढळून येतं. यापैकी अनेक वस्तू शेकडो र्वष जुन्या आहेत. व्हिक्टर मनापासून या वस्तूंचं संगोपन करतात. त्यांचा हेतू आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांची भारतीय संस्कृतीविषयीची आस्था स्पष्टपणे लक्षात येते. या संग्रहालयामध्येच त्यांची छोटी शेतीसुद्धा आहे. विविध भाज्यांची शेती इथे केली जाते. शेतीसाठी वापरलं जाणारं पाणी वाया न घालवता ते बायोगॅससाठी वापरलं जातं. प्राचीन वस्तूंचा संग्रह करण्याच्या आवडीसह त्यांचं पर्यावरणप्रेमही यानिमित्ताने दिसून येतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली काही तरुण मुलं-मुली या संपूर्ण संग्रहालयाची माहिती पर्यटकांना नीट समजावून सांगत असतात. गप्पा मारत ते संग्रहित वस्तूंची व्यवस्थित माहिती देतात.

पोंडा येथील सहकारी स्पाइस फार्म सुखद अनुभव होता. हे प्लँटेशन चालवणारी सहकारींची आताची सातवी पिढी. ३५० र्वष जुनं असलेलं सहकारी स्पाइस फार्म १३० एकर इतक्या जागेत पसरलंय. यापैकी ४० टक्के काजूची शेती केली जाते आणि इतर जागेत नारळ, सुपारी, केळी, कॉफी बीन्स, अ‍ॅनोटो यांची लागवड केली जाते. या अ‍ॅनोटोला बघून ‘बाहुबली’ सिनेमातलं एक दृश्य आठवलं. सिनेमाचा नायक एका झाडावरचं एक फळ तोडून ते दोन बोटांवर घासतो आणि त्याचा रंग बोटाने नायिकेच्या ओठांना लिपस्टिक म्हणून लावतो. अ‍ॅनोटोला मराठीमध्ये शेंदरी असं म्हणतात. त्यातल्या छोटय़ा बिया दाबल्यावर त्याचा नारंगी रंग बोटांवर लागतो. हा नारंगी रंग खाण्यायोग्य असल्यामुळे तो काही अन्नपदार्थामध्ये रंग येण्यासाठी वापरला जातो.

झाडावरून नारळ कसा काढला जातो याचं प्रात्यक्षिक एक मुलगा तिथे करून दाखवत होता. या फार्ममध्ये गेल्यावर फुलांची उधळण आणि कुंकूमतिलक लावून स्वागत करण्यात येते. वेलकम ड्रिंक-स्नॅक्स म्हणून काजू आणि लेमन टी दिली जाते. मग त्या जागेबद्दल माहिती दिली जाते. शेत फिरल्यानंतर पाठीला गारवा मिळावा यासाठी मानेवर पाणी टाकले जाते. प्रचंड उन्हात फिरून झाल्यावर मानेवर पडणाऱ्या गारेगार पाण्यामुळे खूप थंड वाटतं. जेवणाआधी मिळणारी फेणी आणि जेवणाचा आस्वाद घ्यावाच.

एकंदरीतच, गोव्याचं आयुष्य सुशेगात आहेच. संग्रहालय, रस्ते, जुनी घरं, पारंपरिक राहणीमान, चर्च अशा अनेक गोष्टींमुळे गोव्याचं सौंदर्य आणखी खुलतं. आणि याचा आनंद घेणं हाही एक अविस्मरणीय अनुभव आहे. गोव्याचं हे चित्र अनुभवलंत तर गोवा आणि समुद्रकिनारा यापलीकडे जाऊन एक वेगळंच समीकरण मनात निर्माण होईल यात शंकाच नाही!

(ही टूर गोवा पर्यटन महामंडळाने प्रायोजित केली होती.)
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2017 1:07 am

Web Title: goa travel destination
Next Stories
1 क्रोएशिअन आयलंड्स
2 सफर म्यानमारची
3 काश्मीरचा अमृतानुभव…
Just Now!
X